
Vaibhav Suryavanshi Record: ब्रिस्बेन येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 19 वर्षांखालील संघांमध्ये दुसरा युवा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघातील 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांनाच चकित केले. आपल्या या ताबडतोब खेळीच्या जोरावर वैभवने युवा वनडे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. युवा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड आता वैभवच्या नावावर झाला. या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने माजी कर्णधार उन्मुक्त चंदलाही सोडले.
युवा वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशी आता पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. वैभवने 10 सामन्यांमध्ये 41 षटकार लगावले. यापूर्वी, हा रेकॉर्ड भारताला (India) 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधार उन्मुक्त चंदच्या नावावर होता. उन्मुक्तने 38 षटकार मारण्यासाठी 21 सामने खेळले होते, तर वैभवने त्याच्या निम्म्याहून कमी सामन्यांमध्येच हा रेकॉर्ड मोडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना वैभवने आक्रमक फलंदाजी केली आणि 68 चेंडूंमध्ये 70 धावांची दमदार खेळी खेळली. आपल्या या खेळीत त्याने 5 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकार लगावले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय 19 वर्षांखालील संघाने 49.4 षटकांत 300 धावांचा डोंगर उभारला. वैभव सूर्यवंशीच्या 70 धावांच्या खेळीव्यतिरिक्त, यष्टीरक्षक फलंदाज अभिज्ञान कुंडूने 64 चेंडूंमध्ये 71 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. याशिवाय, विहान मल्होत्रानेही चमकदार कामगिरी करत 74 चेंडूंमध्ये 70 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र, कर्णधार आयुष मात्रे पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्याला या सामन्यात खातेही उघडता आले नाही.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना विल बायरोमने 10 षटकांत 47 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले. कर्णधार यश देशमुखनेही 4 षटकांत 31 धावा देत 2 बळी मिळवले. वैभव सूर्यवंशीने केलेला हा विश्वविक्रम त्याच्या उज्ज्वल भविष्याची आणि भारतीय क्रिकेटच्या पुढील पिढीची क्षमता दाखवून देतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.