
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन: भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबविल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (ता.१४) पुन्हा एकदा केला. भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव व्यापाराच्या माध्यमातून थांबवून संभाव्य अणुयुद्ध टाळले असल्याचे ते म्हणाले.
व्हाइट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये ‘नाटो’चे सरचिटणीस मार्क रूट यांच्या बरोबर रात्री झालेल्या बैठकीत त्यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, ‘‘आम्ही अनेक युद्धांतून समाधानकारक तोडगा काढला आहे. तुमच्यासमोर भारत-पाकिस्तानचे उदाहरण आहे. तसेच रवांडा आणि कांगोत गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या युद्ध आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष सुरूच राहिला असता तर आणखी एका आठवड्याने अणुयुद्ध झाले असते. ते खूप वाईट चालले होते. पण आम्ही व्यापाराच्या माध्यमातून ते थांबविले.’’ ‘जोपर्यंत तुम्ही यातून तोडगा काढत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याशी व्यापाराबद्दल बोलणार नाही, असे मी त्यांना निक्षून सांगितले आणि त्यांनी तसे केले.
ते दोघेही महान होते, महान नेते होते,’असे ते म्हणाले. युद्ध थांबविल्याचा ट्रम्प यांचा हा पहिलाच दावा नव्हता. त्यांनी दहा मे रोजी सोशल मीडियावर पोस्ट करून अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान तत्काळ आणि पूर्ण युद्धबंदीला सहमत झाल्याचे सांगितले होते. तेव्हापासून आतापर्यंत ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव संपुष्टात आणण्यास अमेरिकेने निर्णायक भूमिका बजावल्याचा दावा अनेक वेळा केलेला आहे.
भारत सरकारने यापूर्वीही ट्रम्प यांचा हा दावा पूर्णपणे फेटाळलेला आहे. तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीमुळे नाही तर भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या (लष्करी कारवाई विभागाचे महासंचालक स्तरावर) थेट चर्चेनंतरच दोन्ही देशांनी युद्धबंदीस मान्यता दिली होती, असे सरकारने ठामपणे सांगितले आहे. भारताला त्याच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर इतरांचा हस्तक्षेप मान्य नाही. सीमेवरील शांततेसाठी भारत लष्करी पातळीवर पाकिस्तानशी चर्चा करतो. गेल्या महिन्यात ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या सुमारे ३५ मिनिटांच्या संभाषणात भारत कधीही आणि कदापी मध्यस्थी स्वीकारणार नाही. पाकिस्तानच्या विनंतीवरून लष्करी कारवाया थांबविण्याबाबत भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात चर्चा झाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठामपणे सांगितले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.