मुलांना नेमके काय द्यावे?

जर आम्ही वेळ दिला नाही तर मूल वेळ घालवण्याचे आपले मार्ग शोधून काढेल. एकदा मुलाने स्वतःचे मार्ग शोधून काढले आणि त्याची त्याला सवय झाली की मग त्याच्याशी पुन्हा पालकांनी जोडले जाणे कठीण होऊन बसते.
goa
goaDainik Gomantak

डाॅ. रूपेश पाटकर

'मुलांना नेमके काय द्यावे?'' असा प्रश्न अनेकदा पालकसभांतील माझ्या मांडणीनंतर मला विचारला जातो. आणि त्यावर माझे उत्तर असते, ''मुलांना कौशल्ये द्यावीत, सुविचार नव्हे!'' पण बहुधा याच्या उलट होताना दिसते.

पालक मुलाला अमूक कर, तमूक करू नकोस असे सुविचार वजा हुकूम देत असतात. याचा अर्थ मुलांना चांगले काय नि वाईट काय हे सांगूच नये असा नाही. पण एखादी गोष्ट किंवा कृती किंवा वागणूक चांगली की वाईट हे ठरवण्याचा निकष काय, हे मुलाला समजणे आवश्यक आहे.

सुविचारांचा प्रभाव कसा पडत नाही याचा एक किस्सा सांगतो. ''नेहमी खरे बोलावे'' या सुविचारावर एका कार्यशाळेत आम्ही गटचर्चा घेत होतो. चर्चा चालू असताना एका गटातून अचानक हशा पिकला. जेव्हा आमच्या सहकाऱ्याने त्याबाबत चौकशी केली तेव्हा समजले की त्या गटातील एक मुलगा म्हणत होता की ''नेहमी खरे बोला हे ठिक आहे.

पण खरे बोलल्यावर शिक्षा मिळणार असेल तर खरे कसे बोलणार? मुलांनी खरे बोलावे असे वाटत असेल तर पालक/ शिक्षकांनी मुलांना ओरडता कामा नये, शिक्षा करता नये.'' याचाच अर्थ खरे बोलल्यावर होणाऱ्या परिणामांना सहन कसे करायचे याचे कौशल्य जोपर्यंत आपण शिकवत नाही, तोपर्यंत माणसाने नेहमी खरे बोलावे हा सुविचार वर्तनाचा भाग बनणार नाही. त्यामुळे मुलांवर संस्कार करणं ही फार विचार करून करायची गोष्ट आहे. ती भिंतीवर सुविचार लिहीण्यासारखी सोपीसुलभ गोष्ट नाही.

''मुलांना कौशल्ये द्या'' या माझ्या उत्तरावर येणारा हमखास प्रश्न म्हणजे ''याची सुरुवात कशी करायची?'' आणि याला माझे उत्तर असते, ''मुलांना वेळ देऊन!'' मुलांना आपण पौष्टिक खाऊ देतो, उत्तम शालेय शिक्षण मिळावं यासाठी चांगली शाळा शोधतो, मुलांच्या अभ्यासाची चांगली उजळणी व्हावी म्हणून आम्ही चांगली शिकवणी (ट्यूशन) लावतो. त्यासाठी पैशाची जुळवणी करायला आवश्यक तर पोटाला चिमटा देतो.

पण आम्ही मुलांना वेळ देतो का? मुलांशी गप्पागोष्टी करतो का? मुलांशी खेळतो का? मुलांना आपल्या सभोवतालाबद्दल खूप प्रश्न असतात, त्या प्रश्नांना आपण उत्तरे देतो का? त्यांचे भावविश्व समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? त्यांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी त्याला आपले अनुभव सांगतो का? त्यांच्याकडे आपल्या चुका प्रांजळपणे कबूल करतो का?

अनेक पालक मला सांगतात की यासाठी आपल्याला वेळच मिळत नाही. खरं म्हणजे पूर्वीच्या पिढ्यांकडे ज्या सुखसोई नव्हत्या, त्या आमच्याकडे आहेत. आम्हाला ना विहीरीचे पाणी आणण्यात वेळ घालवावा लागत, ना पाट्यावर वाटण्यात वेळ घालवावा लागत. ना आम्हाला तासनतास बसची वाट बघावी लागत, ना पत्रांसाठी पोस्टमनची वाट बघावी लागत.

तरीही आम्ही मागच्या पिढीइतका मुलांसाठी वेळ देण्यास कमी पडत आहोत. मग आधुनिक सुखसोईनी उपलब्ध झालेल्या वेळेचे आम्ही नेमके करतो काय? मला वाटते, हा प्रश्न प्राधान्यक्रम ठरवण्याचा आहे. मुलाचे शारीरिक आणि शैक्षणिक आरोग्य उत्तम राखण्याइतकेच मुलाला वेळ देणे महत्त्वाचे आहे.

जर आम्ही वेळ दिला नाही तर मुल वेळ घालवण्याचे आपले मार्ग शोधून काढेल. एकदा मुलाने स्वतःचे मार्ग शोधून काढले आणि त्याची त्याला सवय झाली की मग त्याच्याशी पुन्हा पालकांनी जोडले जाणे कठीण होऊन बसते.

खरे म्हणजे मुल तुम्हाला बघून देखील अनेक गोष्टी शिकत असते. तुम्ही संवाद कसा करता, संवाद करताना तुमची परिपक्व अडल्ट इगो स्टेट बोलत असते की तुमची चाईल्ड इगो स्टेट बोलत असते की तुमच्यातील खाष्ट इगो स्टेट बोलत असते हे मुल निरखत असते. ट्रांझॅक्शनल एनॅलिसीसचा सिद्धांत मांडणारे डाॅ. एरीक बर्न म्हणतात, या सगळ्या गोष्टी पाच वर्षांपर्यंत मुलात विकसित होतात. याचाच अर्थ पाच वर्षाआधीचे मुलाचे आयुष्य देखील संस्कारांसाठी महत्त्वाचे असते.

आपण मोठी माणसे मुलाच्या पुढ्यात एकमेकांशी कसे वागतो, आपल्यातील मतभेद आपण कसे सोडवतो हे आपल्या मुलासाठी रोल मॉडेल असते.

खरे म्हणजे प्रत्येक मुल स्वतःच्या क्षमता, मर्यादा, आवडीनिवडी घेऊन जन्मत असते. त्याच्यात असलेल्या क्षमता त्याला ओळखायला आणि विकसित करायला मदत करणे, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी महत्वाचे असते. मुळात आपल्या क्षमता आणि मर्यादा यांची योग्य जाणीव म्हणजे आत्मविश्वास हे आपण लक्षात घेतले पाहीजे.

तुमचे मुल कदाचित अभ्यासात हुशार नसेल, पण त्याच्यात चित्रकलेची क्षमता असू शकते, कदाचित संगिताची क्षमता असू शकते, संवाद साधण्याची क्षमता असू शकते. या क्षमता अनेकदा क्षमता म्हणून आपल्याला दिसत नाहीत. त्या कदाचित खट्याळपणाच्या रूपात व्यक्त होत असतील. त्या शोधायला मदत करणे आणि त्यांचे रूपांतर जीवनाच्या एखाद्या अंगासाठी उपयोगात कसे येईल, हे शोधायला मदत करण्यात पालक भूमिका बजावू शकतात.

काही मुल्यांविषयी ठामपणा देणे ही गोष्ट पालक स्वतःच्या कृतीतून आणि त्याविषयी स्पष्ट बोलून देऊ शकतात. दारू, तंबाखूजन्य पदार्थ या गोष्टी स्वतः कधीच सेवन न करून आणि या गोष्टींची चव कोणत्याही दबावाखाली न घेण्याचे मुल्य पालक रूजवू शकतात. ते मुल्य मुलाच्या वर्तनात कायम रहावे तर त्याला ॲसर्टीव्हनेस शिकवावा लागतो. ॲसर्टीव्हनेस म्हणजे बहुमत विरोधात गेले तरी आपल्या मतावर ठाम रहाण्याचे कौशल्य. हे कौशल्य न शिकवल्यास एका बाजूला माणूस आक्रस्ताळेपणा करणारा होऊ शकतो तर दुसऱ्या बाजूला बहुमतापुढे अविवेकी गोष्टी स्विकारणारा होऊ शकतो.

पण या सर्व गोष्टींचा निकष काय, हा मुद्दा उरतोच. वैज्ञानिक दृष्टिकोन हाच निकष. जेवढा पुरावा तेवढा विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती! म्हणजे दुसऱ्यांकडून शेंड्या लावून न घेण्याची प्रवृत्ती. आजच्या अप्रत्यक्ष जाहीरात करण्याच्या युगात वैज्ञानिक दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com