
‘द स्ट्रेंजर’ या मध्यमवर्गीय समाजाच्या अस्तित्ववादाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या अल्बर्ट कॅम्यु यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित अंतरा भिडे यांनी केलेले हे नाट्यरूपांतर मांगिरीश यूथ क्लब मंगेशी या संस्थेने सादर केले. नाटकाची संकल्पना आणि दिग्दर्शन दक्षा शिरोडकर यांचे होते. ज्यूडच्या आईचा आणि त्याच्या स्वतःच्या मृत्यू दरम्यानचे नाटकाचे कथानक असून, संहितेत जीवनाची निरर्थकता, भ्रम आणि अस्तित्ववादाच्या संकल्पनेतून मृत आई आणि मुलगा यांचे दृश्य कल्पकतेने योजले आहे.
मुंबईला कंपनीत कामाला असलेल्या ज्यूडला त्याची वृद्धाश्रमात असलेली आई वारल्याचे कळल्यावर तो तिच्या अंतिम संस्काराला काहीसा उशिरानेच येतो. तिच्या मृतदेहाचे दर्शन न घेता निर्विकारपणे धूम्रपान करतो. लगेच दुसऱ्या दिवशी कामावर रुजू होऊन तो आपल्या ऑफिसमधील मैत्रिणीबरोबर मौजमजा करतो.
आपला शेजारी आणि मित्र असलेल्या राजाला तो त्याच्यापासून दूर गेलेल्या, राजाच्या दृष्टीने संशयित असलेल्या प्रेयसीला पत्र लिहिण्यास मदत करतो; जेणेकरून ती परत आल्यावर तो तिचा बदला घेऊ शकतो. आपल्या कृत्याबद्दल, त्याच्या प्रेयसीच्या भावनांबद्दल त्याला काही देणेघेणे वाटत नाही. तसेच नंतर तिला राजाने क्रूरपणे छळताना पाहिल्यावरही तो त्याला अडवत नाही.
दरम्यान, ज्यूडचा बॉस त्याला कंपनीच्या जपानच्या ऑफिसमध्ये जाण्यासंबंधी विचारतो तेव्हा तो होकार देतो. तसेच त्याची प्रेयसी त्याला लग्न करशील का म्हणून विचारते तेव्हाही तो तिच्या समाधानासाठी होय म्हणतो.
सावियो या त्याच्या मित्राने आपल्या पत्नीच्या निधनानंतर एक मॅक्स नावाचा कुत्रा पाळलेला असतो. त्याच्याशीही तो तुटकपणाने वागतो. सावियोच्या मागावर असलेल्या माणसापासून रक्षण करण्यासाठी त्याने आणलेले पिस्तूल ज्यूड आपल्याकडे ठेवतो आणि त्याच फिस्तुलातून सावियोला मारायला आलेल्या माणसाचा स्वतः खून करतो. त्याच्यावर खटला चालवला जातो. आपण खून न केल्याचेही चौकशीदरम्यान सांगत नाही. खटला चालवताना ज्यूडने खून केल्याचा पुरावा मांडताना तो आपल्या आईच्या अंत्यसंस्कारात रडला नाही व अन्य साक्षीवरून त्याच्या क्रूरतेचे प्रमाण मानून त्याला फाशीची शिक्षा दिली जाते.
पुढे संहितेत लेखिकेने एका कल्पक दृश्याची योजना करून मेलेली आई आणि मुलगा यांचे संभाषण घडविले आहे. आईने मृत्यूसमयी जीवनाशी केलेल्या संघर्षाची कल्पना त्याला येते. या दृश्यामध्ये लेखिका भ्रम विरुद्ध वास्तवता आणि कल्पना विरुद्ध वस्तुस्थिती याचे यथांग दर्शन घडविताना, माणसाची अगतिकता, एकाकीपणा आणि रिक्तपणा यावर जळजळीत प्रकाश टाकते.
दिग्दर्शिका दक्षा शिरोडकर यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे दिसून आले. नाटकाचे प्रत्येक दृश्य आणि त्या दृश्यातील प्रत्येक क्षण जिवंत करण्याचा त्यांचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. ‘एबसर्ड’ संज्ञेचा जनक अल्बर्ट कॅम्यु यांच्या कादंबरीतील नाट्य साकारताना, आपल्या नाटकातील पात्रांच्या इच्छा-आकांक्षा आणि भोवतालचे अर्थशून्य जग यातील संघर्ष त्यांनी अचूकपणे टिपला.
त्यांनी पात्रांना दिलेल्या हालचाली, रंगमंचावरील वावर, तसेच मोठ्या दृश्यांची, छोट्या दृश्यांची आणि ‘मायक्रो’ दृश्यांची विविधतेने केलेली योजना, मुख्य नायकाच्या मनावर परिणाम करून त्याला अपेक्षित ‘डिलिरियम’च्या अवस्थेकडे पोहोचवण्यास मदत झाली.
ज्यूडच्या फाशीचा कल्पक दृश्यबंध त्याच्या मृत्यूच्या वेळी हळूहळू होणारे व्यक्तिमत्त्वाच्या विसर्जनाचे चित्र वाटले. शेवटचे आई आणि ज्यूड यांचे स्वर्गात किंवा अवकाशाच्या एका विशिष्ट स्थानी दृश्य दाखवून, विश्वाची निरर्थकता स्पष्ट करताना, माणसाने स्वतःची मूल्ये हुडकून काढणे किती गरजेचे आहे, याचे विभिन्न हालचाली, अभिनय, संवादफेक तसेच आई आणि ज्यूड यांच्या परस्पर संबंधांतून, अन्योन्य क्रियांमधून अचूक दर्शन घडविले आहे.
उगम जांभवलीकर यांनी आपल्या भूमिकेचा सखोल अभ्यास केल्याचे जाणवले. नात्यांच्या चाकोरीत यंत्रवत अडकलेला, याच नात्यामुळे जीवनाच्या घटनाक्रमांमध्ये गुंतागुंतीचे आयुष्य जगणारा, एका मोठ्या यंत्राचा ‘स्पेअर पार्ट’ वाटणाऱ्या, व्यक्त होण्यासाठी दुसरे मन शोधण्याचा प्रयत्न करणारा, ते न सापडल्यामुळे स्वतःच्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणारा, आईच्या आठवणीने संदिग्ध होणारा, अवकाश आणि काळाच्या भव्य आणि विशाल पोकळीत जगणारा, नाती हरवलेला व आपले ‘स्व’त्व शोधण्याचा अविरत प्रयत्न करणारा, तीव्र मानसिक गोंधळ असलेली, ज्यूड ही व्यक्तिरेखा त्याने संयत अभिनय आणि शून्यतेकडे असणाऱ्या नजरेतून समर्थपणे उभी केली. आपल्या कृति-उक्तींतून, उपरोधपूर्ण संवादांतून त्यांनी बोलण्यातील, वागण्यातील खोटेपणाचा डौल उघडा पाडून भूमिकेस साजेसे वातावरण निर्माण केले.
टीनाची भूमिका करणाऱ्या आकांक्षा प्रभू यांनी आपल्या भूमिकेतील बारकावे नीट शोधून काढल्याचे दिसून आले. तिच्या भूमिकेतील अल्लडपणा, वैताग, प्रेम, विरह हे गुण तिने आपल्या अभिनयातून व्यवस्थितपणे दाखवल्याचे दिसले. आई आणि सुनीता या दुहेरी व्यक्तिरेखांत शेफाली नाईक शोभून दिसल्या. आईच्या भूमिकेतील धीरगांभीर्य, पोक्तपणा, मिश्कील हसू, हालचाली, वात्सल्य आणि सुनीताच्या व्यक्तिरेखेतील अल्लडपणा, आशिकता-प्रेम, द्वेष, भूमिकांना अनुसरून आपल्या शरीरांकृतीत बदल भासवण्याचे कसब त्यांनी साधल्याचे दिसले.
राजा या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचे, वर्चस्व गाजवणाऱ्या बॉस आणि सेल मेटची भूमिका मंगेश नाईक यांनी व्यवस्थितरीत्या सादर केली. प्रेयसीच्या गळ्यात ओढणी अडकवून तिला कुत्र्यासारखी वागणूक देणारा अभिनय सुरेख वाटला. सावियो झालेले गौतम जांभळे यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. मॅक्स हरवल्यानंतरचा अभिनय छान.
केअरटेकर, हवालदार, सलमान या छोट्या-छोट्या भूमिकांत प्रतीक खराटे चमकून दिसले. तसेच वकिलाच्या भूमिकेत सुबोध ढवळीकर यांनी छान अभिनय केला. गुंड व जेलर अनिश भावे यांनी केले. कोरस सतीश गावकर, नहुश अध्यापक, मोहनदास चारी, सुयश गावडे, आदर्श गोवेकर, श्रीगणेश करंडे, फऱ्हाद शेख, व्यंकटेश धारवाडकर, भवेश, सुरेश.
नाटकाचे नेपथ्य मोहनदास चारी व सतीश गावकर यांनी अतिशय कल्पकतेने तयार करून, नेपथ्याद्वारे नाटकातील पात्रांच्या हालचालींना आणि उपरोधपूर्ण संवादांना विशिष्ट दिशा मिळवून दिल्यामुळे, मानवी संबंधांतील आणि विश्वाच्या रितेपणाचा अनुभव प्रतीत झाला. प्रकाशयोजना तेजस खेडेकर यांनी किरकोळ गोष्टी सोडल्यास अत्यंत प्रभावीपणे सांभाळली. नेपथ्यात वापरलेल्या विशेष दिव्यांचा वापर प्रभावशाली वाटला.
दिलीप वझे यांच्या पार्श्वसंगीताने विशेष प्रभाव पाडला. ‘‘येरे सोन्याच्या बाळा जग हे अन्यायी; आतुरतेने वाट तुझी वाट तुझी बघ पाहात मी राहे...’ हे गीत विशेष परिणामकारक ठरले. त्याबद्दल ते रचणाऱ्या व गायक-वादक टीमचे खास अभिनंदन. याच गीताची शेवटच्या प्रवेशातील धून बरेच काही सांगून गेली. डब्बा फोडताना होणारा आवाज व कंपन नसणारा लाकडी पट्टा मारल्यासदृश आवाज सादरीकरणाच्या शैलीत फिट बसले. अनिकेत नाईक यांनी वेशभूषेवर विशेष प्रयत्न घेतल्याचे दिसले. हर्ष नाईक यांची रंगभूषा प्रयोगास साजेशी होती.
भारतीय घटनांचा आधार घेऊन लिहिलेल्या, माणसाच्या नैतिकतेवर आणि नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या भारतीय समाजाचे, न्याय व्यवस्थेचे, राजकारणाचे विदारक चित्रण या संहितेत मांडलेले आहे. अल्बर्ट कॅम्युया आणि सार्त्र यांच्या जागतिक असलेल्या तत्त्वज्ञानातून नाटक मांडताना, अल्बर्ट कॅम्युया यांच्याच कादंबरीचा आधार न घेता संहितेतील विषयाची मांडणी केली असती तर गोव्यातील एक स्वतंत्र नाट्यसंहिता आणि तिचा प्रयोग हा मान खचितच मिळाला असता. तसेच स्पर्धेच्या नाटकाचा ‘ब्रोशर’ (माहितीपत्रक) देऊन नाटक सोपे करून सांगण्याची गरज होती का?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.