Aguada Fort: शिवरायांची बार्देश स्वारी, फ्रेंच आक्रमण, मुक्ती संग्रामातील क्रांतिवीर; शेकडो वर्षांचा इतिहास जपणारा 'आग्वाद किल्ला'

Aguada Fort History: गोवा मुक्ती संग्रामातील डॉ. राम मनोहर लोहिया, ना. ग. गोरे, सेनापती बापट यांची रवानगी आग्वादवरच्या तुरुंगात करण्यात आली होती. हा किल्ला क्रांतिवीरांच्या सहवासाने पुनीत झाला.
Aguada Fort History
Aguada Fort HistoryX
Published on
Updated on

अरबी सागर आणि मांडवी नदी जेथे एकमेकांना भेटतात, त्या संगम स्थळावरती लाखो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारे शिलाखंड नदीच्या मुखाजवळ वसलेले आहेत. हे शिलाखंड शेकडो वर्षांपासून जलमार्गांनी गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना आपल्या दर्शनाने अचंबित करत होते. हे शिलाखंड गोमंत भूमीचे मानदंड ठरले होते. देश विदेशातून गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना त्यांचे दुरून दर्शन झाले की कित्येक मैलांचा प्रवास करून थकलेल्या भागलेल्या व्यक्तीला ऊर्जा लाभायची.

गलितगात्र झालेल्या देहात चैतन्य संचारायचे आणि त्यामुळे आता आपण ज्या ध्येयापर्यंत परिश्रमाने पोहोचलो, त्याचे चीज होईल याचा आशावाद त्याला तजेला प्रदान करायचा. पूर्वीच्या काळी नदीनाले, सागर, महासागर यांद्वारे देश विदेशात जाण्यासाठी अस्तित्वात असलेले जलमार्ग विशेष उपयुक्त ठरले होते.

कालांतराने जेव्हा माणसाला मान्सूनच्या वाऱ्याच्या गती आणि दिशा, तसाच होणारा प्रवास यांचे ज्ञान अवगत झाले तेव्हा शिडाच्या गलबतातून जलमार्गाद्वारे प्रवास काही अंशी सुलभ झाला. वादळवाऱ्याशी झुंज देत दक्षिण आणि उत्तर भारतातून समुद्र आणि नदीमार्गे येणाऱ्या खलाशांना, त्यामुळे ही छोटेखानी जागा ऊर्जेचा स्रोत बनली होती.

या स्थळी सभोवताली मांडवी नदीचे मुख असून, भरती ओहोटीच्या नैसर्गिक चक्रामुळे खाऱ्या पाण्याचे सर्वत्र वर्चस्व असताना, ही जागा गोड्या पाण्याचे झरे असल्यामुळे प्रवाशांचा आकर्षणबिंदू बनली होती. इथल्या पाण्याचे प्राशन करण्यासाठी ते सतत उत्सुक असायचे.

गोड, चवदार आणि थंडगार पाण्याची एकदा चाखलेली चवच त्यांना कित्येक वर्षांपासून इथे घेऊन यायची. या पाण्यातच त्यांना जीवनाचा साक्षात्कार झाला होता. भारताविषयीच्या सुखसमृद्धीच्या असंख्य कथा वदंता जगभरात पसरलेल्या असल्याने, त्याच्या प्रचंड आकर्षणामुळे प्रवासी, खलाशी, यात्रेकरू गोव्याकडे यायचे.

पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात तुर्कांनी इस्तांबुल काबीज केले आणि त्यामुळे खैबर खिंडीतून पारंपरिक मार्गाचा अवलंब करून भारतात येण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली.

युरोपातल्या राज्यकर्त्यांनी धाडसी दर्यावर्दी मंडळींना राजाश्रय प्रदान केल्याने, समुद्रमार्गे इथे येण्यास प्रोत्साहन लाभले. त्यामुळे पाऊस, वादळ यांचा मारा झेलून येणाऱ्यांना गोव्यात प्रवेश केल्याची प्रचिती शिलाखंडाच्या दर्शनाने व्हायची. सोळाव्या शतकात पोर्तुगाल या युरोपातल्या देशातून पोर्तुगीज दर्यावर्दी त्यांच्या नौकानयन क्षेत्रातल्या कौशल्यामुळे, धाडसामुळे अरबी सागराच्या परिसरात प्राबल्य निर्माण करू शकले.

पोर्तुगिजांच्या पाठोपाठ डच दर्यावर्दींनी पूर्वेकडच्या देशांत व्यापार, उद्योग करण्यासाठी अरबी समुद्रात आगमन केले. डचांच्या रूपात निर्माण झालेल्या प्रतिस्पर्ध्यांना शह देण्याचे पोर्तुगिजांनी निश्चित केले.

परंतु असे असताना वारंवार निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्यासाठी पोर्तुगिजांना आदिलशाही सत्तेविरुद्ध गोव्यात निर्माण झालेल्या असंतोषामुळे संधी चालून आली आणि तिचा योग्य प्रकारे पोर्तुगिजांनी फायदा घेतला आणि १५१०साली आपल्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.

तिसवाडी महाल सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात जिंकून घेतल्यावर पोर्तुगिजांनी मांडवी नदीपरिसरात तटबंदी, किल्ल्यांच्या उभारणीला प्राधान्य द्यायचे ठरवले आणि त्यामुळे त्यांनी गॅस्पर डायस, रेईश मागूश आणि काबो अशा किल्ल्यांचे बांधकाम केले.

परंतु असे असताना डच एक मोठी डोकेदुखी झाली, त्यात भर म्हणून की काय, २६ सप्टेंबर १६०४ रोजी डचांची मोझांबिकहून प्रवास करणारी गलबते, एका पोर्तुगीज गलबताला ताब्यात घेऊन मांडवीच्या मुखाजवळ थांबली होती. त्यामुळे पोर्तुगीज भयभीत झाले होते. पोर्तुगीज विसरइ दो फ्रान्सिस्को गामा याने आगामी संकट ओळखून किल्ल्यांच्या बांधकामाला विशेष महत्त्व दिले होते.

आदिलशाही सत्तेकडून तिसवाडी महाल जिंकून घेणाऱ्या पोर्तुगिजांचे नौदल याच वेळी काही अंशी दुबळे झाल्याने त्यांना मांडवी नदीच्या मुखावरचे संरक्षण सशक्त करण्याच्या हेतूने बेती वेऱ्याच्या परिसरात रेईश मागूश किल्ल्याच्या दक्षिण पूर्वेला नवीन किल्ल्याची गरज निर्माण झाली.

त्यासाठी १६१२साली या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करण्यात पोर्तुगीज यशस्वी झाले. किल्ल्याचे बांधकाम करता यावे यासाठी मांडवी नदीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून एक टक्का कर वसुली करण्याच्या बदल्यात मांडवी नदीत जहाज असेपर्यंत त्याच्या संरक्षणाची जबाबदारी पोर्तुगिजांनी घेतली होती. जलमार्गातून पुढचा प्रवास निर्धोक व्हावा म्हणून नोसा सिन्योरा वॉयेज या देवतेचे कपेल बांधण्यात आले. गोव्यात येणाऱ्या पोर्तुगीज राज्यपालांचे निवासस्थान, दारूगोळ्याचे कोठार, सैनिकांसाठी निवास व्यवस्था किल्ल्यावर बांधण्यात आली होती.

या किल्ल्याचे नाव प्रारंभी सेंट कॅथरिना असे ठेवण्यात आले. कालांतराने त्याचे नामकरण रॉयल फोर्ट असे करण्यात आले होते. समुद्र सपाटीपासून २६० फूट उंचीवर वसलेल्या या किल्ल्यावर जहाजाद्वारे येता यावे म्हणून धक्का बांधला होता. १६२४साली येथील नैसर्गिक झरीचे पाणी पिणे शक्य व्हावे या बांधकाम अ‍ॅडमिरल दो फ्रान्सिस्को द गामा यांच्या आदेशाने करण्यात आले. ‘माय द आग्वा’ या नावाची पाटी इथे बसवल्यावर हा किल्ला आग्वाद म्हणून नावारूपाला आला.

आग्वाद किनाऱ्यावर येणाऱ्या जहाजांच्या सोयीसाठी सतराव्या शतकात दीपस्तंभाची उभारणी करण्यात आली. जहाजांना मार्गदर्शक ठरलेल्या या दीपस्तंभाचे १८१७साली नूतनीकरण करण्यात आले. त्यावेळी तेलाच्या दिव्याची सोय केली. कालांतराने सेंट ऑगस्टीन मनोऱ्यावरची घंटा इथे आणून घड्याळाद्वारे वेळ सूचित केली जायची.

Aguada Fort History
Aguada Fort: आग्वाद किल्ला पाहण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे, गोवेकरांच्या खिशावरही पडणार ताण

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा बार्देशवर १६६७साली आणि १६८३साली छत्रपती संभाजी महाराजांनी स्वारी केली, त्यावेळी बार्देश महालातील लोकांनी इथे आश्रय घेतला होता. १६८४साली औरंगजेबाच्या युद्ध नौका प्रचंड सैन्यासह आल्या होत्या. सावंतवाडकर भोसलेंच्या वेळोवेळी झालेल्या आक्रमणात हा किल्ला जणू काही आश्रयस्थान ठरला होता.

गोव्यावर जेव्हा फ्रेंच आक्रमणाचे संकट निर्माण झाले, तेव्हा १७९९ ते १८१५पर्यंत ब्रिटिश सैन्याचा तळ आग्वाद किल्ल्यावर पडला होता. पोर्तुगीज साम्राज्याला आव्हान देण्यासाठी जेव्हा गोव्यात राणेंचे उठाव झाले. त्यावेळी बंडातल्या पुढाऱ्यांना आग्वादवर तुरुंगात ठेवले जायचे.

Aguada Fort History
Aguada Fort Illegal Construction: आग्वाद येथील बेकायदेशीर बांधकामामुळे वारसा आणि पर्यावरणाला धोका!

दादा राणे आणि त्यांच्या साथीदारांना आग्वादहून तिमोरला पाठवले होते. गोवा मुक्ती संग्रामातील डॉ. राम मनोहर लोहिया, ना. ग. गोरे, सेनापती बापट यांची रवानगी आग्वाद किल्ल्यावरच्या तुरुंगात करण्यात आली होती.

त्यामुळे हा किल्ला केवळ पोर्तुगीज अमदानीतल्या असंख्य कटू आठवणीचा साक्षीदार राहिला नाही, तर तो क्रांतिवीरांच्या सहवासाने पुनीत झाला होता. शेकडो वर्षांच्या इतिहासाच्या आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींच्या आठवणी या किल्ल्याकडे, झऱ्यांकडे आणि शिलाखंडाकडे आहेत. गोमंतकाच्या जलमार्गाचा शोध लागल्यापासून हा परिसर देश विदेशातल्या यात्रेकरू खलाशी यांच्यासाठी चैतन्यशाली संचित ठरलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com