
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ही लोकमान्य टिळक यांची घोषणा फक्त राजकीय आंदोलनापुरती मर्यादित राहिली नाही. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ती पत्रकारितेतूनही तितक्याच तीव्रतेनं प्रतिध्वनित केली. त्यांनी 'केसरी' आणि 'मराठा' या दोन साप्ताहिकांद्वारे ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या लेखणीनं तरुणाईला धग दिली आणि ब्रिटिश सत्तेला हादरवलं.
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात राष्ट्रवादाची बीजे अंकुरत होती. इंग्रज सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात आवाज उठवणारी माध्यमं फारशी नव्हती. याच गरजेची जाणीव ठेवून टिळक, आगरकर, चिपळूणकर आणि गोखले यांनी १ जानेवारी १८८१ रोजी 'केसरी' आणि 'मराठा' या साप्ताहिकांची सुरुवात केली.'केसरी'चं संपादकपद हे आगरकरांकडे तर टिळकांकडे 'मराठा'चं संपादकपद होतं.
मात्र, त्यानंतर केसरीचं संपादकपद टिळकांनी स्वतःकडं घेतलं. त्यानंतर दोन्ही वृत्तपत्रांची जबाबदारी टिळकांनी सांभाळली. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांमध्ये टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. त्यांचे केसरी आणि मराठातील अनेक अग्रलेख चांगलेच गाजले होते. वृत्तपत्रांतून इंग्रज सरकारवर केलेल्या टीकेमुळं त्यांना तुरुंगवासातही जावं लागलं. मात्र तरीही इंग्रज सरकारविरोधात त्यांची लेखणी थांबली नव्हती.
ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांचा निषेध करणं, समाजात जागृती निर्माण करणं आणि भारतीय राष्ट्रवादाचा प्रचार करणं, हेच टिळक यांच्या पत्रकारितेमागील मुख्य उद्दिष्ट होतं. त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या माध्यमांतून इंग्रज सत्तेच्या दडपशाहीविरुद्ध लोकांमध्ये असंतोषाची ठिणगी पेटवली. सामाजिक सुधारणांपासून ते राजकीय चळवळीपर्यंत, प्रत्येक विषयावर टिळकांनी निर्भीडपणे मत मांडत समाजमन जागं करण्याचं कार्य केलं. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्राथमिक टप्प्यात राष्ट्रवादाची भावना रूजवण्यात त्यांच्या पत्रकारितेनं मोलाची भूमिका बजावली.
वर्नाक्युलर प्रेस अॅक्ट The Vernacular Press Act, १८७८
ब्रिटिश सत्तेनं १८७८ साली ‘वर्नाक्युलर प्रेस अॅक्ट’ नावाचा कायदा लागू केला. यामागचं मुख्य उद्दिष्ट होतं की, स्थानिक भाषांतील वृत्तपत्रांवर आणि प्रसारमाध्यमांवर नियंत्रण ठेवणं, कारण ही माध्यमं ब्रिटिशांच्या विरोधात लोकांमध्ये असंतोष निर्माण करत होती. इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रांना मात्र या कायद्यापासून सूट होती. टिळकांनी या कायद्याचा जोरदार निषेध केला. ‘केसरी’च्या अग्रलेखांमधून त्यांनी ब्रिटिशांच्या या दडपशाहीविरोधात स्पष्ट शब्दांत आवाज उठवला.
लोकमान्य टिळकांनी १८७८ च्या वर्नाक्युलर प्रेस अॅक्टच्या विरोधात ‘केसरी’मधून लिहिलेलं लिखाण हे धारदार आणि निर्भीड होतं. त्यांनी या कायद्याचा निषेध करताना असे स्पष्ट शब्दात लिहिलं होतं, "ब्रिटिश सरकारला स्थानिक भाषांतील वृत्तपत्रांची भीती वाटते, कारण ही वृत्तपत्रं लोकांमध्ये जागृती करतात. म्हणूनच इंग्रजी वृत्तपत्रांना मोकळीक देवून स्थानिक वृत्तपत्रांवर बंदी घातली. हा दडपशाहीचा प्रकार आहे."
टिळकांनी आपल्या लेखनातून लोकांना आवाहन केलं होतं की, "या कायद्याला विरोध करणे हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, कारण हा कायदा केवळ वृत्तपत्रांना नव्हे, तर स्वातंत्र्याच्या आशेला फास बसवणारा आहे." त्यांच्या या निर्भीड भूमिकेमुळे ‘केसरी’ केवळ वृत्तपत्र न राहता ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करणाऱ्या आवाजाचं प्रतीक बनलं.
१८७८ च्या वर्नाक्युलर प्रेस अॅक्टनंतर टिळकांनी सरकारवर सडकून टीका केली, पण त्यावेळी त्यांना शिक्षा झाली नाही. मात्र, या निर्भीड लिखाणामुळं ब्रिटिश सरकारनं टिळकांना 'धोकादायक पत्रकार' म्हणून ओळखलं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली.
लॉर्ड कर्झनचं विधान
ब्रिटिश व्हाईसरॉय Lord Curzon याने स्पष्टपणे म्हटलं होतं, "Tilak is the real threat. His pen is more dangerous than bombs." या विधानातून टिळकांच्या लेखणीचा प्रभाव किती खोलवर होता, हे दिसून येतं. एका बाजूला सशस्त्र क्रांतिकारकांची भीती असतानाही ब्रिटिश सरकारला टिळकांच्या लेखणीतून उठणाऱ्या सत्याच्या आवाजाची भीती वाटत होती.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ हे टिळकांचं ब्रीद होतं. हीच भावना त्यांनी ‘केसरी’च्या प्रत्येक ओळीत प्रतिबिंबित केली. त्यांच्या लेखांनी तरुणांना प्रेरणा दिली, जनतेला जागं केलं आणि स्वातंत्र्य संग्रामाला नवीन बळ दिलं. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत देशभक्तीचं बीज रोवलं.
१९०८ चा राजद्रोहाचा खटला
बंगालमधील क्रांतिकारी चळवळीला पाठिंबा देताना टिळकांनी लिहिलं, "शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी शस्त्र उचललं, त्यात चुकीचं काय?" यावरून त्यांच्यावर १९०८ मध्ये राजद्रोहाचा खटला चालवला गेला आणि त्यांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
लोकमान्य टिळक हे फक्त राजकीय नेता नव्हते, तर ते पत्रकारितेच्या माध्यमातून क्रांती घडवणारे महामानव होते. केसरीने इंग्रज सत्तेला हादरवलं आणि सामान्य जनतेला विचार करायला भाग पाडलं. आज पत्रकारिता जेव्हा बाजारूपणाच्या आरोपांमध्ये अडकते, तेव्हा टिळकांनी पत्रकारितेला दिलेला 'लढाऊ' चेहरा प्रत्येक भारतीयाला आठवतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.