Spain Court: एका ब्रिटिश-भारतीय व्यक्तीला स्पॅनिश कोर्टात मोठा दिलासा मिळाला आहे. या व्यक्तीवर विमान उडवून देण्याची धमकी दिल्याचा आरोप होता. आपल्या मित्रांसोबत बसलेल्या या व्यक्तीने गमतीने आपण तालिबानचा सदस्य असल्याचे सांगितले होते. लंडनच्या गॅटविक येथून स्पेनमधील मेनोर्का येथे उड्डाण करणारे विमान उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. 2022 मध्ये यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आदित्य वर्मा नावाच्या आरोपीने जुलै 2022 मध्ये मित्रांमध्ये सांगितले होते की, तो विमान उडवून देईल. धमकावण्यासाठी त्याने गमतीने स्वतःला तालिबानचा सदस्य म्हणवून घेतले होते. एका खाजगी स्नॅपचॅट ग्रुपमध्ये त्याने हा विनोद केल्याचे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणे किंवा विमानात स्फोट घडवणे हा त्याचा हेतू नव्हता.
दरम्यान, शुक्रवारी माद्रिद कोर्टाने दिलेल्या निर्णयात न्यायमूर्तींनी सांगितले की, अहवालानुसार त्या व्यक्तीकडून स्फोटके जप्त न झाल्याने कोणताही खरा धोका आढळला नाही. या घटनेच्या जवळपास दीड वर्षानंतर स्पेनच्या राजधानीतील राष्ट्रीय कोर्टाच्या या निर्णयात न्यायमूर्तींनी सांगितले की, दक्षिण-पूर्व लंडनमधील ऑरपिंग्टन, केंट येथे राहणाऱ्या आदित्य वर्माची आरोपातून मुक्तता करण्यात यावी.
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, विमानातून प्रवास करण्यापूर्वी त्याने मित्रांना मेसेज पाठवला होता. त्याला ब्रिटिश सुरक्षा दलांनी अटक केली. त्यानंतर ब्रिटिश सुरक्षा दलांनी हा संशयास्पद मेसेज स्पॅनिश अधिकाऱ्यांना पाठवला होता. या कारवाईवेळी इझी जेट विमान प्रवास करत होते. खबरदारी म्हणून या प्रवासी विमानाच्या सुरक्षेसाठी दोन स्पॅनिश F-18 लढाऊ विमाने पाठवण्यात आली होती. मेनोर्कामध्ये लँडिंग होईपर्यंत एक विमान पाठलाग करत होते. स्पेनमधील विमानतळावर विमानाची कसून झडती घेतल्यानंतर 18 वर्षीय आरोपी आदित्य वर्माला अटक करण्यात आली होती. दोन दिवस स्पॅनिश पोलिस सेलमध्ये ठेवल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता.
दुसरीकडे, या प्रकरणात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला तो म्हणजे स्नॅपचॅट हे एन्क्रिप्टेड ॲप असूनही मेसेज कसा सापडला? दिलेला एक युक्तिवाद असा होता की, मेसेज गॅटविकच्या वाय-फाय नेटवर्कवर रोखले जाऊ शकतात. तथापि, विमानतळाच्या प्रवक्त्याने बीबीसी न्यूजला सांगितले की, त्यांच्या नेटवर्कमध्ये तसे करण्याची क्षमता नाही. न्यायमूर्ती म्हणाले की, स्नॅपचॅटवर पाठवलेला मेसेज इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणेने रोखला होता, परंतु याची कारणे अज्ञात आहेत. विमान फ्रेंच हवाई क्षेत्रात उड्डाण करत असताना हा मेसेज दिसला होता.
दरम्यान, ब्रिटीश अधिकाऱ्यांना हा मेसेज कसा मिळाला, त्यांनी उड्डाणाच्या मध्यातच विमानाच्या सुरक्षेबाबत त्यांना कसे सतर्क केले? या प्रश्नांवर न्यायमूर्ती म्हणाले की, या प्रकरणाशी संबंधित पुरावे समाविष्ट नाहीत. या प्रकरणी स्नॅपचॅटच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ही घटना 'वैयक्तिक' मानते. या प्रकरणात काय झाले यावर कंपनी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.