
दुबईत झालेल्या आशिया कप २०२५ टी-२० सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ विकेट्सने धुव्वा उडवल्यानंतर शेजारच्या देशात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफने सर्व मर्यादा ओलांडत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला थेट लाईव्ह टीव्हीवर शिवीगाळ केली आहे. त्याच्या या लज्जास्पद कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत असून चाहत्यांकडून प्रचंड टीका होत आहे.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव भारतीय फिरकीपटूंनी मोडून काढला. कुलदीप यादवने अवघ्या १८ धावांत ३ बळी घेतले, तर अक्षर पटेलने २ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानने २० षटकांत ९ विकेट्स गमावत केवळ १२७ धावा केल्या.
प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी जोरदार सुरुवात केली. अभिषेक शर्माने १३ चेंडूत ३१ धावांची झंझावाती खेळी साकारली, तर सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाला साजेशी जबाबदारी पार पाडत ३७ चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या. टीम इंडियाने १५.५ षटकांत लक्ष्य गाठत पाकिस्तानला ७ विकेट्सने हरवले.
सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याची चर्चा रंगली. याच मुद्द्यावर पाकिस्तानी टीव्ही चॅनेल ‘सामा’वर झालेल्या वादविवादात मोहम्मद युसूफ सहभागी झाला होता. कार्यक्रमादरम्यान तापलेल्या चर्चेत युसूफने अचानक सूर्यकुमार यादवविरुद्ध शिवराळ भाषा वापरली. रिर्पोटरनं त्याला आवर घालण्याचा प्रयत्न केला, तरीही युसूफ थांबला नाही.
युसूफच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी त्याच्यावर संताप व्यक्त केला. अनेकांनी पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूकडून अशा पातळीवरचे वर्तन लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय संघाने हस्तांदोलन न केल्याचा मुद्दा आशियाई क्रिकेट परिषदेकडे नेला असून, पुढे आयसीसीकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.
टीम इंडियाने गट फेरीत पाकिस्तानवर मात केल्यानंतर आता ‘सुपर ४’ फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने जर पुढच्या सामन्यात यूएईवर विजय मिळवला, तर भारत-पाकिस्तान सामना रंगणार असून या वादाच्या पार्श्वभूमीवर तो सामना आणखी रंगतदार ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.