Inspirational Story: गोव्यात भीषण अपघात, पत्नीने सोडली साथ; मुलाला सांभाळत अभिनेता चंद्रचूडचं 'जोश'पूर्ण कमबॅक
Bollywood Actor Chandrachur Singh journey
पणजी: बॉलीवूडमधून नवीन चेहरे दिवसेंदिवस समोर येत असतात. काही चेहरे आपल्या धाकड अभिनयाच्या जोरावर यशस्वीही होतात. तर काहींना अपयशाला सामोरं जावं लागतं. क्षेत्र कोणतंही असो जो टिकून राहिला तोच शेवटपर्यंत मजल मारु शकतो.
वर्ष 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'माचीस' या सिनेमामधून ओळख मिळवलेला असाच एक चेहरा म्हणजे चंद्रचूड सिंग. सिंग यांच्या कारकिर्दीची सुरुवात जरी जोरदार झाली असली तरीही नियतीच्या विपरीत खेळीमुळे त्यांना कठीणाईचा सामना करावा लागलाच, मात्र खचून न जात अथक मेहनत करत चंद्रचूड यांनी देखील नवीन सुरुवात करत यशाला गवसणी घालून दाखवलं.
आयुष्याला कलाटणी देणारा अपघात:
चंद्रचूड यांना करिअरच्या सुरुवातीला 'जोश', 'दिल क्या करे', 'आमदानी अठन्नी खर्चा रुपय्या' अशा अनेक नावाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, मात्र नशीब आणि मेहनत यांची योग्य सांगड घालून चंद्रचूड सिंग वाटचाल करत असतानाच नियतीने घाला घातला.
गोव्यात सहलीसाठी गेलेल्या चंद्रचूड यांचा अपघात झाल्याने यशस्वी वाटचाल करीत असताना त्यांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. एका मुलाखतीत चंद्रचूड या अपघाताबद्दल सांगतात की, गोव्यात जेट स्कीइंग करताना त्यांच्या हाताची पकड सुटली, परिणामी उजवा हात खांद्याच्या सांध्यातून निघाल्याने त्यांना मोठ्या शास्त्रक्रियेला तोंड द्यावं लागलं होतं.
मात्र संकट इथेच थांबलं नाही. शस्त्रक्रिया आणि औषधांमुळे शरीरावर होणारा थेट परिणाम दिसून येऊ लागला. बॉलीवूडच्या दुनियेत काम करणारा माणूस हा सर्वांगसुंदर असावाच लागतो आणि म्हणून चंद्रचूड यांच्यासमोर काही वेळ कामापासून दूर राहाण्याशिवाय इतर पर्याय उपलब्ध राहिला नाही.
लग्न, घटस्फोट आणि मुलाचे पालकत्व:
या कालावधीत चंद्रचूड यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील काही महत्वाचे बदल घडत होते. सिनेसृष्टी आणि मीडिया यांच्यापासून दूर असलेल्या या काळात चंद्रचूड सिंग यांनी अवंतिका मंकोटीया यांच्यासोबत अगदीच घरच्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.
अवंतिका आणि चंद्रचूड यांच्या लग्नाच्या काही वर्षातच या दांपत्याने एका मुलाला जन्म दिला. वरवर सुखी दिसणाऱ्या या कुटुंबाची खरी कहाणी मात्र वेगळीच होती. मीडियापासून वेळोवेळी वैयक्तिक आयुष्य दूर ठेवणाऱ्या चंद्रचूड यांच्या दुभंगलेल्या संसाराबद्दल चर्चांना उधाण येऊ लागलं.
पुढे चंद्रचूड सिंग यांनी समोर येत पालकत्वाबद्दल माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्या मते मुलाचा एकतर्फी सांभाळ करणं ही कठीण गोष्ट आहे. सोशल मीडियावर सिंगल पेरेंट म्हणून ओळख निर्माण करण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या मुलावर जास्तीत जास्त लक्ष महत्वाचं वाटतं.
ते म्हणतात की सोशल मीडिया हाताळणं त्यांना जमतही नाही मात्र त्यांचा लहानगा मुलगा यात त्यांची बऱ्यापैकी मदत करत असतो. एकंदरीतच चंद्रचूड सिंग यांच्यासाठी त्यांचा मुलगा हाच आनंदाचे साधन आहे. शिवाय संगीतामध्ये देखील मन रमत असं ते म्हणतात.
अनेक वर्ष विविध कठीण प्रसंगांना तोंड देणाऱ्या चंद्रचूड सिंग यांनी आता पुन्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. अलीकडेच सुश्मिता सेन यांच्या सोबत आर्या या वेब सिरीजमध्ये काम करत त्यांनी कामाचा श्रीगणेश केला.
चंद्रचूड यांच्या आयुष्यातील असे प्रसंग पहिले म्हणजे बॉलीवूड केवळ दुरुनच साजरं वाटतं. बाकी कठीण प्रसंग आणि चढ-उतार हे प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहेत. या-ना-त्या प्रसंगांमधून नियती माणसाची परीक्षा घेत असते त्यामुळे जो इथे टिकून राहिला आणि जिद्दीने लढत राहिला त्याचाच विजय निश्चित असतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.