
भारताने पाकड्यांची ऑपरेशन सिंदूर राबवत जिरवली. आता पाकिस्तानच्या कुरापतींनी छुपा पाठिंबा देणाऱ्या तुर्कीलाही भारताने अद्दल घडवली. तुर्कीस्थित एअरपोर्ट ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलेबी हावा सर्व्हिझीचे मार्केट कॅप केवळ दोन दिवसांत 2,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त (यूएस $293 दशलक्ष) घसरले. तुर्कीने भारताविरोधात पाकिस्तानला दिलेला पाठिंबा हे त्याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या उपकंपन्यांच्या सुरक्षा मंजुरीही रद्द केल्या. त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 20 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
दरम्यान, भारताच्या (India) या कारवाईनंतर इस्तंबूलस्थित फर्मने सांगितले की ते भारत सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर उपायांचा अवलंब करतील. भारतातील आपल्या कामकाजाचे महत्त्व अधोरेखित करताना कंपनीने सांगितले की, 2024 मध्ये कंपनीने 585 दशलक्ष डॉलर्सच्या उत्पन्नापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त उत्पन्न तिच्या भारतीय उपकंपन्यांकडून आले.
ब्यूरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) ने गुरुवारी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडियाची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली. या कारवाईचा परिणाम देशात कार्यरत असलेल्या समूहाच्या सर्व संबंधित युनिट्सवरही झाला. सेलेबी सांगितले की, 'त्यांचे भारतीय कामकाज भारतीय व्यावसायिकांद्वारे हाताळले जाते. कोणत्याही मानकांनुसार ते तुर्की संघटना नाही.' गेल्या आठवड्यात भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
सरकारी आदेशानंतर बोर्सा इस्तंबूलवरील सेलेबीचे शेअर्स गुरुवारी 10 टक्क्यांनी घसरुन 2,224 तुर्की लिरावर बंद झाले आणि शुक्रवारी आणखी 10 टक्क्यांनी घसरुन 2002 तुर्की लिरावर आले, ज्यामुळे अनेक वेळा ट्रेडिंग थांबवले गेले. या विक्रीमुळे दोन दिवसांत एकूण बाजार मूल्यात 2500 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले.
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडियाने रद्द करण्याच्या आदेशाला रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली, ज्यावर सोमवारी (19 मे) सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. या निराधार आरोपांचे स्पष्टीकरण देण्यासाठी आणि लादलेले आदेश रद्द करण्यासाठी आमची कंपनी सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर उपायांचा अवलंब करेल, असे सेलेबी यांनी नियामक फाइलिंगमध्ये म्हटले. कंपनीने आपल्या फाइलिंगमध्ये म्हटले की, त्यांच्या उपकंपन्यांनी नेहमीच भारतीय कायद्यांचे पालन केले असून कधीही राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केलेला नाही.
2009 मध्ये भारतीय मार्केटमध्ये एन्ट्री केल्यापासून सेलेबीने 250 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली. तसेच, 10,000 हून अधिक भारतीयांना रोजगार दिला. कंपनी पाच वेगवेगळ्या उपकंपन्यांद्वारे दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि हैदराबादसह देशभरातील नऊ विमानतळांवर कार्यरत आहे. त्यापैकी सर्वात मोठी, सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया, सहा विमानतळांवर कार्यरत होती. सेलेबीने कामकाज थांबवल्यामुळे भारतातील अनेक विमानतळ आणि विमान कंपन्या आता एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस, एअर इंडिया एसएटीएस आणि बर्ड ग्रुप सारख्या पर्यायी ग्राउंड हँडलर्सकडे वळत आहेत.
दरम्यान, कंपनीने सोशल मीडियावरील दाव्यांचे खंडन करणारे स्पष्टीकरण देखील जारी केले. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांची मुलगी सुमेय एर्दोगान बायरक्तार यांची कंपनीत मालकी असल्याचे दावे करण्यात आले होते. सेलेबी यांनी अशाप्रकारचे दावे तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचा असल्याचे म्हटले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.