कोविड जोमात, कार्यकर्ते कोमात! खरी कुजबूज

कोविडमुळे प्रचारावर निर्बंध आल्याने उमेदवारांचा पैसा बराच वाचला म्हणायचा, पण कार्यकर्त्यांना चुटपूट लागून राहिली आहे, त्याचे काय?
Goa Assembly Elections
Goa Assembly ElectionsDainik Gomantak
Published on
Updated on

कोविड जोमात, कार्यकर्ते कोमात

फोंडा तालुक्यातील चारही मतदारसंघांत सध्या प्रचाराची मोठी धामधूम सुरू आहे. कोविडमुळे अनेक बंधने आल्याने सध्या जाहीर प्रचारासाठी अवघेच लोक घेऊन प्रचार करण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे. एक मात्र खरे, एरवी प्रचारासाठी उमेदवार जास्तीत जास्त लोकांना गोळा करायचे. त्यासाठी सकाळी चहा, दुपारी जेवण, संध्याकाळी पुन्हा चहा आणि रात्रीचे जेवण अशा जेवणावळी झोडल्या जायच्या. याशिवाय कार्यकर्त्यांच्या हातातही काही पडायचे. त्यामुळे कार्यकर्ते खूष असायचे. काहींचा तर हा सिझनेबल व्यवसायच बनला आहे. कारण मेळाव्याला पाहिले तर हीच लोकं आलटून-पालटून असतात. असो, पण कोविडमुळे प्रचारावर निर्बंध आल्याने उमेदवारांचा पैसा बराच वाचला म्हणायचा, पण कार्यकर्त्यांना चुटपूट लागून राहिली आहे, त्याचे काय? ∙∙∙

मतदार झाले जागरूक

विविध पक्षांमुळे असो वा निवडणूक आयोगाने राबविलेल्या उपक्रमांमुळे असो, गोमंतकीय मतदार जागरूक होऊ लागल्याची प्रचीती येऊ लागली आहे. मत मागण्यासाठी दारात आलेल्या उमेदवाराला प्रत्यक्ष नसला तरी नंतर समाज माध्यमावरून तो विविध सवाल करू लागला आहे. एरवी सर्वसामान्य मतदार मत मागण्यासाठी दारात आलेल्याचे सगळे मुकाटपणे ऐकून घेत असायचा. पण आता समाज माध्यमामुळे पडद्याआड राहून दोन वा अधिक कार्यकाळ आमदार वा मंत्री राहिलेल्यांना त्यांनी केलेल्या विकासकामाबाबत फिरकी घेण्याची संधी उपलब्ध झाल्याने संबंधितांची भलतीच गोची होऊ लागली आहे. ∙∙∙

तृणमूलची नौटंकी

गोव्यात जनाधार झपाट्याने कमी होत असल्यामुळे असेल कदाचित तृणमूल काँग्रेस (Goa TMC) पक्ष हबकून गेला आहे. अजीब गोवेकरांना वश करणे दिसते तेवढे सोपे नाही, हे एव्हाना ‘आयपॅक’चे प्रशांत किशोर यांनाही कळून चुकले असेल. त्यामुळेच आता हाही पक्ष येनकेन प्रकारेण प्रसिद्धीत राहण्यासाठी तियात्र करू लागला आहे. काल कुंकळ्ळीत तृणमूलचे डॉ. जॉर्सन फर्नांडिस यांनीही युरी आलेमाव यांच्या घरी जाऊन पत्रे देण्याची नौटंकी करून पाहिली. त्यासाठी ‘आयपॅक’वाल्यांनी प्रसिद्धी माध्यमांना फोन करून युरीच्या घरासमोर मोठा हंगामा होणार, याची खबर दिली होती. पण प्रत्यक्षात हा प्रकार म्हणजे एक फ्लॉप शो होता. असे फ्लॉप शो करून मते पदरात पडतात का? कित्येक निवडणुकांत नशीब आजमावण्याचा प्रयत्न करूनही आजवर अपयशी ठरलेले डॉ. जॉर्सन यांना एवढेही कळत नाही का, अशी चर्चा कुंकळ्ळीत सुरू आहेत. ∙∙∙(party workers worried owing to covid-19 in goa)

Goa Assembly Elections
गोव्यातील इस्पितळांम­ध्ये प्राणवायू साठा मुबलक

काँग्रेस कार्यालयातील एसी गायब

काँग्रेसच्या (Congress) मडगाव येथील दक्षिण गोवा कार्यालयात जाल, तर उष्णतेने हैराण व्हाल. कारण या कार्यालयात लावलेले वातानुकुलीत यंत्र कुणीतरी काढून नेले आहेत. काँग्रेस कार्यालयाबाहेर जी चर्चा ऐकू येते, त्याप्रमाणे काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस यांनीच ते काढून नेले आहेत. हे एसी म्हणे कार्यालयात त्यांनीच लावले होते. पक्षाची निस्सीम सेवा करूनही आपल्याला वेळ्ळीची उमेदवारी देण्यात आली नाही म्हणून ज्यो नाराज होते. कार्यालयातील एसी काढून नेणे त्याचीच प्रचीती तर नव्हे ना? ∙∙∙

लेट कमर्स काँग्रेस!

निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) उमेदवारांची नावे निश्चित झाली असून आता खऱ्या अर्थाने रणधुमाळीला वेग आला आहे. काही पक्षांनी मुख्यमंत्रिपदाचे चेहरेही पुढे आणले आहेत. ‘लेट कमर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षाने मात्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप घोषित केला नाही. त्यातच गिरीश चोडणकर यांनी बुधवारी एक वक्तव्य केले. त्यावर आता चर्चा रंगत आहे. चोडणकर म्हणतात, निवडणूक निकालानंतर अवघ्या पाच मिनिटांत आम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करू. जर असे असेल तर मग उशिरा का घोषित का करता? हा चेहरा जाहीर केला तर मतपेटीवर परिणाम नाही ना होणार अशी भीती तर त्यांना नसेल ना...? की उमेदवारांविषयी आत्मविश्वास नाही...? दुसरे म्हणजे, कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमचा चेहरा सगळ्यांनाच माहिती आहे, असे सांगून माजी मुख्यमंत्र्यांना पुढे केलेय... असे असेल तर ‘तो’ जाहीर करायला हरकत तरी काय? ∙∙∙

राजकीय पक्षांचे महाभारत

यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, गोव्यातील राजकीय अवकाशात अन्य राज्यांतील प्रादेशिक पक्षांचे आगमन. लोकशाहीत कोणताही पक्ष कोठूनही निवडणूक लढवू शकतो, हे खरे. पण निवडणूक लढवताना काही तारतम्यही हवे. हल्लीच उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत राज्यात काही नवख्या पक्षांचे आगमन होताना दिसत होते. या पक्षांची राज्यात तोंडओळखही नाही. आधीच काही पक्षांच्या नावांमध्ये साम्य असल्याने विशेष करून ग्रामीण भागातील मतदार संभ्रमात पडतात. त्यातच हे नवे पक्ष त्यांच्या गावीही नसल्याने मतदारांची पुरती गोची होऊ लागली आहे. या नवख्या पक्षांकडून राज्यातील काही भागांत उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवण्यामागे ‘वेगळाच’ वास येत असल्याची शंका काहीजण उपस्थित करत आहेत. कुठेतरी जळत असल्याशिवाय धूर येत नाही, हेही खरे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com