Goa Corgao Sarpanch Abdul Naik
लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार व घटनात्मक पद्धतीचा अवलंब करून विहित मार्गाने निवडून आलेल्या कोरगाव सरपंच अब्दुल करीम नाईक यांची दहशतवादी कसाबशी केलेली तुलना आणि त्यांना पायउतार करण्यासाठी देण्यात आलेली धमकी ही झुंडशाही झाली.
आपले देशप्रेम सिद्ध करण्यासाठी स्वत:मधील राष्ट्राभिमान, पूर्वजांच्या गोवा मुक्ती लढ्यातील योगदानाच्या उजळणीची वेळ तरुण सरपंचावर यावी ही गोव्यासाठी शरमेची बाब ठरते. गोव्यात हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम वर्षानुवर्षे एकोप्याने राहत आहेत. याच एकीच्या बळावर दिवंगत मनोहर पर्रीकरांनी राजकीय अस्थिरतेवर मात करून बारा वर्षांपूर्वी पूर्ण बहुमतातील सरकार प्रस्थापित करण्याची किमया साध्य केली होती.
देशाच्या राजकारणात गोव्याने एकतेचा मापदंड निर्माण केला. अशी देदीप्यमान परंपरा काही घटक जाणीवपूर्वक धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी प्रा. वेलिंगकरांनी केलेले भाष्य आणि त्यानंतर निर्माण झालेल्या तणावातून गोवा आता कुठे सावरत असतानाच कोरगावात सरपंचपदी मुस्लीम व्यक्ती विराजमान झाल्याने करण्यात आलेली नीचतम पातळीची संभावना अशोभनीय आहे.
सरकार खरेच धार्मिक सलोखा जपत असेल तर पोलिसांनी धार्मिक एकोप्याला धोका निर्माण करणाऱ्यांवर खटले दाखल करायला हवेत. कोरगावातील प्रकार यमनियमांच्या विरोधातील आहे. सत्याचा अपलाप करण्याचे षड्यंत्र त्यात दिसते. गोव्यात समान नागरी कायदा आहे. त्याचे अनुकरण देश करू पाहत आहे. अशा सहिष्णू राज्यात घटनात्मक पद्धतीने निवडून आलेली व्यक्ती मान्य नसेल तर त्याला दूर करण्यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत.
देशात राष्ट्रपतींपासून सरन्यायाधीशांनाही पदावरून दूर सारण्यासाठी महाभियोग चालवता येतो. सरपंचपदावरून दूर करण्यासाठी ती व्यक्ती का लायक नाही, हे सिद्ध करून ‘अविश्वास’ आणण्याची कायद्यात सोय आहे. केवळ सरपंचाचा धर्म मुसलमान आहे म्हणून त्याला समर्थन देणाऱ्या पंचांवर दबाव टाकणे अशोभनीय आहे.
झुंडशाहीचे प्रदर्शन करून धमकी देण्याची कृती समर्थनीय नाही. गोव्यात बहुतांश भागांत मुस्लीम पिढ्यान्पिढ्या राहत आहेत. कोरगावात अब्दुल नाईक यांच्या अनेक पिढ्या झाल्या आहेत. ते आपले आजोबा स्वातंत्र्यसैनिक असल्याचे सांगतात. ‘तत्कालीन सरकारने ताम्रपट देऊन सन्मान केला, आमचे घराणे देशप्रेमी आहे’, असे सांगण्याची वेळ मुलसमान असल्याने येत असल्यास ते दुर्दैवी आहे. धर्माच्या नावाने लोकांच्या भावनांना हात घालून मूळ मुद्यांवरून लक्ष विचलित करून काय साध्य होते?
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य अशा समस्यांवर आम्ही चर्चा करत नाही. निवडक विषयांवर धार्मिक अंगाने राजकारण करणे नास्तिक, बेरकी, धूर्तपणाचे लक्षण झाले. धार्मिक एकोप्याला नख लावण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी गोव्यातील समाज विचारी आहे. गोव्यात कधीही दंगली झालेल्या नाहीत. त्या व्हाव्यात असा जे कुणी प्रयत्न करत आहेत, ते आपलाच पाय कुऱ्हाडीवर मारून घेत आहेत.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोरगाव सरपंचांविरुद्ध त्यांच्या धर्मावरून घेतलेली भूमिका हिंदूंनाच पसंत पडणारी नाही. ज्या महिला पंचांनी त्यांना निवडून दिले त्यांना अब्दुल यांचा धर्म माहीत नव्हता की, आपला धर्म माहीत नव्हता? दोनही माहीत होते. त्याहीपलीकडे जाऊन त्यांना ही व्यक्ती सरपंचपदासाठी योग्य आहे, हे माहीत होते. बरे जे विरोध करत आहेत, त्यांनाही करीम यांच्याविरुद्ध धर्म वगळता अन्य कुठलाही मुद्दा सापडत नाही.
‘हिंदूबहुल भागामध्ये मुस्लीम व्यक्ती कशी सरपंच होते?’ हा प्रश्न विचारणाऱ्यांना मग ‘मुस्लीमबहुल भागामध्ये हिंदुत्ववादी राजकारण्यास मते मिळत नाही हे लोकशाहीस मारक आहे’, असे म्हणण्याचा अधिकारही उरत नाही. केवळ मुस्लीम म्हणून विरोध करणे हे लोकशाहीच्या मूल्यांसाठी अत्यंत घातक आहे. ‘गोंयकार’ म्हणून आपली ओळख केवळ हिंदूंपुरती मर्यादित नाही. इथला प्रत्येक मुसलमान, प्रत्येक ख्रिश्चन, नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती ‘गोंयकार’ आहे. ही द्वेषाची बिजे पेरून जे काही उगवेल ते सोसण्याची ताकद या हिंदुत्वाच्या अतिकट्टर विचारधारेत आहे का? यातून होणारी सामाजिक हानी गोव्याला परवडणार आहे का?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.