
प्रसन्न शिवराम बर्वे
वैराग्य म्हटले की आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे, वैराग्याबद्दल अनास्था व तिटकाराही आहे. वैराग्य म्हणजे सगळे काही सोडून देणे नव्हे किंवा जे आहे त्याला कंटाळणेही नव्हे.
ब्रह्मचर्यापासून आपण जे ऊर्जेचे व्यवस्थापन शिकतो, त्याचप्रमाणे संसार, आप्त आणि आपण स्वत: यांच्याविषयी आपल्या प्रतिक्रियांचे व्यवस्थापन म्हणजे वैराग्य.
ज्या गोष्टी आपल्याबाबत किंवा आपल्या आप्तस्वकीयांबाबत घडू नयेत, असे आपल्याला वाटते, त्या गोष्टींना व गोष्टींशी संबंधित अन्य गोष्टींना आपण नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. उदाहरण द्यायचे झाल्यास मृत्यू; मृत्यूशी संबंधित कुठलीही गोष्ट आपण टाळायचा प्रयत्न करतो, अगदी दक्षिण दिशाही आपल्याला नकोशी होते.
तसेच वैराग्य म्हणजे संन्यास घेणे किंवा सगळ्या गोष्टींचा त्याग करणे असे मनात पक्के ठसल्यामुळे आपण वैराग्यच टाळतो. आपण एवढे कष्ट करून कमावलेले सर्व सोडून द्यावे लागेल, हा विचारच मनाला अस्वस्थ करतो.
उभा केलेला संसार, बांधलेले घर आणि जोडलेली माणसे यांचा त्याग करणे म्हणजे वैराग्य आहे का? अजिबात नाही. वैराग्य हे या बाहेरील गोष्टींशी संबंधित नसून अंत:करणाशी संबंधित आहे.
एखाद्या गोष्टीचा आपण त्याग केला, पण मनात कायम त्याचाच विचार असेल तर त्याला वैराग्य नाही म्हणता येणार. व्यवहार, वस्तू आणि व्यक्ती यांविषयीची आसक्ती काढून घेणे म्हणजे वैराग्य. आसक्ती काढून घेणे म्हणजे त्यांच्यापासून दूर जाणे किंवा त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहणे नव्हे. आपण ज्या प्रतिक्रिया व्यक्त करतो किंवा त्यांचा स्वत:ला त्रास जो करून घेतो, तो कमी करणे व कालांतराने नाहीसा करणे म्हणजे वैराग्य.
वृत्तपत्रात काम करणारे; त्यातही वृत्तसंपादक व पान एक करणारे काही स्नेही आहेत त्यांच्या रोजच्या अनुभवास येणारी गोष्ट आसक्ती आणि अनासक्ती या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे. यातल्या कुणालाही रात्री दीड, दोन वाजता घरी गेल्यानंतरही लगेच झोप येत नाही. बातमी बरोबर लागली असेल ना? मथळ्यात काही चूक राहून गेली नसेल ना? पॉइंटर, चौकट व्यवस्थित झाली असेल ना? सगळे महत्त्वाचे मुद्दे बातमीत आले असतील ना, असे असंख्य प्रश्न डोक्यात अक्षरश: थैमान घालतात.
त्याहीपुढे, ‘उद्या संपादकांकडून काय ऐकून घ्यावे लागेल कोण जाणे!’, हा एक विचार सतावत असतो. यात गमतीचा भाग म्हणजे एकदा पेपर छपाईला गेला की, त्यात बदल करणे शक्य नसते. मग, त्याचा त्रास स्वत:ला किती करवून घ्यायचा, याचा विचार करून जी काही चूक झाली असेल, त्याचा परिणाम स्वीकारण्याची तयारी ठेवणे म्हणजे अनासक्त होणे.
पान पाठवेपर्यंत त्यात कोणतीही चूक राहू नये, यासाठी करत असलेल्या कामाविषयी व ते काम उत्कृष्ट होण्याविषयी आग्रही आणि आसक्त असलेच पाहिजे. पण, त्याचबरोबर कुठे थांबायचे हेही ठरवले पाहिजे व त्या अनासक्त होण्याचा अभ्यास म्हणजे वैराग्य.
थांबायचे म्हटले की, आपण ती गोष्टच नको अशा नकारात्मक दृष्टीने त्याकडे पाहू लागतो. आमच्या घरात संकष्टी हे व्रत खूप आधीपासून सुरू आहे. संकष्टीच्या दिवशी ‘भजी, मिर्ची असे काही खायचे नाही’, असे ठरवूनच बाहेर पडत असे.
कामाला जाताना वाटेवरच भजी, मिर्ची तळत उभे असायचे व त्यांचा वास नेमका नाकात शिरायचा. प्रचंड त्रास होत असे. एरव्ही दररोज त्याच वाटेने जात असूनही असा त्रास होत नसे. जेव्हा त्याविषयीची नकारात्मक भावना काढून टाकली तेव्हापासून संकष्टीच्या दिवशीही वास आला तरी आणि नाही आला तरी, काही फरक पडेनासा झाला. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला ‘नको’, ‘करायची नाही’ असे म्हणतो तेव्हा त्या गोष्टीचा विचार आपल्या मनात जास्त घर करतो. नकारात्मक दृष्टिकोन आसक्ती वाढवतो.
आसक्ती आणि विरक्ती आपण दृश्य गोष्टींवरून ठरवतो. संसारात आहे आणि तरीही विरक्त आहे, हे आपल्याला पटतच नाही. केवळ असून भागत नाही, ते दिसावेही लागते. म्हणूनच माणूस अनासक्त म्हटला की त्याने घर-दार, संसार, बायका-मुले, खाणे-पिणे सोडले पाहिजे हे ठोकताळे आपल्या डोक्यात पक्के बसले आहेत.
संसारात राहून तात्पुरती विरक्ती आपल्याला चालते, समजते. बायकोशी कडाक्याचे भांडण झाल्यानंतर हा संसार नकोसा वाटू लागतो. सोडून द्यावे हे सगळे असे वाटू लागते. आपण घराबाहेर निघायला लागतो, तेवढ्यात स्वयंपाकघरातून बायकोचा कधी नव्हे तो लडिवाळ आवाज कानावर पडतो, ‘अहो, ऐकलंत का? आज ना मी तुमच्या आवडीची भरली वांगी केली आहेत.’ आमचे वैराग्य तिथल्या तिथे नाहीसे होते.
मुले आपले ऐकेनाशी होतात. ज्यांच्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या, रक्ताचे पाणी केले, ती मुले पाणीही विचारेनाशी होतात. ज्यांच्यासाठी आपण आपली सुखे बाजूला सारली, त्यांना आपली सुखदु:खेही आम्हांला सांगावीशी वाटत नाही. उलट आपण त्यात सहभागी होऊ नये, असेच त्यांना वाटते. ज्यांचासाठी वेळकाळ काही पाहिले नाही, त्या मुलांकडे आपल्यासाठी अजिबात वेळ नसतो. जिवंत असतानाही नाही आणि मेल्यावरही नाही.
मरणानंतर बाराव्या-तेराव्यापर्यंत थांबणेही आता कालबाह्य होऊ लागले आहे. जो देह आपण इतका मिरवला तोही साथ देईनासा होतो. कान, डोळे, हात, पाय जराजीर्ण होतात. आजारपण परावलंबी बनवते. स्वत:चा देहही नकोसा वाटू लागतो.
मरण आले तर बरे असे वाटू लागते आणि ते येतही नाही. या अवस्थेतून कंटाळून बाहेर पडावेसे वाटणे म्हणजे वैराग्य नव्हे. सगळ्यांनाच एक दिवस जायचे आहे याची प्रकर्षाने जाणीव स्मशानात कुणाला तरी पोहोचवायला जाताना होते, पण ती स्मशानापर्यंतच टिकते.
वैराग्याचा संबंध कंटाळा करणे, ‘नकोसे वाटणे’, सोडून देणे यांच्याशी नसून विवेकाशी आहे. पूर्ण विचारांती, विवेकाने अंत:करणात स्थिर झालेली विरक्त वृत्ती म्हणजे वैराग्य.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.