Cyclone Biparjoy Alert: बिपरजॉय चक्रीवादळाने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपले तीव्र रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई ते केरळ किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत.
समुद्राच्या मध्यातून उंच लाटा उसळत आहेत आणि किनाऱ्यावर आदळत आहेत. वादळाची परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोमवारी (12 जून) दुपारी एक वाजता बैठक बोलावली असून, त्यात ते तयारीचा आढावा घेणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
बिपरजॉयचे रविवारी तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले होते. ते भारताच्या किनारपट्टीकडे वेगाने पुढे जात आहे. 15 जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी त्याचा परिणाम आतापासूनच दिसायला लागला आहे. मुंबईत वादळी वाऱ्यांमुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे.
गुजरातमध्ये ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र प्रदेशात इशाऱ्याची स्थिती बदलली आहे. यापूर्वी येथे यलो अलर्ट जाहीर करण्यात आला होता. बिपरजॉय 15 जूनच्या दुपारपर्यंत मांडवी आणि कराची दरम्यान जाण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाच्या इशाऱ्यांदरम्यान, गुजरातच्या कच्छमधील सखल किनारपट्टीच्या भागातून लोकांना तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये हलवण्यात येत आहे. वृत्तसंस्था एएनआयने दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, रविवारी (11 जून) सहा जहाजांनी बंदर सोडले आणि आणखी 11 जहाजे सोमवारी निघतील. बंदर अधिकारी आणि जहाज मालकांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जोरदार वारे वाहत असल्याने त्याचा कोकण तसेच मुंबईच्या किनारी भागांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने कर्नाटक, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
तसेच, गणपतीपुळे येथील किनाऱ्यावर वादळ धडकल्याने बीचवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकल्याने व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर आता नुकसानग्रस्त भागांत शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.