'फायदा असेल तर धोका मान्य', बलुचिस्तानच्या खनिजसंपत्तीवर ड्रॅगनची नजर

पाकिस्तानमधील (Pakistan) सुरक्षेचे धोके वाढत असतानाही चीनने बलुचिस्तान प्रांतातील सोने आणि तांब्याच्या खाणींची लीज आणखी 15 वर्षांसाठी वाढवली आहे.
Imran Khan & Xi Jinping
Imran Khan & Xi Jinping Dainik Gomantak

पाकिस्तानमधील सुरक्षेचे धोके वाढत असतानाही चीनने बलुचिस्तान प्रांतातील सोने आणि तांब्याच्या खाणींची लीज आणखी 15 वर्षांसाठी वाढवली आहे. अलीकडे बलुचिस्तान प्रांतात अनेक प्राणघातक दहशतवादी हल्ले झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रांतामध्ये चीनविरोधी (China) रोष वाढत आहे. बलुचिस्तानला (Balochistan) मुक्त करण्यासाठी चळवळ चालवणाऱ्या संघटनांचा आरोप आहे की, चिनी प्रकल्पांचा स्थानिक जनतेला अजिबात फायदा झालेला नाही. उलट त्यांच्यामुळे या प्रांताचे वातावरण दूषित झाले आहे. (China Is Focusing More On Balochistan's Mineral Resources)

दरम्यान, खाणींची लीज आणखी 15 वर्षांसाठी वाढवण्याचा करार पाकिस्तानच्या सॅनडाक मेटल्स लिमिटेड (SML) आणि चीनी कंपनी मेट्रोलॉजिकल कन्स्ट्रक्शन कंपनी ऑफ चायना (MCC) यांच्यात झाला आहे. आधीच सुरु असलेल्या कराराचा कालावधी 31 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्ण होणार होता. मात्र आता त्याची मुदत 31 ऑक्टोबर 2037 पर्यंत वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे चीनने पाकिस्तानमधील ढासळत्या सुरक्षा परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली असली तरी पाकिस्तानमध्ये आर्थिक प्रकल्प सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानमध्ये तैनात असलेल्या चिनी जवानांच्या संख्येत वाढ

अलीकडे चिनी प्रकल्पांबाबत स्थानिक जनतेमध्ये विशेष नाराजी आहे. गेल्या वर्षी दासू जलविद्युत प्रकल्पावर प्राणघातक हल्ला झाला होता, ज्यामध्ये नऊ चीनी अभियंते ठार झाले होते. हा हल्ला उत्तर-पश्चिम कोशिस्तान भागात झाला होता. मात्र तज्ज्ञांचे मतानुसार, सुरक्षा धोक्यात असतानाही अलीकडे पाकिस्तानमध्ये चिनी जवानांची संख्या वाढली आहे. हे कर्मचारी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) शी संबंधित प्रकल्पांवर तसेच इतर प्रकल्पाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, चीनच्या योजना मंत्रालयाने 2017 मध्ये सांगितले होते की, त्यावेळी 60 हजार चिनी लोक पाकिस्तानमध्ये (Pakistan) काम करत होते. तर 2013 मध्ये ही संख्या केवळ 20 हजार होती. एशिया टाईम्स या वेबसाइटने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, आता पाकिस्तानमध्ये काम करणाऱ्या चिनी लोकांची संख्या सुमारे चार लाख आहे. तथापि, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

पाकिस्तानमध्ये 70 हून अधिक चिनी कंपन्या कार्यरत

अमेरिकन नियतकालिक फॉर्च्युनने नुकत्याच दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, जगातील टॉप 500 कंपन्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या 143 चिनी कंपन्यांपैकी निम्म्याहून अधिक कंपन्या पाकिस्तानमध्ये व्यवसाय करत आहेत. बलुचिस्तान प्रांतातील समृद्ध खनिज साठ्यांवर चीनची नजर असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिथे चिनी कंपन्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. बलुचिस्तानमध्ये चीनविरोधी रोष वाढण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.

पाकिस्तानच्या सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषिका आयशा सिद्दीकी यांनी एशिया टाईम्सला बोलतना म्हटले होते की, वाढत्या सुरक्षा धोक्यांमध्ये चीनने पाकिस्तानमध्ये राहण्याची दोन मुख्य कारणे आहेत. 'पहिले कारण म्हणजे बलुचिस्तानमध्ये खनिजांचे भरपूर साठे आहेत, ज्याची चीनला गरज आहे. यामध्ये सोने, तांबे, लोखंड, चांदी, शिसे, जस्त, बॅराइट आणि क्रोमाईटच्या खाणींचा समावेश आहे. दुसरे कारण म्हणजे बलुचिस्तानमध्ये चीनचे भू-राजकीय हितसंबंध आहेत. तिथे त्यांनी आधीच ग्वादर बंदर बांधले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com