Career Guidelines: दहावी, बारावीनंतर पुढे काय?

हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचा हॉटेल मॅनेजमेंटमधील पदविका कोर्स हा पर्यायही उत्तम ठरू शकतो.
What to do after 10th, 12th
What to do after 10th, 12th Dainik Gomantak
Published on
Updated on

पुणे : दहावी, बारावीनंतर पुढे काय, असा एकेकाळी हमखास विचारला जाणारा प्रश्‍न आता क्वचितच ऐकायला मिळतो. कारण, उच्च शिक्षणासाठी जाण्यापूर्वी कौशल्य शिक्षणाच्या खूप संधी पुण्यासह विविध जिल्ह्यांत उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराकडे वळावे, यासाठी बँकांनी पुढाकार घेत प्रशिक्षण केंद्रे सुरू केली आहेत. निसर्गोपचार, शेतमालावर प्रक्रिया उत्पादने तयार करता येतील, अशी प्रशिक्षणे सहज उपलब्ध आहेत. गरज आहे ती करिअरच्या नव्या वाटा निवडण्याची

पुणे हे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एक केंद्र बनले आहे. त्याबरोबरच वेगवेगळ्या संस्थांचा विनामूल्य अभ्यासक्रम आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी या संस्थेत ‘ट्रीटमेंट, अ‍ॅटेंडंट ट्रेनिंग’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम विनामूल्य चालविला जातो. माणसाची शरीर रचना, फिजिओथेरपी, मड थेरपी, योग थेरपी हे त्यात शिकविले जाते. दरवर्षी दहावी, बारावी उत्तीर्ण ऐंशी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच विद्यावेतनही दिले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर निसर्गोपचारचा रोजगार मिळू शकतो. सिंडिकेट, कॅनरा, महाराष्ट्र बँक, बडोदा बँक या बँक स्वयंरोजगार केंद्र चालवितात. त्यात शेतीपूरक, वाहन, उपकरण, टेलरिंग, ब्युटीपार्लर, कॉम्प्युटर टॅली, कागदी पिशव्या तयार करण्यासारखे लगेच रोजगार मिळवून देणार्‍या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. दहावी, बारावी उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण व्यक्तीला यात प्रवेश मिळतो. पुणे महापालिकेमार्फतही अशाच प्रकारचे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम विनामूल्य चालविले जातात. फॅशन डिझायनिंगचे अभ्यासक्रमही खासगी शिक्षण संस्थांमार्फत चालविले जातात. त्यातून स्वयंरोजगाराची चांगली संधी निर्माण झालेली आहे.

बारावीनंतरचे उपक्रम : सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी

स्कूटरपासून फ्रिजपर्यंत कोणतीही वस्तू आकर्षक व चकचकीत करण्यासाठी सरफेस कोटिंग केले जाते. कोटिंगचा उपयोग वस्तूच्या पृष्ठभागाचे संरक्षण करणे, गंजप्रतिबंधक नवणे, उष्णताप्रतिंधक बनवणे इत्यादी विविध गोष्टींसाठी केला जातो. बारावी विज्ञान शाखेतून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील डेक्कन एज्युकेशन संस्थेमध्ये तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. यापैकी दोन वर्षे थिअरी, तर एक वर्ष प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये कामाचा अनुभव शिकवला जातो. अभ्यासक्रमानंतर रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

रबर टेक्नॉलॉजी

टायरपासून पादत्राणांपर्यंत असंख्य ठिकाणी रबर वापरले जातो. डिप्लोमा इन रबर टेक्नॉलॉजी हा पदविका अभ्यासक्रम शासकीय तंत्रनिकेतन, खेरवाडी, वांद्रे येथे सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात रबर उद्योगात वापरली जाणारी विविध उपकरणे, उत्पादन सामग्री, कच्च्या मालाची निवड, अभियांत्रिकी इत्यादी विषयांचा समावेश होतो. हा पदविका अभ्यासक्रम अडीच वर्षांचा असून, सहा महिने इंडस्ट्रीमध्ये कामाचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या पदविका प्रवेशासाठी पात्र ठरतात. पदविका साठ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक किंवा पॉलिमर पदवी इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षाला प्रवेश मिळू शकतो.

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट

हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना तीन वर्षांचा हॉटेल मॅनेजमेंटमधील पदविका कोर्स हा पर्यायही उत्तम ठरू शकतो.

कोणत्याही शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या तीन वर्षांच्या पदविका कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो. या कोर्सनंतर रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात.

पॉलिमर, इंडस्ट्रियल केमिस्ट्री ठरतेय उद्योजकांसाठी उपयुक्त

जळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने कृषीवर आधारित, तसेच प्लॅस्टिक उद्योग विकसित झाले आहेत. पीव्हीसी पाइप, ठिबक, सूक्ष्म सिंचन आदी उद्योगांसाठी लागणार्‍या कौशल्याची गरज काही अभ्यासक्रमांच्या माध्यमातून भागवली जाते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ऑरगॅनिक केमिस्ट्रीसह, पॉलिमर, फिजिकल, इंडस्ट्रियल केमिस्ट्रीतील पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रत्येक कोर्सच्या माध्यमातून 20 विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडतात. विशेष म्हणजे यातील बहुतांश विद्यार्थी एकतर कंपनीत नोकरीला लागतात, तर काहींनी स्वत:चे उद्योगही विकसित केल्याची उदाहरणे आहेत. याशिवाय योग निसर्गोपचार या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. यात प्रमाणपत्र, पदवी असे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने दरवर्षी किमान शंभर विद्यार्थी याचे शिक्षण घेत आहेत. नाट्यशास्त्र व संगीत विषयातील पदवी घेण्याकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसतो, तर मुलींमध्ये फॅशन व इंटरेरिअर डिझायनिंगची क्रेझ आहे. हे शिक्षण पूर्ण करून विद्यार्थिनी स्वत:चे लहान व्यवसाय टाकत असल्याचे दिसून येत आहे.

अकाउंटिंग, फायनान्स, शेअर मार्केट प्रमाणपत्र

बदलत्या काळानुसार करिअरचे नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेसाठी अकाउंटिंग अँड फायनान्स, बँकिंग आणि इन्शुरन्सशी निगडित बीबीआय, तसेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजतर्फे सुरू असलेल्या शेअर मार्केट प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे. कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी सायकॉलॉजी, सोशिओलॉजीमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्याशिवाय कॉपिरायटिंग, भाषांतराचे प्रदेश खुले आहे. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी केवळ डॉक्टर, इंजिनिअर बनण्याचे स्वप्न न पाहता बॅचलर इन फिजिओथेरपी, बॅचलर इन ऑडिओलॉजी, डेंटल टेक्निशियन, वेटरनरी सायन्सचादेखील विचार करायला हवा. याशिवाय एथिकल हॅकिंग, स्पा मॅनेजमेंट, फ्लेव्हर केमिस्ट, संग्रहालयांचे अभ्यासशास्त्र, बीएससी इन हॉस्पिटॅलिटी, फॅशन स्टायलिंग, ज्वेलरी डिझाइन तसेच मास मीडियाशी संंधित व्हिडिओ जॉकी, रेडिओ जॉकी, एडिटिंग या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com