रिल्होल्युशनरी गोवन्स (आरजी) संघटनेने नवा अध्याय सुरू करताना पावसाळी दिवस निवडला, पण पाऊस येताच काही या कार्यक्रमासाठी पणजीच्या आझाद मैदानावर जमलेली गर्दी पांगली नाही. याचे कारण जमलेली माणसे संघटनेच्या विचारांशी संपूर्ण निष्ठा बाळगणारी होती. त्यानी खुर्च्यांच्या छत्र्या केल्या आणि वक्त्यांचे बोल ऐकले. संघटनेचा राजकीय वकुब काय असेल, कुठपर्यंत तिची मजल जाईल, हे प्रश्न आहेतच, पण वर्षानुवर्षांचे सत्ताकारण करणाऱ्या मगो पक्षालाही जी उभारता आली नाही ती कार्यकर्त्यांची फळी आरजीने गोमंतकीयांतील सर्वव्यापी असुरक्षिततेला गोंजारत उभी केली आहे आणि हीच फळी भारतीय जनता पक्षासह अन्य प्रतिस्पर्ध्यांना येत्या निवडणुकीत आपले उपद्रवमूल्य कमी- अधिक प्रमाणात दाखवून देण्याची शक्यता आहे. भाजपाच्या पर्रीकरप्रणित एकछत्री अंमलाला ख्रिस्ती समुदायाकडूनही मान्यता मिळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर आरजीचा उदय झाला, हा केवळ योगायोग नव्हे आणि आरजीला बालावस्थेत लागणारा आर्थिक खुराक समुद्रापार असलेल्या गोमंतकीयांकडून मिळाला हाही योगायोग नव्हे.
भाजपाच्या हिंदुत्ववादाने स्वीकारलेल्या गोमंतकीयत्वाला शह देण्यासाठी गोव्यासारख्या असुरक्षिततेची जाणिव सदैव जोपासणाऱ्या प्रदेशात आक्रमक प्रादेशिकतावादाला खतपाणी घालण्याची शक्कल कशी सुफळ ठरत आहे, याचा प्रत्यय आरजीला विशिष्ट मतदारांकडून मिळणाऱ्या प्रतिसाद आणि प्रोत्साहनातून येतो. अर्थांत सद्यस्थितीत आरजीची प्रगती एकट्या भाजपालाच अडचणीची ठरेल, असेही म्हणता येणार नाही. कॉंग्रेससारख्या धरसोड राजकारणाला उचलून धरणाऱ्या पक्षालाही तिची तेवढीच झळ बसू शकते. एकंदरीत पाहाता आरजीने गोव्यातील एरवीही संदिग्ध असलेल्या राजकारणाला आणखीन गढूळ करून सोडलेले आहे.
प्रादेशिकतावादाचा अंमल गोव्यातील हिंदू बहुजन समाजावर कितपत चढेल या प्रश्नाच्या उत्तरात आरजीचे भविष्य सामावलेले आहे. मतदारामधल्या सामूहिक असुरक्षिततेला प्रादेशिकतावादाचे व्यासपीठ देत राजकीय संसार चालवण्याचे अनेक प्रयोग याआधी गोव्यात झाले आणि त्याना संमिश्र यश मिळाले. सुरुवातीच्या मगोप- युगोपासून आताच्या गोवा फॉरवर्डपर्यंतच्या या प्रयत्नांतले विशिष्ट काळापर्यंतच टिकलेले दिसते. राजकारण आणि सत्ताकारणातून येणारे- सर्वसामान्यांसाठी अतर्क्य असलेले- लाभ यांची सरमिसळ झाल्याचा हा परिणाम आहे. म्हणूनच मगोपसारखा प्रादेशिक पक्ष आज ज्या सहजतेने कॉंग्रेसला गळामिठी घालतो त्याच सहजतेने भाजपाशी चुंबाचुंबी करतो. राष्ट्रीय म्हणवणाऱ्या पक्षांकडे राजकीय खरेदीसाठी आवश्यक असलेली संसाधने असतात आणि दिल्लींत सत्ता असलेल्यांकडे प्रादेशिक पक्षांचे हात व मुंड्याही पिरगाळण्याइतकी मुजोरी असते. गोव्यासारख्या राज्यातले पक्ष या आडदांडपणासमोर फार काळ तग धरू शकत नाहीत. आरजी या सार्वत्रिक नियमाला अपवाद ठरू पाहात असेल तर त्याच्याकडे वेगळे असे काय आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
आरजी संघटनेचा प्रादेशिकतावाद बराच आक्रमक आहे, हे खरे. अंसघटित श्रमजीवींमधल्या एकदम खालच्या स्तरावर असलेल्या भटक्या विक्रेत्यांना त्याची झळ बसते आहे, हेही खरेच. पण प्रादेशिकतावादाचे स्तोम गोव्यात कुठवर माजू शकते हा प्रश्न राहातोच. लक्षात घ्यायला हवे की मुक्तीनंतर वेगवेगळ्या क्षेत्राला गतिमान करण्यासाठी गोव्याने स्वेच्छेने बोलावून घेतलेल्यांची- मग ते मराठी शाळांत शिकवण्यासाठी घाटमाथ्यावरून आणलेले शिक्षक असोत वा वीजखात्याचा कारभार हाकण्यासाठी आणलेले मल्याळी- नातवंडे आज गोमंतकीयांइतकीच गोमंतकीय होऊन येथे वावरत आहेत. जे काही मोठे उद्योग राज्यात आहेत, त्यापैकी किमान सत्तर टक्क्यांची मालकी गोमंतकीयांकडे नाही. काही उद्योगांत तर वरिष्ठ व्यवस्थापनाची संपूर्ण साखळीच परप्रांतातून आलेल्यांची. बाहेरच्यानी येणे आणि येथे जम बसवणे गोवेकरानी गृहीत धरलेले आहे. बाहेरच्यांमुळे आपल्याला रोजगार मिळत नसल्याची खंत जरुर काही तरुणांत आहे, पण त्याचबरोबर परप्रांतातून होणारी श्रमजीवींची आवकही कष्टाची कामे करण्यासाठी आवश्यक असल्याची जाणीव आहे. तात्पर्य हेच, की नुसत्या आक्रमक प्रादेशिकतावादाच्या ऐवजावर कोणत्याही संघटनेला- त्यात आरजीही आली- फार काळ राजकारण शिजवता येणार नाही. मात्र गोव्यासमोरील कळीच्या मुद्द्यांची जाण ठेवून, त्या मुद्द्यांचे आर्थिक आयाम शोधून काढत ही संघटना थेट गोमंतकीय बुद्धिवाद्यांच्याही समीप जाऊ शकेल.
अर्थांत त्यासाठी संघटनेला राजकीय भूमिका जागोव्यातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी प्रादेशिकतावादाचे आयाम असलेला कार्यक्रम कोणता? इथली खनिजसंपदा, इथले पर्यटन, इथले पर्यावरण यांच्याविषयीची संघटनेची स्वीकृत व स्थायी धोरणे कोणती असतील? इथल्या मनुष्यबळाला अनुकूल असलेल्या रोजगाराच्या उभारणीसाठीचे आरेखन पक्षाने केले आहे का? समस्या आणि कमतरतेवर बोट ठेवत निव्वळ भावना उद्दिपीत करण्याऐवजी पक्ष सकारात्मक असे काय देऊ शकतो, या प्रश्नांची उत्तरे आरजीच्या नेतृत्वाला आधी शोधावी लागतील आणि ती राजकीय कार्यक्रमाद्वारे जनतेसमोर ठेवावी लागतील. तरच ही संघटना ''लंबी रेस का घोडा'' म्हणून गोमंतकीयांच्या मनात ठसेल. प्रादेशिक पक्षांचे निवडणुकीच्या तोंडावर अळंब्यांसारखे उमलणे गोव्याला नवे नाही. निवडणुकांचा मौसम सरला की ही अळंबी गायब होतात. त्याना कालांतराने एखादा बाबूश मोन्सेरात वा मिकी पाशेको विकत घेतो. आपल्याला याच वाटेने जायचे नाही, अशी आरजीच्या नेत्यांची आतापर्यंतची देहबोली सांगते, पण गोमंतकीयांच्या विचारविश्वाने आश्वस्त व्हावे असे ती काही सांगत नाही. ही भाषा ज्या दिवशी आरजीचे नेते शिकतील, तोच त्या संघटनेच्या परिपक्वतेचा, उन्नतीचा दिवस असेल.हीरपणे घ्यावी लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.