मी मुस्लिम का नाही ?

इस्लाममध्ये धर्मसुधारणेची परंपरा नाही. त्यामुळे इस्लाममध्ये Reformationची चळवळ झाली नाही. इस्लामला कुराणात सांगितलेला प्रत्येक शब्द संशयातीत आहे. त्याला विरोध करणे, आव्हान देणे इस्लामला संमत नाही.
goa
goaDainik Gomantak

दत्ता दामोदर नायक

इब्न वराक यांचे Why I am not a muslim? हे पुस्तक बर्ट्रान्ड रसेलचे ''Why I am not a Christian'' आणि कांचा इलाही शेफर्ड यांचे ''Why I am not a Hindu?'' ह्या पुस्तकांच्या परंपरेतील आहे.

''मी मुसलमान का नाही?'' ही इब्न वराकची कैफीयत कोणताही अभिनिवेश न बाळगता, कोणतेही आकस व पूर्वग्रह सोडून आणि सद््सद््विवेकबुद्धी शाबूत ठेवून वाचले पाहिजे.

इस्लाम हा ख्रिस्ती व बौद्ध धर्माप्रमाणे प्रेम व करुणेवर आधारलेला धर्म नाही तर क्रौर्य, सूड व हिंसा यांच्या पायावर उभा असलेला धर्म आहे असे वराक यांचे मत आहे. इस्लाममध्ये विवेक, शांती, स्वातंत्र्य ह्या मूल्यांना महत्त्व नाही. इस्लाम लोकशाही व निधर्मी समाजाच्या परिमाणात बसत नाही.

इस्लामचे तत्त्वज्ञान ही शब्दपंक्ती पूर्ण विसंगत आहे कारण इस्लामला कसलेच तत्त्वज्ञान मान्य नाही असे वराक म्हणतात. अर्ध रानटी (Half savage) अशा अरबी टोळ्यांच्या काळात जन्माला आलेला हा धर्म आहे. तत्त्वज्ञानाचे परिपक्व स्वरूप त्याला नाही.

पूर्णपणे देवशरणता असलेला हा धर्म विज्ञानविरोधी, कलाविरोधी आहे. इस्लामचा कवितेला, संगीताला विरोध आहे.

इस्लामचे सर्वव्यापी शरीयत कायदे मूलभूत मानवी अधिकारांवर अतिक्रमण करणारे आहेत. इस्लाम हा समतेवर अधिष्ठित धर्म आहे असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. मुस्लिम स्त्रियांना हा धर्म शूद्र मानतो. बिगर मुसलमानांना अपवित्र मानतो व त्यांचे निर्दालन केले पाहिजे असा त्यांचा दावा आहे.

कसलीच साधनशुचिता इस्लाम मानत नाही. कोणत्याही प्रकारे शत्रूंना नामोहरम करणे हाच त्याचा उद्देश आहे.इस्लाम ज्ञानविरोधी आहे. मुस्लिम आक्रमकांनी जगातील उत्तमोत्तम ग्रंथालये जाळली आहेत. ''ह्या ग्रंथालयांत कुराणने सांगितलेलीच तत्त्वे असतील तर ह्या पुस्तकांची गरज नाही व नसतील तर ह्या पुस्तकांना अस्तित्वात राहण्याचा हक्क नाही'' असा इस्लामचा दावा आहे.

धर्मसत्ता व राजसत्ता यामधले द्वैत इस्लाम मानत नाही. धर्मसत्तेचे व राजसत्तेचे केंद्रीकरण इस्लामला हवे आहे.

इस्लामने गुलामी, घटस्फोट, बहुपत्नीकत्व अशा अनेक गोष्टी त्यावेळच्या अरबस्तानातल्या प्रचलित ''पागन'' चालिरितीवरून घेतल्या आहेत. इस्लामच्या मक्का व मदिना अशा दोन मानसिकता आहेत. मक्केत महंमद पैगंबर विजेता होता. त्यामुळे मक्केत त्याने केलेला उपदेश उदारमतवादाकडे झुकणारा होता. पण मदिनेत महंमद पैगंबर पराभूत होता. त्यामुळे मदिनेत त्याने सांगितलेला उपदेश आक्रमक, हिंसक, क्रूर होता. मदिनेत पैगंबराने सांगितलेला 'जिहाद' हे आज मुस्लिम दहशतवादाचे मूळ आहे. इस्लाममध्ये धार्मिक एकाधिकारशाही आहे. कोणत्याच धार्मिक आज्ञेविषयी चर्चा करणे इस्लामला मान्य नाही.

ख्रिश्चन व बौद्ध धर्म हे वैयक्तिक धर्म आहेत तर इस्लाम हा सार्वजनिक धर्म आहे असे इब्न वराक यांना वाटते. (हिंदू धर्माविषयी त्याने विधान केले नाही. पण एकेकाळचा हा वैयक्तिक धर्म आता सार्वजनिक होऊ लागला आहे ही भयावह गोष्ट आहे.)

वैयक्तिक धर्म म्हणजे व्यक्तिगत पातळीवर ईश्वराची उपासना करण्याचा व वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्ये पाळण्याचा आग्रह धरणारा धर्म तर सार्वजनिक धर्म म्हणजे व्यक्तीव्यक्तीचे किंबहुना संपूर्ण समाजाचे सार्वजनिक जीवन नियमित करू पाहणारा धर्म.

इस्लाम कामेच्छा ही नैसर्गिक मानतो. त्यामुळे इस्लामने कामोपभोगावर निर्बंध घातले नाहीत. ब्रह्मचर्य ही अनैसर्गिक बाब आहे हे ख्रिश्चन, जैन, बौद्ध व हिंदू धर्माने ओळखले नाही. पण इस्लामला त्याची पुरेशी जाणीव आहे.

इस्लाम अन्य धर्माप्रमाणे विशेषतः ख्रिश्चन धर्माप्रमाणे संपत्तीची अवहेलना करत नाही. "सुईच्या नेठ्यातून उंटांचा तांडा जाऊ शकेल पण स्वर्गाच्या दारातून श्रीमंत माणसाला प्रवेश नाही" यासारखी विधाने इस्लामला मान्य नाहीत.

इस्लाम आपल्या संपत्तीचा काही वाटा गरीबाना द्यावा याचा आग्रह करतो.

उपास करणे, लंघन करणे, खाण्यापिण्यावर बंधने आणणे (दारू, तंबाखू, पोर्क वर्ज्य) इस्लामच्या शिकवणुकीचा भाग आहे.

वराक यांनी महंमद पैगंबराच्या गुणदोषांचे वर्णन केले आहे. पैगंबराचे व्यक्तिमत्त्व आकर्षक व कोणावरही प्रभाव टाकण्यासारखे होते. त्याचा चेहरा हसतमुख होता. महंमद मोठा धोरणी, मुत्सद्दी होता. त्याला युद्धाचे तंत्र अवगत होते. व्यापारात महंमद चोख होता.

महंमदाने तत्कालीन समाजात अनेक समाजसुधारणा केल्या. मुलीना त्यांच्या जन्मानंतर जिवंत पुरण्याची क्रूर रीत त्याने बंद केली. मद्यपान, व्याज घेणे याला मनाई केली.

पण महंमद पैगंबर हा सर्जनशील विचारवंत (Original thinker) होता असे मानता येणार नाही. इतरांनी सांगितलेला (विशेषतः ज्यू, ख्रिश्चन व बौद्ध धर्मातला) उपदेशच त्याने सांगितला.

इस्लाम हा भक्तीवर आधारलेला नव्हे (सुफी पंथाचा अपवाद) तर भीतीवर आधारलेला धर्म आहे असे वराक म्हणतो.

कुराणात व्याकरणाच्या चुका आहेत. विसंगत विधाने आहेत. ऐतिहासिक व वैयक्तिक थोतांडे आहेत असे पूर्ण अभ्यासानंतर वराकचे मत झाले आहे.

जनावरे जिवंत असताना त्यांचे हाल हाल करून, त्यांना वेदना करून मारण्याची हलाल पद्धत लेखकाला अमानुष वाटते. प्राणीमित्र संघटना हलालला का विरोध करत नाहीत याबद्दल त्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

ख्रिश्चन व हिंदू धर्मातील दोष दाखवण्यासाठी ह्या धर्मातल्या विचारवंतांनी इस्लामचे उदात्तीकरण केले असा लेखकाचा दावा आहे.

इस्लाममध्ये धर्मसुधारणेची परंपरा नाही. त्यामुळे इस्लाममध्ये Reformationची चळवळ झाली नाही. इस्लामला कुराणात सांगितलेला प्रत्येक शब्द संशयातीत आहे. त्याला विरोध करणे, आव्हान देणे इस्लामला संमत नाही.

इस्लाम हा टोळ्यांच्या मानसिकतेतून जन्मलेला धर्म आहे.

लोकशाहीवर आधारित निधर्मी, विज्ञाननिष्ठ समाज इस्लामला मान्य नाही. मी मुस्लिम का नाही या पुस्तकांत इस्लामच्या चांगल्या गोष्टींचाही उहापोह केलेला आहे. पण स्वातंत्र्य, मानवी अधिकार, लोकशाही, निधर्मी समाज, विज्ञाननिष्ठा यांना इस्लामचा असलेला विरोध व क्रौर्य, सूड, हिंसा, एकाधिकारशाही, स्त्रियांना अमानुष वागणूक या इस्लामच्या मूलभूत स्वभावामुळे इब्न वराक हा आपण मुस्लिम नाही असे ''उर्ध्वबाहूर्विरोम्येष'' सांगत आहे.

इस्लामबद्दल अभ्यास करण्याची कळकळ असलेल्या प्रत्येक जिज्ञासूने वराक यांचे ''मी मुसलमान का नाही?'' हे पुस्तक वाचले पाहिजे.

प्रस्तुत लेखकाचा इस्लामबद्दल गाढा अभ्यास नसल्याने वराक यांनी केलेल्या विधानाला पाठिंबा देणे किंवा विरोध करणे हे प्रस्तुत लेखकाच्या बौद्धीक मर्यादापलीकडचे आहे याची वाचकांनी जाणीव ठेवावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com