हजारो वाघांमधून (Tiger) एखादे पिल्लू असे जन्माला येते, हे रेसेसिव्ह जीन असले तरी ते अल्बिनो नाही. त्यामुळे भारतात (India) पुन्हा एकदा या पांढऱ्या वाघांची (White tiger) पैदास व्हावी, ही अपेक्षा आहे.
रणथंबोरच्या मचाणावरून खाली उतरताना मी फत्तेहसिंग राठोडना प्रश्न विचारला, कॅप्टन, व्हाईट टायगर क्या है? तोंडावर झुकलेल्या मिशा बाजूला सारत त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पांढऱ्या वाघांच्या वेगळ्या रोमांचित आणि अद्भुत विश्वात मला नेले. व्हाईट टायगर अर्थात पांढरा वाघ, हे जेनेटिक म्युटेशन आहे. नैसर्गिकदृष्ट्या दहा हजारांमध्ये असे एखादे पिल्लू जन्माला येते. याला गुणसूत्रांमधील कमतरता म्हणायला हरकत नाही.
मध्यप्रदेश मधील रिवा संस्थानच्या मार्तंडसिंग महाराजांनी पांढऱ्या वाघावर मोठे काम केले आहे. त्यांच्याकडे असलेल्या मोहन नावाच्या वाघाचे वंशज आता जगभर पसरले आहेत. त्यामुळे सध्या जगभरात जे पांढरे वाघ आहेत, त्यांचे मूळ रिवा आणि मार्तंडसिंग महाराज आहेत. १९५१ च्या मे महिन्यात जोधपूरच्या राजासाठी मार्तंडसिंग महाराजांनी बांधवगडच्या जंगलात शिकारीचा डेरा टाकला होता.
सकाळच्या सुमारास शिकार सुरू झाली. तरबेज शिकारी सोबतीला होते. त्यातल्या काहींनी महाराजांना शिकार असल्याच्या खुणा दिल्या. परत हाकारा सुरू झाला. शिकार टप्प्यात येताच महाराजांनी बार टाकले. शिकार फत्ते झाली; पण ही पिलावळ मादी होती. त्या काळातही शिकारीचे काही अलिखित नियम होते. शक्यतो मादी मारू नये. चुकून मारली आणि त्यावेळी तिच्याजवळ पिले असतील तर त्यांना पण मारली जावीत. ती परत उपासमारीने मरू नयेत, हा त्या पाठीमागचा उद्देश असावा. या शिकार केलेल्या वाघिणीजवळ तीन पिल्ले होती.
त्यात दोन नेहमीसारखी आणि एक पांढरे होते. शिकार नियमानुसार त्या दोन पिलांना मारण्यात आले. मात्र, पांढऱ्या बछड्याला महाराजांनी बंदिस्त केले आणि त्याची रवानगी समर महाल असणाऱ्या गोविंदगडच्या लेक पॅलेसमध्ये केली. या अत्यंत देखण्या आणि निळे डोळे असलेल्या पांढऱ्या बछड्याला महाराजांनी ‘मोहन’ नाव दिले. हाच तो मोहन साऱ्या जगातल्या पांढऱ्या वाघांचा पितामह. मार्तंडसिंग महाराजांनी मोहनसाठी गोविंदगडच्या लेक महालात खास ‘वाघवाडा’ बनवला. हा पांढरा वाघ बघण्यासाठी ठिकठिकाणचे राजे, सरदार, इंग्रज अधिकारी येऊ लागले. महाराजांना वाटू लागले, याचा वंश वाढवता आला पाहिजे. महाराजांनी तज्ज्ञांची मदत घेतली. सोबतीला चौकस असे शिकारी होते. त्यांनी त्यांच्याकडील ‘बेगम’ या वाघिणीशी संयोग घडवून आणला; पण तिला नेहमीसारखी तीन पिल्ले जन्माला आली. त्यावेळी महाराजांना काही तज्ज्ञांनी बॅकक्रॉसची माहिती दिली.
त्यानुसार मोहन आणि ‘बेगम’ची मुलगी असणाऱ्या ‘राधा’शी मोहनचा संकर केला आणि एक अद्भुत घटना घडली. राधाला ३० ऑक्टोबर १९५८ रोजी चार बछडे जन्माला आले आणि ते चारही पांढरे वाघ होते. काही दिवसांनी यातील राजा-राणी नावाची दोन पिल्लं दिल्लीच्या राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला देण्यात आली. एक पिल्लू कोलकात्याच्या अलीपूर प्राणी संग्रहालयाला देण्यात आले आणि मोहिनी नावाची एक मादी महाराजांनी आपल्याकडे ठेवली. पुढे राजा-राणीला दोन पांढरी बछडी झाली. त्यातील डायना नावाची पांढरी वाघीण ओरिसाच्या नंदनकानन संग्रहालयाला पाठवण्यात आली आणि तेज नावाची वाघीण अहमदाबाद प्राणी संग्रहालयाला पाठवण्यात आली. तर दोन पांढरे वाघ म्हैसूरच्या प्राणी संग्रहालयाला पाठवले. अशा रितीने ६० च्या दशकात देशभरातल्या बहुतांश प्राणि संग्रहालयांमध्ये मोहनचे वंशज नांदू लागले.
१९६० मध्ये अमेरिकन उद्योगपती जॉन क्लूग यांनी मार्तंडसिंग महाराजांकडील मोहिनी ही पांढरी वाघीण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसन हावर यांना भेट दिली. हा सौदा १० हजार डॉलरला झाला होता. याच दरम्यान भारताने पांढरे वाघ परदेशात पाठविण्यावर बंदी घातली. पुढे याच उद्योगगपतीने नेहरूंना विनंती करून महाराजांकडून ‘रूप’ नावाचा नर विकत घेतला आणि तो अमेरिकेच्या राष्ट्रीय संग्रहालयाला भेट दिला.
अमेरिकन सरकारने अहमदाबाद इथून सॅमसन नावाचा नर अमेरिकेला नेण्यात आला. सध्या त्यांची पुढची पिढी अमेरिकेत वाढत आहे. दरम्यान १९६३ साली इंग्लंडच्या ब्रिस्टल संग्रहालयासाठी महाराजांनी आपल्याकडची चंपक आणि चमेली नावाच्या पांढऱ्या वाघांची जोडी दिली. आजही मोहन आणि राधाचा वंश तिथंही वाढत आहे.
भारताबरोबर जगभरात आज जे पांढरे वाघ आहेत, ते मार्तंडसिंग महाराजांच्या कार्याचे फलित आहे. रिवा संस्थानमध्ये १९७६ पर्यंत पांढरे वाघ वाढले. त्यांच्याकडच्या शेवटच्या वाघाचे नाव विराट होते. मोहन ने २० व्या वर्षी १९६९ साली जगाचा निरोप घेतला. तत्पूर्वी त्याने तब्बल ११४ पांढऱ्या आणि ५६ नेहमीसारख्या वाघांना जन्म दिला होता. पांढरे वाघ हे रेसेसिव्ह जीन आहे. त्यामुळे त्यांच्यात सध्याही काही अनुवंशिक कमतरता दिसत आहे.
क्रॉसआय, इनपियर डिसटेबल, जेनेटिक इम्पिअरमेंट हे त्यापैकी काही होय. त्यामुळेच या वाघांची पिलं जगण्याचे प्रमाणही निम्म्यापेक्षा कमी आहे.
सध्या जगभरात नैसर्गिक जंगलात पांढरे वाघ नाहीत. जे काही दोनशेच्या आसपास वाघ आहेत, ते सारे ह्युमन केपटिव्हिटी म्हणजे संग्रहालयात आहेत. मुळात त्यांचा जन्म वेगवेगळ्या संग्रहालयांत झाला आहे. त्यात कॅट फॅमिलीमध्ये ब्रेन डिस्ट्रिक्ट आहे. त्यामुळे त्यांचा विचार करण्याची क्षमता संपली आहे. आपले खाद्य इतर जनावरांना मारून मिळवायचे असते, हेच ते विसरले आहेत. त्यामुळे नैसर्गिक अधिवासात सध्या तरी ते राहू शकत नाहीत. ह्युमन केपटिव्हिटीमध्ये राहिल्याने आणि अनुवंशिकतेमुळे पांढऱ्या वाघाची पिल्ले इतर वाघांच्या मानाने मोठी होतात. फत्तेहसिंग आज आपल्यात नाहीत.
पण रिवाच्या जवळच मध्य प्रदेश सरकारने जगातील पहिली व्हाईट टायगर सफारी सुरू केली आहे. अपेक्षा आहे की, तिथं नैसर्गिकदृष्ट्या पांढरे वाघ वाढतील आणि त्यांची पैदास सुरू होईल. या व्हाईट टायगरला सलाम करण्यासाठी भारतीय नौदलाने १९६० मध्ये मिग-२९ या लढाऊ विमानाच्या जथ्थ्याला ‘व्हाईट टायगर स्कॉड्रन’ असे नाव दिले. सध्या हे स्कॉड्रन गोवास्थित आयएनएस हंसा तळावर कार्यरत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.