Chaturthi In Goa: 200 मंडळींचं घर, नेत्रावळीतील प्रभुदेसाईंच्या 'रक्तवर्ण' गणेशाचा अडीचशे वर्षांचा अनोखा इतिहास

Chaturthi celebration in Goa: नेत्रावळीतील प्रभुदेसाई यांच्या गणेशउत्सवाची रंजक परंपरा
Chaturthi celebration in Goa: नेत्रावळीतील प्रभुदेसाई यांच्या गणेशउत्सवाची रंजक परंपरा
Netravali Ganesh Chaturthi Dainik Gomantak
Published on
Updated on

Netravali, Goa

गोवा आणि गणेश चतुर्थी याचा वेगळाच मेळ आहे. गणपती आगमनाच्या एक-दोन महिन्यांपासूनच इथे तयारीची लगबग सुरु होते. लहान मुलं असो वा तरुण पिढी बाप्पासाठी सारं काही परफेक्ट असावं म्हणून सगळेच दिवसाची रात्र करतात.

गोमंतकाच्या भूमीत चतुर्थीच्या इतिहासाची अनोखी पानं उलघडून पाहायला मिळतात. काही घराण्यांमध्ये गणपतीची पिढीजात चालत आलेली वेगळी परंपरा आढळते आणि अभिमानाची बाब म्हणजे आजच्या आधुनिक जगात देखील गोवेकर आपल्या परंपरेला धरून असल्याची जाणीव होते.

दक्षिण गोव्यातील निसर्गसंपन्न नेत्रावळी गावातील प्रभुदेसाई कुटुंब म्हणजे यांपैकीच एक.

प्रभुदेसाईंचा वाडा:

नेत्रावळीतील प्रभुदेसाई यांच्या गणेशउत्सवाची परंपरा रंजक आहे. इथे गेल्या अनेक वर्षांपासून केवळ लाल रंगातील गणेशमूर्तीची पूजा केली जाते आणि एवढ्या वर्षांत यात कधीही फेरबदल करण्यात आलेला नाही. गावात सर्वात शेवटच्या टोकाला प्रभुदेसाईंचं दोन चौपेटीचं भलं मोठं घर पाहायला मिळतं.

Prabhudessai Ganeshutsav
Prabhudessai Ganeshutsav Dainik Gomantak

अंगणांमध्ये तुळशीवृंदावन आणि चारही बाजूला खोल्यांनी रचलेल्या या घरात प्रवेश करताच गणेशपूजेची चौकी पाहायला मिळते. याच गणेशचौकीच्या समोरच्या भागात जुन्या काळी न्यायनिवाडा केला जायचा आणि म्हणूनच प्रभुदेसाईंच्या वाड्याला चावडी म्हणतात अशी माहिती श्रावणी प्रभुदेसाई यांनी दिली.

Chaturthi celebration in Goa: नेत्रावळीतील प्रभुदेसाई यांच्या गणेशउत्सवाची रंजक परंपरा
Netravali Panchayat: गटार बांधण्याच्या नावावर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार; नेत्रावळीच्या पंचाचे सरपंचांवर गंभीर आरोप

भलंमोठं कुटुंब आणि गणेशमूर्ती:

प्रभुदेसाईंच्या या वाड्यात १५० ते २०० लोकांची घरं असून वर्षभर कामानिमित्त इतरत्र ठिकाणी असलेली ही मंडळी चतुर्थीच्यावेळी मात्र हमखास गणेशाच्या उपासनेत सहभागी होतात.

उल्लेख केल्याप्रमाणे प्रभुदेसाईंच्या घरी पूजली जाणारी गणेशमूर्ती ही नेहमी लाल रंगाचीच असते. शास्त्रात श्रीगणेशाच्या केलेल्या वर्णनाला अनुसरून रक्तवर्ण गणेशमूर्ती बनवली जाते आणि या परंपरेला तब्बल अडीचशे वर्षांचा जुना इतिहास जोडलेला आहे.

पूर्वी प्रभुदेसाई कुटुंबजवळ आठ गावांचे अधिपत्य होते आणि तेव्हापासूनच एका ठराविक माणसाकरवी ही गणेशमूर्ती बनवली जाते. महत्वाची बाब म्हणजे प्रभुदेसाईंच्या घरात पुजली जाणारी मूर्ती अखंड असते, मूर्तिकार कोणत्याही साच्याचा वापर न करता हाताने गणेशमूर्ती घडवतो.

Red Colour Ganesh Idol
Red Colour Ganesh IdolDainik Gomantak

पुढे मूर्तीला मुकुट आणि वैजयंती माळेने सजवलं जातं. या मूर्तीच्या खांद्यावर कुंडलं असून त्यावर बसलेले पोपट हे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. चालीरीतीनुसार प्रतिवार्षिक पाच दिवस इथे गणपती विराजमान होतात, मात्र एखादवेळेस घरच्या मंडळींकडून नवस केला असल्यास इच्छापूर्तीनंतर सात दिवसांसाठी गणेशपूजा केली जाते.

वाचस्पतीची उपासना:

प्रभुदेसाई कुटुंबातील सदस्य सुरेंद्र प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी साजरी होते. ऋषींची विधिवत स्थापन आणि पूजेनंतर त्यांना कंदमुळांचा नैवेद्य नैवेद्य दाखवला जातो. वैशिष्टय म्हणजे यादिवशी बनणाऱ्या पंचामृतात केवळ म्हशीच्या दुधाचा वापर केला जातो. ऋषिपंचमीच्या दिवशी ऋषीपूजेसोबत नूतनधान्याची पूजा करण्याची प्रथा आहे, ज्यात नवीन कापणी केलेल्या धान्यांची पूजा केली जाते.

Prabhudessai From Netravali
Prabhudessai From Netravali Dainik Gomantak

विघ्नांतक गणेशाची उपासना म्हणून चौथ्या दिवशी अथर्वशीर्षाच्या सहस्त्र आवर्तना करत सहस्त्र दुर्वा अर्पण केल्या जातात. घरात उपस्थित पुरुषमंडळींकडून गणेशचौकीच्या आवारात ही उपासना केलेली पाहायला मिळते आणि संध्याकाळी पुराण, थोरली पूजा अशा अनेकविध प्रकारे गणेशाची मनोभावे सेवा केली जाते.

गणपतीचं मखर:

प्रभुदेसाईंच्या घरात गणपतीबाप्पाची वापरलं जाणारं मखर देखील पारंपरिक आहे. मखराच्या दोन्ही बाजूला फुलांच्या माळा जोडल्या जातात ज्याला गडगे असं म्हणतात तर मखराला जोडलेल्या कापडाला न्हेसण असं म्हटलं जातं. पुढे गणपतीच्या या मखराचा वर्षभर सरस्वती पूजनासारख्या सणांसाठी वापर केला जातो.

Prabhudessai Family
Prabhudessai Family Dainik Gomantak

गणपतीचे दर्शन घ्यायला आलेल्या प्रत्येक भाविकांचं घरच्या मंडळींकडून हसतमुखाने स्वागत होतं. घरातील महिलावर्ग सकाळपासून नैवेद्याच्या तयारीत गुंतलेला असतो. एकंदरीतच प्रभुदेसाई मंडळी खेळीमेळीने हा सण साजरा करतात, संध्याकाळची वेळ तर हमखास फुगड्यांनी बहरून जाते. प्रत्येक तासाला बदलणाऱ्या या जगात आज देखील परंपरा जपणाऱ्या प्रभुदेसाईंच्या गणेशाचे आज विसर्जन होईल आणि पुढल्या वर्षी लवकर या असे म्हणत ही मंडळी बाप्पाकडून मिळालेल्या उत्साहाने आणि ऊर्जेने पुन्हा कामावर रुजू होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com