Goa History: औरंगजेबाच्या मुलाने डिचोली परिसरातील मंदिरे उद्ध्वस्त केली; छत्रपती संभाजीराजांनी मुघलांना हाकलून देण्याची योजना आखली

Chhatrapati Sambhaji Maharaj Battle: बादशहा औरंगजेबाचा मुलगा मुअज्जमच्या सैन्याने डिचोली व आजूबाजूच्या गावातील मंदिरे उद्ध्वस्त केली.
Chhatrapati Sambhaji Maharaj Battle In Goa
Chhatrapati Sambhaji Maharaj GoaX
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

छत्रपती संभाजी राजांना पोर्तुगिजांच्या दुटप्पी धोरणाचा पहिल्यापासून अनुभव होता. मुघलांशी संधान साधून कोकण काबीज करण्याचा त्यांचा बेत राजांनी आपल्या युद्धकौशल्याने हाणून पाडला होता. मुघल व मराठे यांच्या लढाईत छत्रपती संभाजी महाराजांचा, खात्रीने पराजय होईल असे व्हॉइसरॉय कोंदि द आल्व्होरला वाटत होते.

पोर्तुगीज व मुघल यांच्यातील तहामुळे संभाजी राजांनीही आपले सामोपचाराचे धोरण बदलून चढाईचे धोरण स्वीकारले. पोर्तुगिजांनी मुघलांशी हातमिळवणी केल्याने, मराठे मुघलांच्या धोक्यापुढे झुकतील असे गृहीत धरून पोर्तुगिजांनी फोंडा कोट जिंकण्यासाठी फोंड्यावर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला.

छत्रपती संभाजी महाराज यांना पोर्तुगिजांच्या संभाव्य धोक्याची कल्पना होती आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी गोव्यातील फोंडा किल्ला आधीच सुरक्षित केला होता. फोंड्याचा वेढा उठविल्यानंतर संभाजी राजे पन्हाळ्यास जातील अशी व्हॉइसरॉय कोंदि द आल्व्होरची समजूत होती. परंतु ही समजूत चुकीची ठरली, त्यातच पोर्तुगिजांनी मुघल आरमारास आपल्या हद्दीतून जाण्याची परवानगी दिली होती. मुघल आरमार धान्य घेऊन गोव्यातून कोकणात जाणार होते. ही मदत थांबावी म्हणून संभाजी महाराजांनी आपल्या सैन्यास गोव्याच्या परिसरात नेले होते.

बादशहा औरंगजेबाचा मुलगा मिर्झा मुहम्मद मुअज्जम ज्यांना शाह आलम पहिला म्हणून ओळखले जाते याला१६८१मध्ये, औरंगजेबाने त्याचा बंडखोर सावत्र भाऊ सुलतान मुहम्मद अकबर याची घोडदौड थांबवण्यासाठी दख्खनला गोव्यात पाठवले. १६८३मध्ये, बंडखोर सावत्र भाऊ सुलतान मुहम्मद अकबर देश सोडून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी औरंगजेबाने कोकण प्रदेशात कूच करण्याचे आदेश दिल्यानंतर मुअज्जमच्या सैन्याने २८ डिसेंबरला बांदे हे कोकणातील शहर जाळून टाकले.

१५ जानेवारी १६८४ रोजी त्याने डिचोली जाळून टाकली. मुअज्जमच्च्या सैन्याने भतग्राम किंवा आताचे डिचोली व आजूबाजूच्या गावातील मंदिरे उद्ध्वस्त केली आणि वेंगुर्ले बंदर लुटले. मुघल सैन्याला अन्नाचा प्रचंड तुटवडा होता, त्यांचे सैनिक उपाशी होते, म्हणून त्याने सुरतेचा सरदार खैरतखान आणि याकुतखान यांना अन्नसाठा पाठविण्याचे आदेश दिले.

मुअज्जमने पोर्तुगिजांनी मंजूर केलेल्या अन्नसाठ्यांसह त्याच्या जहाजांना जाण्याची परवानगी मागितली. पोर्तुगिजांनी मुअज्जमकडे एक वकील पाठवून कोकणातून माघार घेऊ नये आणि संभाजींविरुद्ध लढत राहावे अशी विनंती केली. कारण मराठ्यांशी युद्धात पोर्तुगिजांचे २० लाखांहून अधिक नुकसान झाले होते.

तथापि, प्रत्यक्षात पोर्तुगिजांचा असा कोणताही करार झाला नाही कारण मुअज्जमला पाठवलेले अन्नसाठा घेऊन जाणारे जहाज गोव्यात पोहोचले नाही. कारण या जहाजांची माहिती मिळाल्यावर वेगवेगळ्या मराठा समुद्री किल्ल्यांच्या किल्लेदारांनी जहाजांवर हल्ला केला आणि त्यांना पकडले. काही जहाजे पळून गेली पण त्यांच्याकडे पुरेसा अन्नसाठा नव्हता. मुअज्जमला कोकणातून परतण्याचा आदेश मिळाल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोकण सोडण्याचा त्याने निर्णय घेतला. परतताना, अन्नाची कमतरता, मराठ्यांचे सततचे हल्ले आणि आजार यामुळे रामघाटातून जाताना मुघल सैन्याला खूप त्रास सहन करावा लागला.

जेव्हा मुअज्जमने रामघाट ओलांडला तेव्हा त्याच्याकडे थोडेच घोडेस्वार शिल्लक राहिले होते, मराठे सतत गनिमी काव्याने त्याच्यावर हल्ला करत. एप्रिल-मे १६८४मध्ये, मुअज्जम विजापूरजवळील गावात राहिला, जून महिन्यात तो भिमा नदीच्या काठावर पोहोचला जिथे त्याने ५,००० मराठा सैनिकांशी युद्ध केले आणि युद्धात तो जखमी झाला.

मुअज्जमची गोव्याची मोहीम अपयशी ठरली कारण मुघलांनी ६०,००० सैनिक, शेकडो उंट, तोफखाना, लाखो रुपये गमावले. १६८४च्या पावसाळ्यानंतर, बादशहा औरंगजेबाचा दुसरा सेनापती शाहबुद्दीन खान याने थेट मराठ्यांची राजधानी रायगडवर हल्ला केला. मराठा सेनापतींनी रायगडचे यशस्वीपणे रक्षण केले. औरंगजेबाने खानजहानला मदत करण्यासाठी पाठवले, परंतु मराठा सैन्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांनी पाटडी येथे झालेल्या भयंकर युद्धात त्याचा पराभव केला. मराठा सैन्याच्या दुसऱ्या तुकडीने पचाड येथे शाहबुद्दीन खानवर हल्ला केला आणि मुघल सैन्याचे मोठे नुकसान केले.

Chhatrapati Sambhaji Maharaj Battle In Goa
Goa History: ..आणि पोर्तुगिज व्हॉइसरॉय थोडक्यात बचावला! छत्रपती संभाजी महाराजांची गोव्यातील पराक्रमाची गोष्ट

औरंगजेबाने त्याचा मुलगा मुअज्जम म्हणजे शाह आलम पहिला याला आणि इतर सरदारांना या स्वारीवर पाठवले होते. २० ऑगस्ट १६८३ ते २४ मे १६८४ पर्यंत ही स्वारी चालली. प्रत्यक्ष लढाईच्या काही घटना घडल्या. मोहिमेच्या शेवटी परिस्थिती तशीच राहिली. निजामपूर आणि रामघाट ते वेंगुर्ला दरम्यानचा मुख्य रस्ताच उद्ध्वस्त झाला होता. मुघल जहाजांना फक्त धान्य वाहतुकीसाठी मोठे नुकसान सहन करावे लागले.

धान्याचा बराचसा भाग संभाजी महाराजांच्या हाती लागला आणि काही जहाजे समुद्रात बुडाली. पुढे १६८९साली छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांना पूर्णपणे हाकलून देण्याची योजना आखली. त्यामुळे त्यांनी संगमेश्वर येथे बैठक आयोजित केली. त्यावेळी संभाजी राजे त्यांचे मित्र आणि सल्लागार कवी कलश आणि काही विश्वासू लोक त्यांच्यासोबत होते. कारण ती बैठक अत्यंत गोपनीय होती. मुकर्रबखान या मुघल सेनापतीला संभाजी राजे संगमेश्वरला आल्याची बातमी कळली.

Chhatrapati Sambhaji Maharaj Battle In Goa
Goa History: गोव्यात ख्रिस्तीकरण, मंदिरे उद्धवस्त करण्याच्या पोर्तुगिजांच्या मनसुब्यांना शिवरायांच्या एका मोहिमेमुळे खिळ बसली

फेब्रुवारीमध्ये संगमेश्वर येथे झालेल्या चकमकीत संभाजी राजे आणि त्यांच्या सल्लागारांना मुकर्रबखानच्या मुघल सैन्याने पकडले. पकडलेले छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील, तालुका- श्रीगोंदा, मौजे पेडगाव या गावातील बहादुरगडावर (नवीन नाव धर्मवीरगड) नेण्यात आले. जेथे औरंगजेबाने त्यांना विदूषकाचे कपडे घालून अपमानित केले.

मराठा दस्तऐवज असे सांगतात की त्यांना बादशाह औरंगजेबासमोर नतमस्तक होण्याचा आणि इस्लाम स्वीकारण्याचा आदेश देण्यात आला होता. आणि त्यांनी तसे करण्यास नकार दिला. औरंगजेबाने छत्रपती संभाजी आणि कवी कलश यांना मृत्युदंड देण्याचे आदेश दिले. या प्रक्रियेला पंधरा दिवस लागले. त्यांचे डोळे काढले, जीभ छाटली, त्यांची नखे उपटून काढली, त्यांची त्वचा सोलून काढली. शेवटी ११ मार्च १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे शरीर वाघनखांनी पुढच्या आणि मागच्या बाजूने फाडून टाकले. शेवटी पुण्याजवळ भीमा नदीच्या काठी तुळजापूरला कुऱ्हाडीने शंभूराजांचा शिरच्छेद केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com