Hurun Researchs List: भारत आणि चीन आर्थिक आघाडीवरही एकमेकांना टक्कर देत आहेत. यातच आता, भारताने एका बाबतीत चीनला मागे टाकून कमाल केली आहे. भारताने चीनला अब्जाधीशांच्या बाबतीत मागे टाकले आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईने ही कमाल केली आहे. मुंबईने बीजिंगला मागे टाकत आशिया खंडात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आता आशियातील सर्वाधिक अब्जाधीश मुंबईत आहेत. या बाबतीत मुंबई आता जगातील तिसरे मोठे शहर बनले आहे. मुंबईच्या पुढे न्यूयॉर्क आणि लंडन ही शहरे आहेत.
हुरुन रिसर्चच्या 2024 च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार, मुंबई (Mumbai) बीजिंगला मागे टाकत प्रथमच आशियातील सर्वात मोठे अब्जाधीश केंद्र म्हणून उदयास आले आहे. बीजिंगमध्ये 91 अब्जाधीश राहतात. तर आता भारताची आर्थिक राजधानी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत 92 अब्जाधीश आहेत, तरीही चीनमध्ये भारताच्या 271 च्या तुलनेत 814 अब्जाधीश आहेत. विशेष म्हणजे, अब्जाधीशांच्या बाबतीत मुंबई आता जगातील तिसरे मोठे शहर बनले आहे. शीर्षस्थानी न्यूयॉर्क आहे, जिथे 119 अब्जाधीश राहतात. त्यानंतर लंडनचा क्रमांक लागतो, जिथे 97 अब्जाधीश आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी मुंबईत 26 नवीन अब्जाधीश निर्माण झाले. त्यामुळे या शहरात राहणाऱ्या अब्जाधीशांची एकूण संपत्ती 445 अब्ज डॉलर झाली आहे. जे गतवर्षीच्या तुलनेत 47 टक्के अधिक आहे. याउलट, बीजिंगच्या (Beijing) अब्जाधीशांची एकूण संपत्ती 265 अब्ज डॉलर आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 28 टक्क्यांनी घसरली आहे. मुंबईच्या अब्जाधीशांच्या निव्वळ संपत्तीत वाढ करणाऱ्या क्षेत्रांमध्ये ऊर्जा आणि फार्मास्युटिकल्सचा समावेश आहे, ज्यामध्ये मुकेश अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
मुंबईतील बिलेनियर एलीटमध्ये, रिअल इस्टेटमधील दिग्गज मंगल प्रभात लोढा आणि त्यांच्या कुटुंबाच्या एकूण संपत्तीमध्ये सर्वाधिक 116 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, जागतिक पातळीवर भारतीय अब्जाधीशांच्या क्रमवारीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. मुकेश अंबानी सध्या 10 व्या स्थानी कायम आहेत, ज्याचे श्रेय मोठ्या प्रमाणावर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या यशाला जाते. नेटवर्थमध्ये वाढ झाल्यामुळे गौतम अदानी 15व्या स्थानावर पोहोचले आहेत.
सन फार्मास्युटिकल्सचे दिलीप सांघवी आणि कुमार मंगलम बिर्ला यांच्या निव्वळ संपत्तीत वाढ झाली आहे. एचसीएलच्या शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाच्या नेट वर्थ आणि जागतिक क्रमवारीत वाढ झाली आहे. शिव नाडर 34व्या स्थानी पोहोचले आहेत. याउलट सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस एस पूनावाला 55व्या स्थानावर आहेत. दरम्यान, DMart च्या यशामुळे राधाकिशन दमाणी यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत असून, ते जागतिक स्तरावर 100 व्या स्थानी पोहोचले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.