IFFI 2024: अर्थपूर्ण सिनेमांचा बहारदार ऋतू; पण....

IFFI Goa: चित्रपट महोत्सवातले वेगवेगळ्या विभागातील जागतिक सिनेमा पाहताना, तसेच सिनेसृष्टीतील दिग्गजांचे विचार मास्टर क्लासमध्ये ऐकताना आजचा ‘सिनेमा’ कुठल्या भक्कम विटेवर उभा आहे याचे जे वास्तव भान येते ते तद्दन व्यावसायिक सिनेमा पाहून येत नाही. म
IFFI Goa 2024
IFFI Goa 2024 Opening CeremonyDainik Gomantak
Published on
Updated on

अर्थपूर्ण सिनेमांचा एक बहारदार ऋतू काल-परवाच आटोपला. इफ्फी नावाच्या या ऋतूची प्रतिक्षा सिनेमा रसिक वारकऱ्याच्या ध्यासानेच करत असतात. उद्घाटनाच्या दिवशी पणजीतील आयनॉक्सच्या आवारात उसळलेल्या युवा गर्दीच्या काळजातील टाळ भक्तीच्या ठेक्यातच वाजताना जाणवत होते आणि ‘सिनेमा सिनेमा’ हा जयघोष शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या लगबगीतून ऐकू येत होता.

सिनेमाची ही जादू थेट मणिपूर, हिमाचल प्रदेश, चेन्नई, केरळ या दूर गावच्या चित्रपटप्रेमींना आणि विद्यार्थ्यांना गेली वीस वर्षे गोव्यात घेऊन येत आहे.  चित्रपट महोत्सवातले वेगवेगळ्या विभागातील जागतिक सिनेमा पाहताना, तसेच सिनेसृष्टीतील दिग्गजांचे विचार मास्टर क्लासमध्ये ऐकताना आजचा ‘सिनेमा’ कुठल्या भक्कम विटेवर उभा आहे याचे जे वास्तव भान येते ते तद्दन व्यावसायिक सिनेमा पाहून येत नाही. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन जगाचे, त्यातील लोकांचे, त्यांच्या अर्थशास्त्राचे, संस्कृतीचे, परंपरांचे, सामाजिक जाणीवांचे जे दर्शन महोत्सवात घडते ते एका परीने ‘विश्वरूप’च असते. 

यंदाच्या महोत्सवात सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावणारा ‘टॉक्सिक’ तसेच आयसीएफटी युनेस्को पुरस्कृत गांधी मेडल पटकावणारा ‘क्रॉसिंग’ किंवा उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळवणारा ‘द न्यू इयर देट नेव्हर केम’ हे चित्रपट संबंधित प्रदेशातील वस्तुस्थितीचे यथार्थ दर्शन घडवतानाच ‘सिनेमा’ या माध्यमाच्या भाषेची ओळखही प्रभावीपणे करून देतात.... सिनेमाच्या ‘क्राफ्ट’चा प्रत्यय देतात.‌ समारोपीय ‘ड्राय सिझन’ या चित्रपटातील एक महत्त्वाचे पात्र जेव्हा कबुली देते की मोबाईल, इंटरनेट यासारख्या संपर्क साधण्यासाठी मदत करणाऱ्या आधुनिक घटकांपासून दूर राहून आपण चूक केली आहे, तेव्हा हमरस्त्यावर दोन्ही दिशांनी वेगाने जाणाऱ्या गाड्यांच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शकाने त्याला उभे केलेले असते.

त्यामुळे ते पात्र आजच्या गतिमान जगाला कसे पारखे झाले आहे याची वेदनादायक जाणीव दर्शकाला आपोआपच अधिक तीव्रपणे होते. सिनेमाचे खऱ्या अर्थाने ‘सिनेमॅटिक’ असणे म्हणजे ‘दृश्य आणि ध्वनी’ या माध्यमातून कथेचे सखोल स्तर  प्रेक्षकांसमोर उलगडण्याची क्षमता त्यात असणे हे असते. महोत्सवात जागतिक दर्जाचे चित्रपट पाहताना, ‘दृश्य आणि ध्वनी’ माध्यमाची हीच श्रीमंती आपण उपभोगत असतो.

यंदाच्या या महोत्सवात ‘वर्ल्ड सिनेमा’ पाहण्यासाठी सिनेमागृहे  हाऊसफुल्ल होत असतानाच इंडियन पॅनोरमा विभागातील सिनेमांसाठी मात्र तिकिटे मुबलक उपलब्ध होती. इफ्फीमध्ये अशा प्रकारचे दृश्य पहिल्यांदाच ठळकपणे दिसले. या विभागात ज्या प्रकारच्या सिनेमांना स्थान दिले होते, त्याबद्दल तर चित्रपट रसिकांनी आपली नाराजी अशाप्रकारे स्पष्टपणे दाखवून दिली नसेल ना?‌ काही वर्षांपूर्वी इंडियन पॅनोरामा विभागातील सिनेमा पाहण्यासाठी तिकिटे मिळणे दुरापास्त असायचे. मात्र गेल्या दोन वर्षात हे चित्र पालटले आहे.

असे का होते याचा विचार ‘एनएफडीसी’ने (आयोजकांनी) अवश्य करायला हवा. इंडियन पॅनोरमा विभागात असलेल्या ‘घरत गणपती’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पदार्पणीय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून या महोत्सवात पुरस्कार मिळाला. खरे तर हा चित्रपट अलीकडे घराघरात चालणाऱ्या, मेलोड्रामाचा सुकाळ असलेल्या मालिकेची जणू प्रतिआवृत्तीच होती. गणपती, एकत्रित कुटुंब पद्धती वगैरे लोकांच्या काळजाला हाक घालणाऱ्या घटकांची जुळणी अगदी आर्त शैलीने करून या तथाकथित सिनेमाचा घाट घातला गेला आहे. अशा चित्रपटांचा समावेश इंडियन पॅनोरमात होणे (आणि त्याला पुरस्कारही दिला जाणे) ही बाबच इंडियन पॅनोरमा विभाग कुठल्या दिशेने जातो आहे याची खूण होती. (महोत्सवाच्या स्पर्धा विभागात दाखल करून घेण्यात आलेला ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपटदेखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारा होता.)

अनेक गाजलेल्या चित्रपटांचे महोत्सवात किमान दोन खेळ होत असताना, यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात ग्रँड प्रिक्स तसेच सॅन  सेबेस्टियन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘लूक फॉरवर्ड’ पुरस्कार मिळवणारा ‘ऑल वी इमेजीन एज लाईट’ या पायल कपाडिया दिग्दर्शित चित्रपटाचे प्रदर्शन इफ्फीमध्ये फक्त एकदाच करण्यात आले.‌  महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, सकाळी, पहिला खेळ करवून या चित्रपटाला महोत्सवातून हद्दपारच करण्यात आले.‌‌

एका भारतीय महिला दिग्दर्शिकेने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवात इतिहास रचला होता परंतु त्याकडे दुर्लक्ष करून या चित्रपटाकडे सापत्न भावाने का पाहिले गेले याचा उलगडा अनेक चित्रपट रसिकांना झाला नाही. ही चित्रपट दिग्दर्शिका पुण्याच्या ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ  इंडिया’ या सरकार प्रणित चित्रपट शिक्षण संस्थेत शिकत असताना तिचा सरकारबरोबर झालेला वाद हे त्याच्या मुळाशी असलेले कारण असू शकते अशी कुजबुज मात्र महोत्सवाच्या ठिकाणी चालू होती. हेच जर कारण असेल तर मात्र कठीण आहे. 

यंदाच्या महोत्सवातील मास्टर क्लास विभाग मात्र अत्यंत यशस्वी ठरला. कला अकादमीच्या सभागृहात आयोजित केले गेले बहुतेक सारे मास्टर क्लास सिनेमाप्रेमींच्या भरपूर उपस्थितीत पार पडले. सुमारे 950 आसनक्षमता असलेले हे सभागृह काही मास्टर क्लासच्या वेळी हाउसफुल झाले होते तर इतर वेळी देखील 600 पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती त्यात होती. प्रत्येक मास्टर क्लासमध्ये  युवा विद्यार्थ्यांची बहुसंख्य उपस्थिती या सभागृहाने सुखदपणे अनुभवली. मास्टर क्लासमध्ये होणाऱ्या प्रश्नोत्तर सत्रांमध्येही उपस्थितांकडून अभ्यासपूर्ण आणि प्रमुख वक्त्यांना उत्साहित करणारे प्रश्न विचारले जाताना दिसत होते. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशीही (जेव्हा प्रतिनिधींची गर्दी कमी झालेली असते) रमेश सिप्पी आणि किरण जुनेजा यांच्या मास्टर क्लासच्या वेळी एक तृतीयांश सभागृह भरलेले होते. 

इफ्फीच्या निमित्ताने इफ्फीच्या मुख्यालयासमोर होणारे मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा तिथले स्टॉल हा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार होता. रविवारची संध्याकाळ वगळता इतर दिवशी त्या ठिकाणी फार कमी लोक फिरकले. ‘इफ्फिएस्टा’ हा झोमॅटो या आस्थापनाने पुरस्कृत केलेला दयानंद बांडोडकर मैदानावरील ‘फूड अँड म्युझिक’ शो तर पूर्ण फ्लॉप ठरला. लोकांची तुरळक उपस्थिती पाहून या कार्यक्रमासाठी ठेवलेले तिकीट रद्द करून हा कार्यक्रम चारही दिवस लोकांना मोफत खुला करण्यात आला ‌तरी, रविवारी, सुट्टीच्या दिवशी देखील हा कार्यक्रम पाच हजार लोक जमा करू शकला नाही. भारतीय सिनेमाचा प्रवास दाखवणार्‍या ‘सफरनामा’ या प्रदर्शनाचा आणि ‘पिक्चर टाईम’ या तात्पुरत्या सिनेमागृहात सिनेमा पाहण्याचा आनंद प्रतिनिधींनी आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे घेतला.

IFFI Goa 2024
IFFI 2024: भूतानमध्ये बिग बजेट सिनेमे का बनत नाहीत? 'विथ लव्ह फ्रॉम भूतान’च्या दिग्दर्शकेचे मत जाणून घ्या

इफ्फीची खरी जादू अर्थपूर्ण सिनेमातच आहे ही बाब गेल्या वीस वर्षात लोकांनी ओळखली आहे. महोत्सवात चांगल्या सिनेमावर जेवढा भर दिला जाईल तितकाच हा महोत्सव यशस्वी ठरणार आहे हेच त्यातले सत्य आहे. पण दुर्दैवाने  दरवर्षी भरभक्कमपणे वाढत जाणारे इफ्फीचे बजेट ही काही जणांसाठी ‘जादूची बाब’ असते त्याला काय करावे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com