वर्षाऋतूत स्त्रीचे 'आरोग्य रक्षण'

सृष्टीवर नवसंजीवनी पसरविणारा ऋतू वर्षाऋतू. या ऋतूत सृष्टि हिरवाईने नटून रंगीबेरंगी फुलांच्या नक्षीने नेत्रसुख प्रदान करते. उत्साह, आनंद, चैतन्य मानवी मनाला प्रदान करणारा पावसाळा.
Ayurveda
AyurvedaDainik Gomantak
Published on
Updated on

सृष्टीवर नवसंजीवनी पसरविणारा ऋतू वर्षाऋतू. या ऋतूत सृष्टि हिरवाईने नटून रंगीबेरंगी फुलांच्या नक्षीने नेत्रसुख प्रदान करते. उत्साह, आनंद, चैतन्य मानवी मनाला प्रदान करणारा पावसाळा. उन्हाळ्यात घेतलेल्या शीतपेय व शीत उपचारांनी शरीरात वाढलेला वातदोष, पावसाळ्यात वातावरणातील गारव्यामुळे व ओलाव्यामुळे प्रकुपित होतो आणि वाताचे विविध आजार निर्माण करतो. विशेषत: महिलांमध्ये (Women) या प्रकुपित वातदोषामुळे गुडघेदुखी, मान-पाठ दुखणे, कंबरदुखी इथपासून अनियमित पाळी, पाळीच्या वेळी अंगावरून कमी जाणे, पाळीच्या वेळी तीव्र वेदना होणे, अंगावरून पांढरे जाणे, मलावरोध, मूळव्याध यासारख्या तक्रारी उद्‌भवतात.

महिलांमध्ये या आजारांचे प्रमाण जास्त असण्याची काही कारणे -

1) वेग विधारणः

आयुर्वेदात काही धारण करू नये असे वेग सांगितले आहेत. वेग म्हणजे शरीरातील नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकण्यासाठी निर्माण होणाऱ्या नैसर्गिक संवेदना. उदा. शिंक, मलवेग, लघवी, खोकला इ. यांपैकी महिला विशेषकरून कामाच्या व्यापामुळे मल, मूत्रादि वेगांकडे दुर्लक्ष करून हे वेग अडवून ठेवतात व त्यामुळे वात दोष प्रकुपित होऊन मलावरोधापासून अनेक रोग निर्माण होऊ शकतात.

2) अनियमित आहारः

सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना बऱ्याचदा अवेळी जेवण होते. विशेषतः रात्रीचं जेवण १०- ११ वाजेपर्यंत होतं, जे संध्याकाळी ७ पर्यंत व्हायला हवे.

3) आरोग्याकडे दुर्लक्षः

शरीर जेव्हा अनारोग्याच्या छोट्या छोट्या सिग्नल्स देते, त्यावेळी वैद्यांकडे न जाता टाळाटाळ करणे व शरीराची ओढाताण सुरू ठेवणं उदा. मलावरोध (कॉन्स्टिपेशन) वारंवार होत असेल आणि त्याकडे दुर्लक्ष केलं तर कालांतराने मूळव्याध होऊ शकतो.

Ayurveda
चेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय

हे सर्व आजार न होऊ देता जर आपल्याला पावसाळ्यात निरोगी रहायचे असेल तर महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन योग्य ते बदल करणे अत्यंत महत्त्वाचे. आणि त्यासाठी आयुर्वेदातील वर्षाऋतुचर्या उपयोगी आहे. वर्षा ऋतूनुसार सांगितलेले आहाराचे नियम पाहुया.

पावसाळ्यात काय खावे?

१) अन्न ताजे, गरम व पचायला हलके असावे.

२) आंबट, खारट व गोड पदार्थ सेवन करावे.

३) जेवणापूर्वी आल्याचा छोटा तुकडा हा चिमूटभर सैंधव मीठ लावून चावून घावा. म्हणजे रुची वाढते आणि भूक लागते.

४) जुना तांदूळ वापरावा किंवा भात भाजून साठवून ठेवावा. भात उघड्या पातेल्यात शिजवून वाळून बनवावा.

५) पेज साजूक तूप व मिरपूड घालून किंवा मेतकूट घालून घ्यावी.

६) कडधान्ये (मूग, मसूर, कुळीथ इ.) भाजून, शिजवून व त्यांची कढणे (सूप) तूप, हिंग, जिरे, लसूण, कढीपत्ता, हळद अशी फोडणी देऊन घ्यावी.

७) गव्हाचे फुलके, ज्वारी / बाजरीची भाकरी तूप लावून खावी.

८) घरी बनवलेले लोणचे योग्य प्रमाणात घ्यावे.

९) मांसाहार अत्यल्प असावा. छोटे मासे, चिकन सूप सेवन करणे योग्य.

१०) सुंठ, ओवा, हिंग, लसूण, जिरे, मिरे, लवंग या मसाल्यांचा योग्य वापर पदार्थ बनवताना करावा.

११) या ऋतूत मिळणाऱ्या रानभाज्या जसे - टाकळा (तायकिळा), कुर्डू, भारंगी यांचा आहारात समावेश करावा.

१२) फळे- डाळिंब, अननस, पपई.

१३) पाणी उकळून, गरम प्यावे.

कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

१) पचण्यास जड, कफ वाढवणारे पदार्थ जसे - दूध, पनीर, चीज, मशरूम; कंदमुळे - बीट, बटाटा इत्यादी.

२) वातूळ कडधान्ये - वाटाणा, काबुली, चणे, अळसांदे, चवळी, चणाडाळ. तसेच नवीन धान्य पचायला जड असल्यामुळे वापरू नये.

३) नाचणी, मका रूक्ष असल्याने खाऊ नये.

४) पालेभाज्या कमी प्रमाणात खाव्या.

५) कोशिंबीर, सॅलड यासारखे कच्चे पदार्थ टाळावे.

६) केळी, सीताफळ, पेरू यासारखी कफ वाढवणारी फळे तसेच आंबा.

७) फ्रिजमधील पदार्थ, शिळे पदार्थ.

८) मांसाहार, खुबे, अंडी, मटण इ. पचायला जड असल्याने टाळावे.

Ayurveda
आता चिंता होईल दूर; जाणून घ्या स्ट्रेस कमी करण्याचे उपाय

भूक असेल तरच जेवावे. भूक नसेल तर जेवू नये किंवा पचायला हलके पदार्थ खावे. ऋतुचर्या अगदी सोप्या पद्धतीने पाळायची असेल तर आपले सण पारंपरिक पद्धतीने साजरा करावे. आपल्या भारतीय संस्कृतीत ऋषिमुनींनी या काळात चातुर्मासाच्या निमित्ताने विविध सण व व्रत-वैकल्यांची रचना केली आहे. श्रावणी सोमवार, नागपंचमी, गणेशचतुर्थी, नारळी पौर्णिमा नवरात्रोत्सव इत्यादी. जेणेकरून वेळोवेळी उपवास केले जातात व पचनसंस्थेवर ताण येत नाही.

विशेष म्हणजे या सण व व्रतांमध्ये देवाला दाखवला जाणारा नैवेद्य हा पावसाळ्यात घेण्यास योग्य असा आहार आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर, नागपंचमीला नागदेवतेला लाह्यांचा नैवेद्य! लाह्या ह्या पचायल्या हलक्या व सद्य तर्पण करणाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे हळदीच्या पानांत बनवलेल्या पातोळ्या. नारळ, गूळ घातलेल्या पातोळ्या गोड, पौष्टिक व पचायला हलक्या असतात. हेच आपल्या परंपरा व संस्कृतीमधले आरोग्यासंबधी विज्ञान नाही का?

वर्षाऋतूत निसर्गतः वात दोष प्रकुपित होतो आणि या वात दोषाचे शमन करण्यासाठी पंचकर्मातील बस्ती हा सर्वोत्तम उपाय आहे. बस्ती म्हणजे औषधी काढे किंवा तेल गुदद्वारातून मोठ्या आतड्यात सोडले जाते. यामुळे आतड्यातील कोरडे मलाचे थर सुटतात. अनेक वातव्याधी (सांधेदुखी, कंबर दुखी), हाडांचे रोग, पचन संस्थेचे विकार, मासिकपाळी संबंधी तक्रारी, यात बस्ती चिकित्सेची उपाययोजना केली जाते.

वातदोषाचे मूळ स्थान असणाऱ्या पक्वाशयातच बस्तीद्वारे वाताचे नियंत्रण केले जाते. म्हणून ज्या महिला निरोगी आहेत, त्यांनीसुद्धा वर्षभर वाताचे व्याधी होऊ नये, यासाठी पावसाळ्यात वैद्यांच्या मार्गदर्शनाने बस्ती चिकित्सा करून घ्यावी. आयुर्वेदात वर्णिलेल्या या ऋतूचर्येचे पालन केले असता, हा वर्षाऋतू स्त्रियांसाठी नक्कीच आनंद व आरोग्यदायी होईल!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com