गो. रा. ढवळीकर
१९८७साली मराठी आणि रोमी कोकणी या शेकडो वर्षे हिंदू व ख्रिश्चन या दोन्ही समाजांमध्ये मान्यता पावलेल्या भाषांना डावलून देवनागरी कोकणीला राजभाषापदी बसविण्यात आले. मराठी भाषेकरता लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि कोकणी भाषेकरिता जे आंदोलन झाले त्यामध्ये नव्वद टक्के आंदोलक ख्रिस्ती समाजातील होते. आपली रोमी कोकणी राजभाषा होणार या ईर्ष्येने ते आंदोलनात उतरले होते. परंतु ज्याप्रमाणे मराठी आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसली तशीच फार मोठी फसवणूक ख्रिस्ती आंदोलकांची झाली.
गेल्या आठवड्यात ‘गोमन्तक टीव्ही’वर गोव्याच्या अस्तित्वासंबंधी विचारविमर्श करण्यासाठी एक परिसंवाद झाला परिसंवादाचे सूत्रसंचालक राजू नायक यांनी परिसंवादाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना गोव्याला भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.
त्या म्हणजे गोव्यात चालवलेले बेसुमार जमीन विक्री व्यवहार आणि त्यासाठी केले जाणारे भूरूपांतरण, गोव्याला बदनाम करणारे आणि भावी पिढ्यांना बरबाद करणाने पर्यटन आणि गोव्यामध्ये येत असलेले गोव्याबाहेरील लोकांचे लोंढे इ. गोव्याला ग्रासणाऱ्या समस्या मांडल्या. या समस्या इतक्या वेगाने वाढताहेत की आगामी दहा वर्षांच्या काळात गोवा राहणार नाही.
ते पुढे जाऊन म्हणाले की, ‘या गंभीर समस्यांना गोवेकरांकडून परिणामकारक विरोध होत नाही. याचे कारण तो एकसंध नसून मराठी, देवनागरी, कोकणी व रोमी कोकणी अशा तीन भाषिक गटात विभागलेला आहे. या तिन्ही गटांना एकत्र आणल्याखेरीज कोणतेच सामाजिक आंदोलन पढे जाऊ शकत नाही मराठी व रोमी कोकणीवाले समाधानी नाहीत. त्यांच्यातील असंतोष दूर करून सर्वांना एकत्र आणायचे तर मराठी व रोमी कोकणीला अधिकृत भाषेचा दर्जा दिला पाहिजे’.
या परिसंवादात भाग घेण्यासाठी मडगावचे सुप्रसिद्ध उद्योजक, विचारवंत व कोकणी समर्थक दत्ता नायक, माजी केंद्रीय कायदामंत्री व समाज कार्यकर्ते अॅड. रमाकांत खलप आणि मडगावचे सुप्रसिद्ध वकील आणि विचारवंत अॅड. क्लिओफात कुतिन्हो आल्मेदा यांना पाचारण करण्यात आले होते.
तिन्ही भाषांमध्ये विभागलेला आणि एकमेकांकडे संशयाने पाहणारा गोमंतकीय समाज एकत्र यायचा असेल तर देवनागरी कोकणीप्रमाणे मराठी आणि रोमी कोकणीलाही राजभाषेचा समान दर्जा दिला पाहिजे हा राजू नायक यांनी मांडलेला विचार पुढे नेताना दत्ता नायक म्हणाले की, ‘माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवानंतर आपण या निष्कर्षाला आलोय की मराठीलाही अधिकृत भाषेचा दर्जा देऊन गोमंतकातला भाषावाद संपवला पाहिजे’. पुढे ते म्हणाले की, रोमी कोकणीलाही अधिकृत भाषेचा दर्जा दिल्याने काय बिघडणार आहे? गोव्यात मोठ्या संख्येने असलेल्या ख्रिश्चन समाजाची ती भाषा आहे. त्यांना दुरावून चालणार नाही.
विचारवंत दत्ता नायक आणि गोमंतक दैनिकाचे संपादक राजू नायक या दोघा कोकणी समर्थक नेत्यांनी गोव्यातला भाषावाद संपवण्यासाठी मराठी व रोमी कोकणी या दोन्ही भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा देण्याचे जे आवाहन केले आहे त्याचे सर्व गोमंतकीय जनतेने स्वागत करावयास हवे. या दोन्ही भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा दिल्याने काही विपरीत घडणार आहे अशातला भाग नाही. कारण मराठी व रोमी कोकणी या दोन्ही भाषा गोमंतकात वापरात असलेल्या भाषा आहेत.
मराठी भाषा शेकडो वर्षांपासून गोमंतकाची भाषा असून सध्या सर्व क्षेत्रात प्रचंड प्रमाणावर तिचा वापर होत आहे. ख्रिस्ती समाज गेली तीनशे-चारशे वर्षे रोमी कोकणीचा वापर करीत आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने व घटनात्मक तरतुदीनुसार या दोन्ही भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा मिळावयास हवा होता. राजभाषा कायद्याने मराठी कार्यालयीन व्यवहारासाठी(ऑफिशिअल पर्पज) वापरण्याची तरतूद आहे. परंतु तीत स्पष्टता नाही. त्यामुळे मराठी भाषिक गेली अनेक दशके मराठीला तिचे हक्काचे स्थान मिळावे म्हणून झुंजत आहेत. तद्वत रोमी कोकणीवालेदेखील आपली मागणी पुढे रेटीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या मागणीने विशेष जोर धरल्याचे दिसून येते.
गोव्याच्या इतिहासाकडे मागे वळून पाहिल्यास मराठी भाषा गोव्यात ज्ञानेश्वर काळापासूनच नव्हे तर तत्पूर्वीपासून प्रचलित असल्याचे दिसून येते. पोर्तुगीज आक्रमणानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर येथील हिंदू-मुसलमानांचे धर्मांतरण केले व त्यांना मराठीपासून अलग करण्यासाठी ‘रोमी कोकणी’ या नवीन भाषेची निर्मिती केली. सुरुवातीला परकीय मिशनरि तिचा वापर करीत होते. परंतु पुढे नवा ख्रिस्ती समाज लेखन, वाचनासाठी तिचा वापर करू लागला. पोर्तुगिजांनी त्यांना मराठी भाषा व संस्कृतीपासून अलग करून त्यांच्यावर आपली संस्कृती, लिपी व भाषा लादली. तेव्हापासून गोव्यात दोन भाषा व दोन संस्कृती यामध्ये समाज विभागला गेला. तत्पूर्वी गोव्यात मराठी भाषा आणि एकच संस्कृती नांदत होती.
सांगायचा मुद्दा हा की गोवा जेव्हा मुक्त झाला त्यावेळी गोव्यात मराठी आणि रोमन कोकणी या दोनच भाषा वापरात होत्या आणि त्यांना अनुसरून दोन अलग संस्कृती. हिंदूची भाषा व संस्कृती मराठी आणि ख्रिस्ती समाजाची भाषा रोमी कोकणी आणि पाश्चात्त्यांची छाप असलेली संस्कृती-गोव्याचे भवितव्य ठरविण्यासाठी आणि राज्यशकट पुढे चालविण्यासाठी हिंदू व कॅथलिक समाजातील नेते पुढे सरसावले आणि कै. भाऊसाहेब बांदोडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची आणि कै. डॉ. जॅक सिकेरा यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड गोवन्स पक्षाची स्थापना झाली हे सर्वांना ठाऊक आहे.
एखादा दुसरा अपवाद वगळता म. गो. पक्षाचे सर्व आमदार हिंदू होते आणि यु. गो. पक्षाचे आमदार ख्रिस्ती. परंतु या पक्षांच्या कारकिर्दीत राजभाषेचा प्रश्न त्यांच्या नेत्यांनी पुढे आणला नाही. आणला असता तर मराठी आणि रोमी कोकणी तेव्हाच राजभाषा झाल्या असत्या. पुढे जे घडले ते सर्वांना माहीत आहे.
गोवा मुक्तीनंतर देवनागरी लिपीतील कोकणी अचानकपणे पुढे आली. तिच्या पुरस्कर्त्यांनी तिला बाल्यावस्थेतच प्रौढ बनवून अनेक मानसन्मान मिळवून दिले आणि १९८७साली मराठी आणि रोमी कोकणी या शेकडो वर्षे हिंदू व ख्रिश्चन या दोन्ही समाजांमध्ये मान्यता पावलेल्या भाषांना डावलून देवनागरी कोकणीला राजभाषापदी बसविण्यात आले. मराठी भाषेकरता लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि कोकणी भाषेकरिता जे आंदोलन झाले त्यामध्ये नव्वद टक्के आंदोलक ख्रिस्ती समाजातील होते.
आपली रोमी कोकणी राजभाषा होणार या ईर्ष्येने ते आंदोलनात उतरले होते. परंतु ज्याप्रमाणे मराठी आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसली तशीच फार मोठी फसवणूक ख्रिस्ती आंदोलकांची झाली. गोव्याच्या आणि दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेली ती महाभयंकर चूक होती. ती केवळ चूक नव्हती तर वापरात असलेल्या मराठी व रोमी कोकणी भाषांना डावलून त्यांच्यावर अन्याय करणे हे मोठे पाप होते.
त्यावेळी झालेल्या चुकीमुळे गोमंतकीय समाज तीन गटांमध्ये विभागला गेला. दिल्ली संघप्रदेशात व सिक्कीम राज्यात चार चार राजभाषा आहेत. त्यानुसार जर राज्यकर्त्यांनी सर्वसमावेशक धोरण अवलंबले असते तर तिन्ही भाषांना समान दर्जा प्राप्त झाला असता आणि गोव्यात सौहार्दाचे आणि परस्पर सहकार्याचे वातावरण तयार झाले असते.
राजू नायक म्हणतात त्याप्रमाणे गोमंतकीय समाज एकसंध झाला असता. ते न झाल्याने भाषावाद चालूच राहिला आणि त्यामुळे गोव्याच्या गेल्या तीन पिढ्यांचे भारी सामाजिक व सांस्कृतिक नुकसान झाले ते टाळता आले असते समाजात एकी नांदली असती आणि राजू नायक म्हणतात त्याप्रमाणे गोव्याला भेडसावणाऱ्या संकटांना तोंड सामर्थ्य गोमंतकीय समाजाला प्राप्त झाले असते. उशिरा का होईना कोकणी चळवळीतील दत्ता नायक व राजू नायक यांसारख्या विचारवंतांना सदर नुकसानीची जाणीव झाली आणि त्याची कबुली देण्याचे धाडसही त्यांनी दाखवले यावरून त्यांच्या विचारातील प्रामाणिकपणा आणि प्रगल्भता दिसून येते.
आजवर भाषावादामुळे गोमंतकीयांचे जे नुकसान झाले आहे ते यापुढे तरी होऊ नये यासाठी गोमंतकीयांनी दत्ता नायक व राजू नायक यांनी सुचविलेल्या तोडग्यावर गंभीरतेने विचार करावयास हवा. मराठी ही गोव्याची भाषाच नव्हे ती बाहेरची भाषा असा अनेकांनी प्रचार केला. परंतु अशा प्रचाराने ती नामशेष होत नाही हे त्यांच्या लक्षात आता आले असले पाहिजे.
शेकडो वर्षांपासून मराठी गोमंतकाची भाषा होती आणि यापुढेही राहणार आहे. शेकडो वर्षापासून मराठी भाषा घट्ट पाय रोवून असल्यामुळे तिला उखडून टाकणे कुणालाच शक्य नाही. याकरता इतर भाषांनी तिच्यासोबत राहणेच योग्य. रोमी कोकणीबाबत आक्षेप घेतला जातो तो तिच्या लिपीबाबत. रोमन लिपी परक्यांची असल्यामुळे तिला मान्यता देऊ नये असे काहींचे म्हणणे. त्या भाषेची लिपी परकी असली तरी भाषा भारतीयच आहे ना!
रोमन लिपीतील मराठी, इंग्रजी भाषा जर आपल्याला चालले तर रोमी लिपीतील कोकणी चालवून घ्यायला काय हरकत आहे? म्हणून कुठल्याही भाषेबद्दल आक्षेप न घेता आणि कुणालाही सवत न मानता तिघींनीही एकत्र नांदावे आणि भूमिपुत्रांचे भविष्य उज्ज्वल व्हावे. शेवटी राजभाषा कायद्यात बदल करणे हे राज्यकर्त्यांच्या हातात. जे काय करायचे ते तेच करू शकतात. म्हणून राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की गोव्याच्या भाषा क्षेत्रात जे नवीन वारे वाहू लागले आहेत. त्यांची दखल घेऊन पूर्वसुरींनी केलेल्या महान चुका सुधारण्यासाठी पावले उचलावी व भाषावादाचा शेवट गोड करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.