
Phil Salt Record: टी-20 क्रिकेटच्या सध्याच्या काळात जगभरात वेगवेगळ्या टी-20 लीग्स खेळल्या जात आहेत. सध्या इंग्लंडमध्ये (England) सुरु असलेल्या 'द हंड्रेड' या स्पर्धेनेही क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत ओव्हल इन्व्हिंसिबल्स आणि मँचेस्टर ओरिजिनल्स यांच्यातील नुकत्याच झालेल्या सामन्यात ओव्हल इन्व्हिंसिबल्सने 9 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. मात्र, या सामन्यात मँचेस्टर ओरिजिनल्स संघाचा खेळाडू फिल सॉल्ट (Phil Salt) याने एक ऐतिहासिक कामगिरी केली.
दरम्यान, सामना मँचेस्टर ओरिजिनल्स संघाने गमावला असला, तरी त्यांचे सलामीवीर फलंदाज फिल सॉल्ट चर्चेत राहिले. त्यांनी आपल्या खेळीत 'द हंड्रेड' स्पर्धेत 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला. पुरुष गटात हा टप्पा गाठणारे ते पहिलेच फलंदाज ठरले आहेत. याआधी इतर कोणताही खेळाडू हा पराक्रम करु शकलेला नाही. विशेष म्हणजे, त्यांच्या एका दिवसापूर्वीच महिला गटात नॅट सिव्हीयर-ब्रंट हिने याच स्पर्धेत 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.
फिल सॉल्टने आपल्या खेळीच्या तिसऱ्या चेंडूवरच एक शानदार षटकार मारुन हा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने साकिब महमूदच्या गोलंदाजीवर मारलेला तो षटकार तब्बल 103 मीटर लांबीचा होता, जो मैदानात दूरवर जाऊन पडला. त्याच्या या दमदार खेळीने केवळ विक्रमच नाही, तर प्रेक्षकांचीही मने जिंकली.
दुसरीकडे, 2021 पासून द हंड्रेड स्पर्धेत खेळणाऱ्या फिल सॉल्टने आतापर्यंत 37 सामन्यांमध्ये एकूण 1036 धावा केल्या आहेत. यात त्यांनी 7 अर्धशतके झळकावली आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फिल सॉल्ट पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर 986 धावांसह जेम्स विन्स आहे. यामुळे फिल सॉल्टचे हे यश किती मोठे आहे, हे दिसून येते.
या सामन्यात मँचेस्टर ओरिजिनल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 100 चेंडूंमध्ये 7 विकेट्स गमावून 128 धावा केल्या होत्या. त्यांच्यासाठी फिल सॉल्टने 32 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर मार्क चॅपमनने 28 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज मात्र फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत.
त्यानंतर 129 धावांचा पाठलाग करताना ओव्हल इन्व्हिंसिबल्सच्या फलंदाजांनी जोरदार सुरुवात केली. त्यांचे फलंदाज तवांडा मुयेये (59 धावा) आणि विल जॅक्स (61 धावा) यांनी अर्धशतके झळकावत संघाला 9 विकेट्सनी सहज विजय मिळवून दिला. जरी मँचेस्टरला हार पत्करावी लागली असली तरी, फिल सॉल्टचा ऐतिहासिक विक्रम या सामन्याचे मुख्य आकर्षण ठरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.