नारायण देसाई
Goa News: जागतिक बँकेने प्रसारित केलेल्या ताज्या आकडेवारीत भारतातील गरिबीचे एक विदारक वास्तव समोर आले आहे. भारतातील कार्यसक्षम आणि श्रमधर्मी वर्गातील तेरा टक्के लोकांची (यात बेरोजगार, वृद्ध-विकलांग, मुले यांचा समावेश नाही) रोजची कमाई २.१५ डॉलर म्हणजे आजच्या दराने १८० रुपयांपेक्षा कमी असल्याचे ही आकडेवारी सांगते. या घटकाला अतिगरीब म्हणता येईल का, असा प्रश्न आजघडीला आजच्या महान स्वर्णिम लोकशाहीत विचारणे हीच खरी देशसेवा मानली जावी. नागरिकाची भूमिका आपल्या ‘सेवकां’ना किमान एवढी जाणीव तरी देण्याची असायला हवी.
भारतीय शासनव्यवस्थेत राज्यकर्त्यांच्या लहरीनुसार आकडेवारी शिजवण्याची संस्कृती, प्रशासकीय विभागांना आकडेवारी जनतेसाठी प्रसृत न करण्याचे आदेश दिल्लीत निघत विकसते. पण विश्वाला गवसणी घालू पाहणाऱ्या मायबाप सत्ताधीशांना जागतिक बँकेवर विश्वास ठेवावा लागेल.
गेल्या दीडशे वर्षांत पहिल्यांदाच नियमित खानेसुमारी न करताच कधी १४० ते १४५ कोटींचे आकडे हवेत उडवत, त्यातील ८२ कोटींना सरकार पाच किलो धान्य पुरवून (आता पुढे चालू ठेवून) स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. या आकडेवारीत दिसते त्यापेक्षा, अहवाल सांगतो त्याहून वस्तुस्थिती जास्त गंभीरही असू शकेल. भूक निर्देशांकात ११६ देशात भारत १०५ क्रमांकावर आहेच. (दहा वर्षात ५५ वरून १०५ असा हा प्रवास आहे.)
या आत्यंतिक गरिबीत जगणारे १८-१९ कोटी होतात. याच्या वरच्या स्तरावरील कमावत्या गटातील व्यक्तींची दैनिक कमाई ६.८५ डॉलर म्हणजे ५७६ रुपयांपेक्षा कमी आहे. मुक्त अर्थव्यवस्था भारताने स्वीकारली तेव्हा डॉलरचा दर १४ रुपये होता तो आता ८४ रुपये पार करून गेलाय. आणि अहवालातील निरीक्षण मान्य केले तर मध्यमवर्गीय भारतीय आता गरिबी रेषेच्या किंचित वर वा खाली असे हेलकावे खात खात घसरणीला लागला आहे, हे वास्तव स्वीकारणे भाग आहे.
१४ रुपये डॉलरवाल्या भारतात रामाला मुक्त करण्यासाठी कारसेवा झाली. तिने राजसत्ता दिली, तिच्या जोरावर रामाला घर बांधून दिल्यानंतर आलेले रामराज्य पुष्पक विमानाऐवजी बुलडोझरच्या रूपात अवतरले.
स्वतंत्र भारतात गरिबी निर्मूलनासाठी झटलेल्या राष्ट्रीयीकृत बँका अब्जाधीशांच्या कर्जमाफीद्वारे कंगाल करत, नोटबंदीतून जनतेच्या हातचे काम आणि बचत यांची विल्हेवाट लावून झाली. तरी आर्थिक धोरण, धोरणकर्ते आणि अर्थव्यवस्था यांचे काहीच सोयरसुतक सामान्य शिक्षित नागरिकालाही नसावे, यालाच ‘अमृतसिद्धी’ म्हणायचे का! लोकांचे लाडके झालेले आमचे दैवी आणि अजैविक कल्याणकर्ते कुणाचे कल्याण करत गेले हे समजायला अजून एक संदर्भ घ्यावा लागेल.
जागतिक कीर्तीचे फोब्सर् हे नियतकालिक धनाढ्यांसाठीचे, धनसंपत्तीविषयक माहितीदालन आहे. त्याने अलीकडेच भारतातील १०० धनाढ्यांकडे जगातील एकूण संपत्तीतील सात टक्के संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे, जिची मोजदाद १.१ ट्रिलियन म्हणजे १.१ लाख कोटी रुपये एवढी होते. यापैकी तीन नावे सर्वपरिचित आहेत - मुकेश अंबानी, गौतम अडानी आणि सावित्री जिंदल.
या तिघांची एकत्रित संपत्ती २७,९२० कोटी रुपये म्हणजेच या शतताऱ्यांच्या एकूण संपत्तीच्या अठ्ठावीस टक्के भरते. म्हणजे इतर ९७ धनाढ्यांत बाकी २८ टक्के विभागून गेलेले दिसतात. यावरून या अब्जाधीशांच्यातही गरीब धनाढ्य आणि श्रीमंत धनाढ्य आहेत हे दिसते. भारतातील क्रमांक दोन आणि क्रमांक तीन श्रीमंत यांच्यातील अंतर लक्षणीय म्हणजे सव्वासात हजार कोटींचे आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला प्रश्न पडू शकतो की हे आकडे आमच्या काय कामाचे?
नागरिक म्हणून नेमके हेच समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या देशाची आर्थिक धोरणे कुणाच्या हिताची आहेत हे समजून घेणे हेच नागरिकांचे कर्तव्य आहे.
आपल्या या शीर्ष धनाढ्यांपैकी एकाची मिळकत दररोज एक हजार कोटींनी वाढली तर दुसऱ्याची तासाला ९० कोटींनी वाढली - तीही कोविड काळात - यावरून काय ते समजून घ्यावे लागेल. आजही जीएस्टीचा आपण सामान्य लोक ५० टक्के भार उचलतो, मध्यमवर्गीयांवर ३३ टक्के भार येतो.
पण या धनाढ्य एक टक्का लोकांकडून फक्त तीन टक्के जीएस्टी येतो. म्हणजेच संपत्तीचे वितरण न होता तिचा संग्रह होत ती उत्पादक वापरातून बाहेर जाते. याच शीर्ष एक टक्का लोकांकडे ४० टक्के, वरच्या दहा टक्के लोकांकडे ५७ टक्के संपत्ती, तर खालच्या अर्ध्या लोकसंख्येकडे फक्त १३ टक्के संपत्ती अशी ही विषमता आहे. ही विषमता गरिबांच्या संख्येत भर घालते, तरी आपण स्वतःला जगात महान मानतो. छद्म महानतेचा भ्रम ही भारतीयांची गेल्या दशकातील महान उपलब्धी आहे.
समता, न्याय, बंधुता यांचे परस्पर नाते घनिष्ठ आहे. आजचा देशव्यापी द्वेष आणि त्वेष हीच तीन तत्त्वे नाकारल्याचा परिणाम आहे. सर्वधर्मसमभाव आणि सहिष्णुता, वैविध्य आणि समानता यांनीच समाज तरून जाऊ शकतो. त्वेष, द्वेष, हिंसा ही सत्ता मिळवण्याची आणि टिकवण्याची साधने म्हणून वापरणे फार काळ शक्य नसते, अखेर माणूस शांतीच्याच शोधात फिरतो ही इतिहासाची शिकवण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.