Gotabaya Rajapaksa leaves Sri Lanka and arrives in Maldives: श्रीलंकेतील गंभीर आर्थिक संकटादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून पळून गेले आहेत. त्यांनी कोणत्या देशात आश्रय घेतला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र ते त्यांच्या विमानाने मालदीवमध्ये उतरल्याचे समजते. मात्र, या वस्तुस्थितीची अद्याप पुष्टी झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती पदाच्या राजीनामा पत्रावर स्वाक्षरी केली असून आज त्याची घोषणा केली जाणार आहे.
पत्नीसह मालदीवमध्ये पोहोचल्याची चर्चा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) पत्नी, बॉडिगार्ड आणि पायलटसह मालदीवमध्ये पोहोचले आहेत. श्रीलंकेतून पळून जाण्यासाठी त्यांनी हवाई दलाच्या विमान AN-32 चा वापर केल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ते श्रीलंकेत (Sri Lanka) लपून राहत होते. गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राष्ट्रपतींची कमान आता संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धन यांच्या हाती येणार आहे.
जाण्यापूर्वीच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला?
श्रीलंकेच्या घटनेनुसार, राष्ट्रपती आणि पंतप्रधान म्हणून देशात कोणीही नसताना, सरकारचा आदेश संसदेच्या अध्यक्षांकडे येतो. ते महिनाभर या पदावर राहू शकतात. या काळात त्यांना देशात राष्ट्रपती निवडून आणून सरकारची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवावी लागते. त्यामुळे आता या बिकट परिस्थितीत देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक घेण्याची जबाबदारी सभापती अभयवर्धन यांना पेलावी लागणार आहे.
गोटाबाया आपल्याच देशात लपून राहत होते
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोटाबाया राजपक्षे देशातून पळून जाण्यापूर्वी श्रीलंकेत एका गुप्त ठिकाणी लपून बसले होते. ते एअर मार्शल सुदर्शन पाथिराना यांच्या एका खाजगी निवासस्थानी लपून बसले होते, असा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. मात्र, श्रीलंकेच्या हवाई दलाने असे वृत्त निराधार असल्याचे म्हणत फेटाळून लावले. श्रीलंकेच्या हवाई दलाचे प्रवक्ते दुशान विजेसिंघे म्हणाले की, 'अशा वृत्तात तथ्य नाही. हे दावे म्हणजे श्रीलंकेच्या हवाई दलाची (Air Force) प्रतिमा डागाळण्याचा केवळ प्रयत्न आहे.'
राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला आजही हजारो लोकांचा वेढा
दुसरीकडे, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे पलायन करुनही श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवासस्थान, संसद (Parliament) आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाला आजही हजारो लोकांनी वेढा घातला आहे. ते आपल्या देशातील नेत्यांवर प्रचंड नाराज असून तात्काळ त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडायचे आहे. त्यांची सर्वाधिक नाराजी राजपक्षे कुटुंबाप्रती आहे. आतापर्यंत श्रीलंकेत राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री, क्रीडामंत्री आणि परराष्ट्र मंत्री या पदांवर याच कुटुंबातील लोकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना अडचणीत टाकण्यात या लोकांची जबाबदारीही अधिक होती, असे जनतेला वाटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.