विधानसभा निवडणुकीनंतर भाजप कार्यालयात पुन्हा शुकशुकाट

भाजप कार्यालय की निवडणूक कार्यालय असा सवाल भाजपचे कार्यकर्तेच करू लागले आहेत.
Goa Assembly Election
Goa Assembly Election Dainik Gomantak

गोवा: विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्याच्या दिवसापासून म्हापसा येथील उत्तर गोवा भाजप कार्यालयात पुन्हा शुकशुकाट दिसत आहे. याचे नेमके कारण केवळ त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच माहीत असेल. परंतु, मतदानापूर्वी सुमारे पाच-सहा महिने नेहमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने तसेच अगदी थातूरमातूर कारणांचेही औचित्य साधून घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदांमुळे गजबजून जाणारे ते कार्यालय हल्लीच्या दिवसांत अगदीच ओस पडलेले आहे.

पर्वरीतून भाजपची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले उत्तर गोवा भाजप अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी तर गेल्या महिनाभरापासूनच या कार्यालयाकडे पाठ फिरवली होती. एरवी दोन दिवस आड कोणत्या तरी कारणानिमित्त त्या कार्यालयाला भेट देणारे स्थानिक भाजप आमदार जोशुआ डिसोझा हेदेखील निवडणुकीनंतर त्या कार्यालयात फिरकलेच नाहीत. त्यामुळे ते भाजप कार्यालय होते, की निवडणूक कार्यालय होते, असा सवाल भाजपचे कार्यकर्तेच करू लागले आहेत.

Goa Assembly Election
डिचोलीला यावेळी मंत्रिपदाची सुवर्ण संधी

कोटींची उड्डाणे

हल्लीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पैशांची प्रचंड खैरात झाल्याचे दावे प्रत्येक पक्षाकडून झाले आणि अजूनही होत आहेत. आता त्याची खातरजमा कोणी व कशी करायची, हा मुद्दा उपस्थित होतो. कारण आपण पैसे वाटल्याची कबुली कोणीच देणार नाही. तशी ती दिली तर तो अडचणीत येऊ शकतो.

आता तर पोस्टल मतांसाठी लाखोंचे व्यवहार होत असल्याचे आरोप होत आहेत. पण काहीच पुरावे नाहीत. आता तर निवडणुकीत उतरलेल्या एका वजनदार दाम्पत्याने या निवडणुकीत तब्बल 19 कोटी मतदारांना वाटल्याची फुशारकी त्यांचा स्वीय साहाय्यक मारत असल्याचे सांगितले जाते. त्या वार्तेने अनेकांचे डोळे विस्फारलेत, तर अन्य काहीजणांनी या दाम्पत्याकडे इतकी संपत्ती आली कुठून? असा सवाल केला आहे.

देणाऱ्यांचे हात हजारो...

केपे मतदारसंघात यावेळी खरेच तुल्यबळ लढत होणार असल्याची प्रचीती तेथील मतदारांना आली आहे. तेथे खुद्द उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे रिंगणात असल्याने भाजपसाठी जशी ती प्रतिष्ठेची ठरली आहे, त्याचप्रमाणे दहाजणांनी केलेल्या पक्षांतराचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसनेही सारे लक्ष केपे मतदारसंघावर केंद्रीत केले होते. त्याचा खरा लाभ मतदारांनाच झाला आहे.

असे सांगतात की, अन्य कुठल्याही मतदारसंघापेक्षा केपेत यावेळी पाण्यासारखा पैसा वाहात होता. काहीजणांनी तर दोन्ही तुल्यबळ उमेदवारांकडून हजारोंच्या प्रमाणात पैसे घेतले. मात्र, मते कोणाच्या पारड्यात टाकली ते 10 मार्च रोजी निकालानंतरच कळणार आहे. त्यामुळेच असेल कदाचित निकाल लागण्यापूर्वीच दोन्ही गटांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला असावा.

Goa Assembly Election
शाळांजवळील तंबाखू आणि दारूच्या विक्रीचा अहवाल देण्याचे दुकानदारांना निर्देश

भेटी लागी जीवा...!

सुदिन ढवळीकर जेव्हा भाजप नेत्याशी आपली भेट झाल्याचे उघडपणे मान्य करतात, तेव्हा भाजपला अप्रत्यक्षपणे आगामी भूकंपाची आगाऊ सूचना देतात. मागे मायकल लोबो यांची उघडपणे भेट घेतली अन लोबो पुढच्या काळात भाजपचे हाडवैरी बनले. आता त्यांनी आपण व विश्वजीत नियमितपणे एकमेकांना भेटताे, हे मान्य केले आहे. लगेच उच्च न्यायालयाच्या निकालाला आपला पक्ष सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार नाही, असेही त्यांनी एका दमात जाहीर केले.

समजा, त्यांच्या भाजपला अपेक्षेप्रमाणे 22 पेक्षा अधिक जागा मिळाल्यास प्रमोद सावंत यांना परत मुख्यमंत्री होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. शिवाय त्यांनी आपले अर्धे मंत्रिमंडळ आधीच जाहीर करून टाकले आहे. मागील अपमानाचा अनुभव घेता गोविंद गावडे यांचा समावेश असलेल्या सावंत मंत्रिमंडळाच्या जवळपासही सुदिन ढवळीकर फिरकणार नाहीत. उलट, तुम्ही दोन तृतीयांश भाजपवाल्यांना फोडून बाहेर या आणि स्वत: मुख्यमंत्री बना, असे ढवळीकरांनी विश्वजीतना सांगितले नसेल कशावरून? (अशीही चर्चा सुरू आहे बरं का!) एकंदरीत सुदिन ढवळीकर यांच्या वारंवार भेटी बऱ्याच जणांच्या जीवाला लागत असतील, असे दिसते बुवा.

राजकीय कार्निव्हल

गोव्यात सध्या कार्निव्हलचा माहोल आहे. राज्यात साधारण आठवडाभर कार्निव्हल चालतो; पण नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी 10 मार्चला होणार असल्याने तोपर्यंत राजकीय कार्निव्हल सुरू होणार, असे दिसते. बांदोडेच्या सुदिनरावांनी छोट्या खाशांचा चालविलेला जयजयकार, हा त्याचाच एक भाग तर नसावा ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण 2017 प्रमाणे ही नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर नव्हे ना? असा संशय येतो. कारण भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी योग्य कोण, याची चिंता ढवळीकरांना का? अशी विचारणा होऊ लागली आहे. तसेच पर्रीकरांनंतर सुदिन व छोट्या खाशांनी कोणाच्या नेतृत्वाखाली काम केले होते त्याचा त्यांना विसर तर पडलेला नाही ना? असे वाटू लागले आहे.

कचऱ्यातूनसोने, की पैसा?

मडगाव नगरपालिकेचा घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचा उपक्रम पालिकेसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. नियमानुसार अशा कामासाठी निविदा काढायला हवी. पण प्रत्यक्षात गेली दोन वर्षे तशी प्रक्रिया न करता दोन एजन्सींकडून वार्षिक काही कोटींचे असलेले हे काम करून घेतले गेले आहे. आता दोन वर्षांनंतर निविदा प्रक्रिया करण्याचा आव आणला गेल्याने शॅडो कौन्सिलने ती बाब न्यायालयात नेण्याचा इशारा दिला आहे. आजवरचा अनुभव पाहिला तर त्यामुळे या प्रकरणातही ‘दूध का दूध और पानी का पानी’ होईल, असे मानले जाते.

Goa Assembly Election
कार्निव्हलनिमित्त व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांच्या पोस्ट कार्डचं अनावरण

आम्ही दोघे भाई-भाई

बुधवारी ज्योती कुंकळकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होते. त्यावेळी दोन भाई व्यासपीठावर होते. एक ज्ञानपीठ विजेते भाई मावजो तर दुसरे माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप. यावेळी दामोदर (भाई) मावजो एक कट्टर कोकणीप्रेमी आणि एक कट्टर मराठीप्रेमी. यावेळी भाई मावजो म्हणाले, ‘आमच्यात काही बाबतीत मतभेद असले तरी आम्ही दोघे भाई-भाई आहोत. आमचे वैयक्तिक चांगले संबंध आहेत.’ या भाई मावजोंच्या वाक्याने उपस्थित सगळेच सुखावले. मात्र, उपस्थितांमध्ये खासगीत चर्चा सुरू होती, की ‘भाईंना (खलप) मराठीत बोलायला कोणी अडवले होते?’

ऑनलाईन मुले नाही, पालक शिकले

‘गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले’ ही म्हण आपण पालकांना शिकवली पाहिजे. गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन शिक्षणातून मुले शिकली, असा जर आपला समज असेल तर तो चुकीचा आहे, हे आता ऑफलाईनने सिद्ध केले आहे. ऑनलाईन शिक्षणात मुले नव्हे, तर पालक व ट्युशन शिक्षक शिकले आणि पालक व ट्युशन टिचरनी उत्तरपत्रिका लिहिल्या, हे आम्ही नव्हे तर शाळेत दोन वर्षांनी आलेली मुलेच सांगत आहेत.

शिक्षकांनी ऑनलाईनची उजळणी घेतली तर मुलांना काहीही येत नाही हे समजले. मुलांना अरे तू परीक्षा कशी पास झालास, तेही पैकीच्या पैकी गुण घेऊन, असे विचारल्यावर बिचारे निर्दोष व निरागस विद्यार्थी उत्तर देतात, ‘मॅडम परीक्षा मम्मीने दिली व ट्युशन टीचरने उत्तरे पोस्ट केली.’ धन्य ते ऑनलाईन शिक्षण, धन्य ते पालक आणि धन्य ते ट्युशन शिक्षक.

निकालानंतर नगराध्यक्षांची गच्छंती!

दहा मार्चनंतर कुंकळ्ळी नगरपालिकेत सत्तांतर होण्याची शक्यता असून विद्यमान नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांची गच्छंती होणार, असा दावा आम्ही नव्हे, तर सत्ताधारी गटातील नगरसेवकच करत आहेत. विद्यमान नगराध्यक्षांवर सत्ताधारी गटातील काही नगरसेवक नाराज झाले असून ‘एक तर लक्ष्मण नाईक यांना बदला, अन्यथा आम्ही बदलू’ असा इशारा म्हणे असंतुष्ट नगरसेवकांनी दिला आहे.

लक्ष्मण नाईक हे शिस्तप्रिय नगराध्यक्ष असल्यामुळे काही नगरसेवकांना पचनी पडत नाही. युरी येवो अथवा क्लाफास जिंकूदे, लक्ष्मण मात्र जाणारच, असा दावा एका नगरसेवकाने केला आहे तो खरा ठरतो की फुसका बार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

लोकच पाहतील काय ते

भाजपला जनमत नसतानाही त्यांनी फोडाफोडी करून अखेर सत्ता मिळवली होती. आताही नेमकी तीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कोणत्याही स्थितीत सत्ता हवीच असल्याने भाजपने आतापासूनच विरोधकांच्या पण संभाव्य विजेत्या उमेदवारांशी संधान बांधल्याचे वृत्त आहे. आता या वावड्या किती खऱ्या आणि किती खोट्या हे कुणालाच माहिती नाही.

कदाचित काँग्रेसवाले प्रसिद्धीसाठी या वावड्या उठवत असतील, असेही बोलले जाते. पण एक मात्र खरे. मागच्या काळात भाजपने सत्तेसाठी फोडाफोडी केली; पण आता ती चालणार नाही. कारण भाजपच्या विरोधातच जनमत आहे. त्यामुळे सत्तेसाठी जिंकून आलेल्या इतर विरोधातील आमदारांना भाजपने फोडले तर या भाजपवाल्यांना कसा धडा शिकवायचा ते लोकच ठरवतील हे आम्ही नाही, लोकच बोलतात!

असेही आवाहन

गोव्याचा आर्थिक कणा असलेला खनिज व्यवसाय भाजप सरकारने बंद पाडला. राज्यात आणि केंद्रात सत्ता असतानाही तो व्यवसाय त्यांना परत सुरू करता आला नाही अन अजूनही सत्ता द्या म्हणून मागणी करतात, अशी तीव्र प्रतिक्रिया खाण पट्ट्यातील मतदारांनी व्यक्त केल्या आहेत. आता सरकारी कर्मचाऱ्यांनी मतदान करताना आमचा विचार करून भाजपविरुद्ध मतदान करण्याचे आवाहन राज्यातील खाण पट्ट्यातील मतदार करू लागले आहेत. खरे म्हणजे सरकारी मतदारांची मते ही निर्णायक असतात, याचा विचार केला तर भाजप घरी जाऊ शकते, असा कयास व्यक्त केला जात आहे.

मगो पक्ष ‘बाबा’च्या नादाला

सत्ता मिळवण्यासाठी सध्या राज्यात ‘सुंदोपसुंदी’ सुरू आहे. सत्तेच्या या खेळात मगो पक्षाचेही नाव आहे. मात्र, सत्ता मिळवण्यासाठी मगोचे नेते भाजपच्या ‘बाबा’च्या नादी लागल्याचे पाहून मगो पक्षातील काही निष्ठावंतांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्तेसाठी या वाळपईच्या बाबाने आतापर्यंत बरेच द्राविडी प्राणायाम केले आहेत. कोणत्याही स्थितीत सत्ता हवीच, या नादापोटी झपाटलेल्या बाबावर सध्या इस्पितळातील नोकर भरती प्रकरण शेकण्याची वेळ येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अशा स्थितीत मगोने बाबाला पुढे करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे असल्याच्या प्रतिक्रिया निष्ठावंत मगो कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. फोंडा तालुक्यात तर त्या प्रकर्षाने जाणवत आहेत. मगोपने तृणमूल काँग्रेसशी युती केल्याने खुद्द काही मगो निष्ठावंतांत नाराजी आहेच, त्यातच आता हे बाबाचे प्रकरण तापले आहे.

खलपभाईंची ‘कोकणी’

ज्योती कुंकळकर संपादित ‘कोंकणी की लोकप्रिय कहानियाँ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप होते. यावेळी त्यांनी आपला कोकणीशी जुना संबंध असल्याचे सांगताच उपस्थित मराठीप्रेमींच्या भुवया क्षणभर उंचावल्या. खलप म्हणाले, ‘मी न्यूज रिडर म्हणून आकाशवाणीवर ऑडिशन दिली होती. मात्र, माझ्या आईची पेडण्याची कोकणी. वडिलांची म्हापशाची.

त्यातच शेजारी ख्रिश्‍चनांची वस्ती त्यामुळे माझ्या उच्चारांचे ‘कोकणी खतखते’ झाले होते. त्यामुळे इंग्रजीमधील कोकणी रूपांतर मी वाचायचो. ते मुळगावकर (कार्यक्रम निष्पादक) यांना रुचेना झाले आणि मग मला तिथून बाजूला व्हावे लागले. मात्र, ‘कोकणी खतखते’ हे भाईंच्या तोंडून आलेले शब्द काहीजणांना खुपल्याचे कार्यक्रमस्थळी जाणवत हाेते.

कुडचडेत काय होणार?

कुडचडे मतदारसंघात यंदा हाय होल्टेज लढत झाली आहे. विद्यमान मंत्री नीलेश काब्राल यांना नवख्या अमित पाटकर यांनी घाम काढल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. अनेक मतदारांनी सायलंट बनून मतदान केले आहे. हा सायलंट मतदार निर्णायक भूमिका बजावणार आहे. त्यात महिलावर्ग पूर्वीसारखा एकसंघ राहिलेला नाही.

त्यातही कुडचडेत कायदामंत्री तिसऱ्यांदा निवडून येत नाहीत अन कुडचडेतील हुशार जनता तिसऱ्यांदा कोणालाच संधी देत नाही. आता याला अपवाद काब्राल बनणार, की कुडचडेवासीय आपली परंपरा कायम राखणार, हे निकालादिवशी स्पष्ट होणार आहे. आणि तसेच घडले तर कुडचडकर ठरवितात तेच करतात, हे पुन्हा सिद्ध होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com