Israel-Hamas War: बॉम्बस्फोट, धुराचे ढग आणि हवेत गनपावडरचा वास... युद्धबंदीनंतर तासाभरात गाझामधील परिस्थिती बदलली आहे. इस्रायली सैन्याने गाझामध्ये जमिनी कारवाई सुरु केली आहे. गाझामधील हमासच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये युद्धविराम संपल्यानंतर सुरु झालेल्या लढाईच्या पहिल्या तासात दोन डझनहून अधिक लोक मारले गेले. सुरुवातीच्या काही तासांत 29 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-कुद्रा यांनी एएफपीला सांगितले की, मध्य गाझामधील अल-मगाझीमध्ये 10, दक्षिणेकडील रफाहमध्ये नऊ आणि उत्तरेकडील गाझा शहरात पाच जण ठार झाले.
दरम्यान, हमाससोबतच्या युद्धविरामाची मुदत संपल्यानंतर गाझामधील हमासच्या लक्ष्यांवर इस्रायलच्या लढाऊ विमानांकडून हल्ले केले जात आहेत. हमासशासित गाझा पट्टीच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, दक्षिण गाझावर हवाई हल्ले केले जात आहेत. गाझा पट्टीतून आलेल्या फोटोंमध्ये या परिसरात दाट काळा धूर दिसत आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमास यांच्यातील तात्पुरता युद्धविराम शुक्रवारी सकाळी 7 वाजता संपला आणि अवघ्या अर्ध्या तासानंतर इस्रायली सैन्याने हल्ल्याची घोषणा केली. यापूर्वी, इस्रायलने हमासवर युद्धविरामाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता आणि गाझामधून इस्रायलच्या दिशेने रॉकेट डागल्याचे म्हटले होते.
दरम्यान, हा युद्धविरामाचा एक आठवडा 24 नोव्हेंबरला सुरु झाला होता. सुरुवातीला चार दिवस आणि नंतर मध्यस्थी करणार्या कतार आणि इजिप्त या देशांच्या मदतीने दोन दिवस आणि नंतर आणखी एक दिवस युद्धविराम वाढवण्यात आला. हमास आणि गाझामधील इतर गटांनी एका आठवड्याच्या युद्धविरामात 100 हून अधिक ओलीस सोडले, त्यापैकी बहुतेक इस्रायली आहेत. त्या बदल्यात इस्त्रायली तुरुंगातून 240 पॅलेस्टिनींची सुटका करण्यात आली.
आतापर्यंत बहुतांश महिला आणि मुलांची सुटका करण्यात आली आहे, परंतु काही ओलीस अजूनही हमासच्या ताब्यात आहेत. हमासने गाझावर 16 वर्षे राज्य केले असून उर्वरित ओलीसांच्या विशेषत: सैनिकांच्या सुटकेसाठी हमास कठोर अटी घालू शकते, असे मानले जाते. गाझामध्ये अजूनही शंभरहून अधिक ओलीस ठेवण्यात आले असून उर्वरितांची सुटका करण्यात आली आहे. मध्यस्थीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कतार आणि इजिप्तने युद्धविराम आणखी दोन दिवस वाढवण्याचा प्रयत्न केला होता.
दुसरीकडे, इस्रायलवर त्याचा मुख्य मित्र असलेल्या अमेरिकेकडून दबाव आहे की त्याने हमासवर हल्ले सुरु करताना त्यात नागरिकांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्यावी. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी गुरुवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली. ब्लिंकन यांनी युद्धविरामाचा कालावधी वाढवला जाईल, अशी आशा व्यक्त केली होती. जर इस्रायलने युद्ध पुन्हा सुरु केले आणि दक्षिण गाझामध्ये हमासच्या विरोधात कारवाई केली तर त्याला "आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यानुसार" असे करावे लागेल आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी "स्पष्ट सूचना" असतील.
गाझाची बहुतेक लोकसंख्या दक्षिण गाझामध्ये स्थलांतरित झाली आहे, त्यामुळे तिथे इस्रायलच्या कोणत्याही कारवाईमुळे होणार्या जीवितहानीपासून नागरिकांचे संरक्षण कसे होईल, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. हमास कैद्यांची सुटका करेपर्यंत युद्धविराम पाळणार असल्याचे इस्रायलने म्हटले होते. मात्र, त्यानंतर इस्रायलने पुन्हा हल्ले सुरु करण्याची शपथ घेतली. नेतन्याहू यांच्यावर ओलिसांची सुटका करण्यासाठी तीव्र दबाव आहे, परंतु त्यांचे अतिउजवे मित्र हमास पूर्णपणे नष्ट होईपर्यंत युद्ध चालू ठेवण्यासाठी दबाव आणत आहेत. त्याचबरोबर जर काही गोंधळ झाला तर ते युती सोडतील अशी भीतीही नेतन्याहू यांना आहे. युद्धविरामादरम्यान एकूण 83 इस्रायलींना सोडण्यात आले आहे. याशिवाय, 24 इतर ओलिसांना सोडण्यात आले, ज्यामध्ये 23 थायलंडमधील आणि एक फिलिपिन्सचा आहे. इस्रायलने म्हटले आहे की, त्यांचे किमान 125 लोक अजूनही हमासच्या कैदेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.