गोव्यात भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल?

कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला सरकार स्थापन करता येऊ नये, हीच भाजपची रणनीती आहे. सरकार स्थापनेत मगोप हा शेवटचा पर्याय ठरणार असे संकेत मिळत आहेत.
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: भाजपने यावेळी 22 जागा मिळणार असल्याचा दावा केला असून परत गोव्यात सरकारस्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे. वरवर जरी हे मनातले मांडे वाटत असले तरी आतल्या गोटातून तशी तयारी चालू असल्याचे संकेत मिळत आहेत. 22 जागा मिळणार असे भाजपच्या गोटातून सांगितले जात असले तरी एवढ्या जागा मिळणार असे नेत्यांनाही वाटत नाही. पण कोणत्याही परिस्थितीत सरकार स्थापन करायचे, अशी रणनीती ते आखत असल्याचे दिसते. ही रणनीती आजपासूनच नव्हे तर निवडणूक सुरू होण्याआधीपासून सुरू आहे. (Will BJP form government again in goa)

Goa BJP
गोवा संपूर्ण यात्रेद्वारे समस्या जाणून घेणार: राज्यपाल श्रीधरन पिल्लई

यात सर्वात मोठी रणनीती म्हणजे सर्वच्या सर्व 40 जागा लढविणे. यंदा भाजपने (Goa BJP) प्रथमच राज्यातील चाळीसही जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरविले. यापूर्वी ते सासष्टीत उमेदवार उतरविण्याचे धाडस करीत नव्हते. तिथे कोणत्या तरी अपक्ष उमेदवाराला ते पाठिंबा देत असत. 2012 साली त्यांनी नावेलीतून आवेर्तान फुर्तादोंना तर वेळ्ळीतून बेंजामीन सिल्वांना पाठिंबा दिला होता. हे दोघेही त्यावेळी निवडूनही आले होते आणि भाजप सरकारात सामीलही झाले होते. 2017 साली तर भाजपने प्रियोळात (Priol) अपक्ष गोविंद गावडेंना पाठिंबा दिला होता. खरे म्हणजे प्रियोळमध्ये भाजपची स्वतःची अशी ताकद असूनही त्यांनी गोविंदाची पाठराखण केली होती. पण यावेळी त्यांनी नीतीत संपूर्ण बदल केला आहे. याचा फायदा म्हणे कोणत्या मतदारसंघात भाजपची किती ताकद आहे हे कळेल. आणि त्यांना त्याचे फळ मिळण्याची शक्यताही दिसते आहे. नावेलीत काँग्रेसच्या आर्वेतन फुर्तादो, आपच्या प्रतिमा कुतिन्हो व तृणमूलच्या वालांका आलेमाव यांच्या लढतीत भाजपचे उमेदवार उल्हास तुयेकर बाजी मारू शकतात, असा संभव दिसतो आहे. आणि हा ‘चमत्कार’ झाल्यास सासष्टीत भाजपची शक्ती अधोरेखित होऊ शकते. दुसरी रणनीती म्हणजे अपक्षांची. सध्या या निवडणुकीत अनेक मातब्बर अपक्ष दिसताहेत. हे अपक्ष पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपेक्षा जास्त प्रबळ झालेले आहेत. ते निवडून आल्यास फायदा भाजपलाच होणार आहे. पणजीचेच (Panjim) उदाहरण घ्या. भाजपचे अधिकृत उमेदवार बाबूश मोन्सेरात हे अपक्ष उमेदवार मनोहर पर्रीकर पुत्र उत्पल यांच्याशी जोरदार लढत देत आहेत. आता या दोघांपैकी कोणीही जिंकला तरी फायदा भाजपचा होणार आहे. उद्या उत्पल जिंकले तर भाजपचे नेते त्यांना पायघड्या घालून परत पक्षात घ्यायला तयार होतील आणि उत्पल परत भाजपला मिळतील यात शंकाच नाही. मांद्रेत तेच चित्र दिसते आहे. तिथे विद्यमान आमदार दयानंद सोपटे हे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी लढत देत आहेत. आता वरवर जरी याचा फायदा मगोपचे जीत आरोलकर यांना होणार असा वाटत असला तरी वस्तुस्थिती तशी नाही. पार्सेकर रिंगणात नसते तर पार्सेकरांनी आपली जी काही मते आहेत, ती अप्रत्यक्षपणे मगोपकडे वळविली असती. त्याचा फायदा आरोलकारांना झाला असता. पण आता पार्सेकर रिंगणात असल्यामुळे ती मते पार्सेकरांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे पार्सेकरांच्या उमेदवारीचा फटका सोपटेपेक्षा आरोलकरांनाच जास्त बसण्याची शक्यता आहे. आणि यामुळे सोपटेंचा मार्ग ‘निर्धोक’ झाल्यासारखा वाटत आहे.

Goa BJP
काणकोणात पोस्टल मतदान कोणाला? खरी कुजबुज!

सांगेत माहिती मिळाल्याप्रमाणे भाजपचे अधिकृत उमेदवार सुभाष फळदेसाई, काँग्रेसचे प्रसाद गावकर व अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री यांच्या लढतीत सावित्रींचे पारडे जड असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचेच काही पदाधिकारी सावित्रींचा प्रचार करताना दिसत होते. त्यामुळे त्या भाजपमध्ये नसून सुद्धा भाजपच्या असल्यासारख्या वाटत होत्या. आणि याचा फायदा भाजपलाच होणार आहे. पती भाजपमध्ये असल्यामुळे पत्नी भाजपकडे वळणार हे साहजिकच आहे. काणकोणातही तीच परिस्थिती आहे. तिथे भाजपचे अधिकृत उमेदवार रमेश तवडकर यांच्याबरोबर अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस व माजी आमदार विजय पै खोत हे लढत देत आहेत. आता हे तिघेही भाजपचे असल्यामुळे तिघांपैकी कोणीही जिंकला तर भाजपचीच ‘बल्ले बल्ले’ होणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे इजिदोरांचे पारडे इतर दोघांपेक्षा थोडे जड वाटत आहे. पण ते जिंकल्यास परत भाजपमध्ये जाणार हे निश्‍चित. कुडतरीत तर भाजपने वेगळीच गेम खेळली आहे. तिथे भाजपने ॲन्थनी बार्बोझा यांना उमेदवारी दिली आहे. पण भाजपचेच मडगावचे काही नगरसेवक हे कुडतरीतून तीन वेळा निवडून आलेले व आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले आलेक्स रेजिनाल्ड यांच्या दिमतीला वावरताना दिसत होते. त्यामुळे आलेक्स निवडून आले तर ते भाजपच्या वळचणीला जाऊ शकतात असे चित्र दिसत आहे. नुवे येथे अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान हे तर भाजपचेच. त्यामुळे ते निवडून आल्यासही भाजपला फायदा होऊ शकतो. डिचोलीतील डॉ. चंद्रकात शेट्ये वा कुठ्ठाळीतील ॲन्थनी वाझ हे देखील निवडून आल्यास भाजपकडे जाऊ शकतात. त्यामुळे बहुतेक अपक्ष हे निवडून आल्यास भाजपच्या कळपात जाण्याची शक्यता अधिक आहे. हे अपक्ष म्हणजे सध्या भाजपचा ‘खुराक’ बनला आहे. हे करताना भाजपने काँग्रेस डोईजड होऊ नये किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला या अपक्षांचा फायदा होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसत आहे.

कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला सरकार स्थापन करता येऊ नये, हीच यामागची मुख्य रणनीती आहे. सरकारस्थापनेत मगोप हा शेवटचा पर्याय ठरणार असे संकेत मिळत आहेत. मगोपला जवळ केल्यास सुदिन ढवळीकर हे ‘डोईजड’ ठरू शकतात असे परवा भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आता मनोहर पर्रीकर नसल्यामुळे व भाजपातील बहुतेक आमदार हे सुदिनांपेक्षा कनिष्ठ असल्यामुळे सुदिन ‘रथचालक’ बनू शकतात असे तो पदाधिकारी म्हणाला. शेवटी दुसरा काही पर्याच नसला तरच मगोपकडे भाजप वळेल, असे त्याचे म्हणणे पडले. आता राजकारण हे तत्कालीन असते, त्याला निष्ठा अशा नसतात. त्यामुळे कधीही काही होऊ शकते. भाजप किती जागा जिंकणार यावरही अनेक समीकरणे अवलंबून आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसारखे दिग्गज गोव्यात प्रचाराला येऊनही जर भाजपला गोव्यात सत्ता मिळाली नाही तर त्याचा वाईट संदेश देशभर जाऊ शकेल एवढे मात्र खरे. यामुळेच कोणत्याही परिस्थितीत गोव्यात सरकार बनायलायच हवे असा आदेश केंद्राकडून मिळाला असल्याचे बरेच भाजप पदाधिकारी खासगीत बोलताना आढळतात. त्यामुळे कोणाचे आमदार कितीही येवो सरकार भाजपचेच होणार असे

संकेत मिळताहेत. आता हे संकेत प्रत्यक्षात उतरतात की नाही, भाजपची रणनीती यशस्वी होते की काय याची उत्तरे 10 मार्चनंतरच मिळेल.

मिलिंद म्हाडगुत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com