
Railway Ticket Booking Changes: तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक सुलभ आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण नियमांमध्ये बदल केले आहेत. यामध्ये, विशेषतः आपत्कालीन कोट्यासाठी (Emergency Quota) अर्ज करण्याच्या पद्धतीत मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रवासाच्या शेवटच्या क्षणी येणाऱ्या अडचणींवर मात करणे शक्य होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने आपत्कालीन कोट्याच्या जागांसाठी अर्ज सादर करण्याकरिता नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या या परिपत्रकानुसार, आता आपत्कालीन कोट्यासाठी अर्ज करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या एक दिवस आधी अर्ज सादर करावा लागेल. हा नवा नियम देशभरातील सर्व रेल्वे सेवांवर लागू करण्यात आला आहे. यापूर्वी, इमर्जन्सी कोट्यासाठी बुकिंग केवळ प्रवासाच्या दिवशीच करता येत होते, मात्र आता वेळेत बदल झाल्याने प्रवाशांना एक दिवस आधी तयारी करण्याची संधी मिळेल.
रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत प्रवास करणाऱ्या विशिष्ट लोकांसाठी आपत्कालीन कोटा राखीव ठेवला आहे. जागा वाटप करताना, उच्च सरकारी अधिकारी किंवा खासदार यांच्या स्वप्रवासाच्या आपत्कालीन कोट्याला त्यांच्या आंतरविभागीय ज्येष्ठतेनुसार प्रथम प्राधान्य दिले जाते. यानंतर ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीय आणीबाणी, नोकरीच्या मुलाखती आणि इतर विशिष्ट कारणांचा विचार करून उर्वरित कोटा वाटप केला जातो.
नवीन नियमानुसार, आपत्कालीन कोट्यासाठी अर्ज सादर करण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत:
मध्यरात्री १२ ते दुपारी १ या वेळेत धावणाऱ्या सर्व गाड्यांसाठी, प्रवासाच्या एक दिवस आधी दुपारी १ वाजेपर्यंत आपत्कालीन कोट्याचे अर्ज सादर करावे लागतील.
दुपारी १.०१ ते रात्री ११.५९ या वेळेत धावणाऱ्या इतर सर्व गाड्यांसाठी, प्रवासाच्या आदल्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत आपत्कालीन कोट्याचा अर्ज सादर करावा लागणार आहे.
रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी धावणाऱ्या गाड्यांसाठी, आपत्कालीन कोट्याचा अर्ज आदल्या दिवशीच सादर करावा लागेल.
भारतीय रेल्वेने गेल्या काही काळात इतरही काही महत्त्वपूर्ण नियम बदलले आहेत:
चार्ट तयार करण्याची वेळ: आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पहिला चार्ट तयार केला जाईल, जो पूर्वी फक्त ४ तासांपूर्वी केला जात असे. यामुळे ज्या प्रवाशांचे तिकीट निश्चित झालेले नाही, त्यांना पर्यायी तिकीट बुक करण्याची किंवा प्रवासाचे नियोजन करण्याची अधिक संधी मिळेल.
तत्काळ तिकिटांसाठी आधार बंधनकारक: तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. आधार पडताळणीशिवाय वापरकर्त्यांना लगेच तिकीट बुक करता येणार नाही. याशिवाय, १५ जुलैपासून ऑनलाइन तत्काळ बुकिंगसाठी आधार क्रमांकाशी जोडलेला ओटीपी देखील बंधनकारक करण्यात आला आहे.
प्रवासाची सोय: जर तुमच्याकडे प्रतिक्षा यादीतील तिकीट असेल, तर तुम्हाला आता स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रवास करता येणार नाही. यामुळे निश्चित तिकीट असलेल्या प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास करता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.