Mughal Garden renamed as Amrit Udyan: सुमारे 106 वर्षे जुने मुघल गार्डन आता अमृत उद्यान म्हणून ओळखले जाणार आहे. अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलले आहे.
नाव बदलण्याच्या घोषणेनंतर दिल्ली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ‘मुघल गार्डन’ नावाचा जुना फलकही हटवला आहे.
मुघल गार्डनचा इतिहास?
ब्रिटिश राजवटीत 1911 मध्ये ब्रिटिशांनी कोलकात्याऐवजी दिल्लीला राजधानी बनवल्यावर रायसीना टेकडी कापून व्हाईसरॉय हाउस (सध्याचे राष्ट्रपती भवन) बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रिटीश वास्तुविशारद सर एडविन लुटियन्स यांना त्यासाठी खास इंग्लंडहून बोलावले गेले. त्यांनी व्हाइसरॉय हाऊसची रचना केली होती.
सर एडविन लुटियन्स यांनी 1917 पासून व्हाइसरॉय हाऊस बांधण्यास सुरुवात केली. व्हाईसरॉय हाऊसचे सौंदर्य वाढवण्यासाठी एक खास बाग तयार करण्यात आली. या बागेत अनेक प्रकारची फुले आणि झाडांच्या प्रजाती लावण्यात आल्या.
त्यावेळी व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांच्या पत्नी लेडी हार्डिंग यांना ही बाग आवडली नव्हती, असेही म्हटले जात असले तरी. मुघल गार्डन सन 1928 मध्ये पूर्ण झाले, रोप लागवडीचे काम 1928 ते 1929 पर्यंत चालले.
मुघल गार्डन नाव का ठेवले?
बाबरच्या हल्ल्यानंतर दिल्लीत मुघल साम्राज्याची सुरुवात झाली. यानंतर हुमायून, अकबर, शाहजहान आणि औरंगजेब यांनी दिल्लीचे तख्त ताब्यात घेतले. या काळात मुघलांनी देशभर बागा बांधल्या. दिल्लीत एक हजार (सुमारे 1200) पेक्षा जास्त बागा बांधल्या.
पुढे ब्रिटिशांनी मुघल परंपरा इंग्रजी सौंदर्यशास्त्रात विलीन केल्या. त्यामुळेच याला मुघलांचे नाव देण्यात आले. मुघल गार्डन्सची रचना ताजमहाल आणि जम्मू-काश्मीरच्या गार्डन्सपासून प्रेरित आहे. मुघल गार्डन चार भागात विभागले गेले आहे - चतुर्भुज बाग, तल्ला बाग, पडदा बाग आणि वर्तुळाकार बाग.
1950 मध्ये झाले सर्वसामान्यांसाठी खुले...
ब्रिटीश राजवटीत केवळ खास लोकांनाच हे उद्यान पाहता येत होते. ब्रिटीश राज्यकर्ते त्यांच्या पाहुण्यांना या बागेत फेरफटका मारण्यासाठी घेऊन जात. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात प्रजासत्ताक झाला आणि डॉ. राजेंद्र प्रसाद भारताचे राष्ट्रपती झाले.
व्हाईसरॉयच्या घराचे नाव बदलून राष्ट्रपती भवन करण्यात आले. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मुघल गार्डन पाहण्यासाठी सर्वसामान्यांना 'स्वातंत्र्य' दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी वसंत ऋतूमध्ये हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले जाते.
15 एकरात बाग, 138 प्रकारचे गुलाब, 10,000 पेक्षा जास्त ट्युलिप्स
दरवर्षी लाखो लोक राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनच्या उद्घाटनाची प्रतीक्षा करतात. 15 एकरात पसरलेल्या मुघल गार्डनमध्ये रंगीबेरंगी फुलांचे सौंदर्य आणि मुघल गार्डनचे सौंदर्य पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक दिल्लीत येतात. या बागेत 138 प्रकारच्या गुलाबांसोबतच 10,000 पेक्षा जास्त ट्युलिप्स आणि 70 विविध प्रजातींची सुमारे 5,000 हंगामी फुले असतील.
'अमृत उद्यान' 31 जानेवारीपासून सुरू होणार
राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी अमृत उद्यान (मुगल गार्डन) 31 जानेवारी ते 26 मार्च या कालावधीत सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. यानंतर 28 मार्चला फक्त शेतकऱ्यांसाठी आणि 29 मार्चला दिव्यांगांसाठी प्रवेश दिला जाईल. 30 मार्च रोजी हे उद्यान पोलिस, सुरक्षा दल आणि लष्कराच्या कुटुंबांसाठी खुले असेल.
अमृत उद्यानाला भेट देण्याची वेळ
जे ऑनलाइन आगाऊ बुकिंग करून पास घेतील, त्यांनाच प्रवेश दिला जाईल. सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत उद्यान खुले राहणार आहे. अमृत उद्यान दोन टायमिंग स्लॉटमध्ये उघडते. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ 7500 लोकांनाच तिकीट दिले जाईल. त्यानंतर दुपारी 12 ते 4 या वेळेत 10,000 लोकांना बागेला भेट देण्यासाठी पुन्हा पास दिले जातील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.