गोवा: अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. अन्न ही त्याची पहिली गरज. माणसाला पहिली चिंता असते ती पोटाची. पोटाची लांबी किती तर एकंदरीत देहाच्या तुलनेत वीतभर पण ते कधीच भरत नाही म्हणून तो सतत खपत असतो. माणसाला शहाणपण सुचतं ते भरल्या पोटीच.
रानावनात हिंडणारा आदिमानव कंदमुळे, कच्चे मांस यावरच जगत होता त्यासाठी कष्टही करत होता. जगण्यासाठी संघर्ष करता करता दोन दगडांच्या घर्षणातून आग निर्माण होते हा पहिला अद्भूत धडा तो शिकला.
आगीचा शोध लागल्यानंतर, अन्न शिजवून भाजून खाण्यासाठी त्याने चुलीचा पण शोध लावला. जमीन खोलगट करून तिथं जळाऊ लाकडांचा विस्तव केला. विस्तवावर अन्न शिजवलं, भाजलं की ते रुचकर, स्वादिष्ट लागतं याचाही शोध त्याला लागला. अन्न भाजण्याच्या आणि शिजवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची ठरली ती ‘चूल’. तीन साध्या दगडांची रचना करून निर्माण केलेली चूल, माणसाच्या अन्नसंस्कृतीची आधारशिला ठरली. मानवी सांस्कृतिक विकासातला हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
गावगिर्या वाठारांत, जिथे घर तिथे चूल असतेच. तीन दगडांची साधी चूल पिढ्यान्-पिढ्याच्या स्वादतुष्टतेची प्रतीक आहे. ‘साधी राहणी’चा धडा देणारी जीवनदायिनी आहे. चूल आणि मूल सांभाळणाऱ्या घरातल्या स्त्रीने तिला कुटुंबाचा आधार केला. कुटुंबाचे अन्न शिजवते म्हणून चुलीबद्दल कुटुंबाला ममत्व वाटते. गोरगरिबांबरोबरच धनवानानीही चुलीला देवत्व बहाल केले, तिला पवित्र मानले, मोठेपणा दिला. तिला गेरू, काव अशा रंग-मातीने सारवून आकर्षक बनवलं. सणासुदीच्या एखाद्या शुभप्रसंगी तिच्यासमोर रांगोळीही काढली.
दुःखद प्रसंगी चूल पेटत नाही. कुटुंबाचं सुतक तिलाही लागतं. घरातली ओली बाळंतीण आणि रजस्वला स्त्रिया तिला हात लावत नाहीत. काही घरातल्या चुलीवर फक्त सात्विक आहार शिजवला जातो. मांसाहार शिजवण्यासाठी मागच्या दारी वेगळी चूल थाटली जाते.
घरातली चुल म्हटलं की तिचा रुबाब सांभाळावाच लागतो. ती नेहमी पेटती ठेवावी लागते. तिच्यासाठी लागणाऱ्या सुक्या सरपणाची व्यवस्था करावी लागते. पावसाळ्यात ‘पुरुमेंत’ करावा लागतो. रांधताना तिच्यातून निघणारा धूर सहन करत, फुंकणीने ‘फू.. फू’ करत चुलीसमोर आर्जवं करीतही बसावं लागतं.
‘घरोघरी मातीच्या चुली’ अशी म्हण प्रचलित आहे. एका घरात जे चालतं तेच दुसऱ्या घरात चालल्याचे सूचित करणारी ही म्हण. ‘भटे भटे, आपले वाटे’ म्हणजे स्वतःची वेगळी चूल थाटणे, कुटुंबापासून वेगळे होणे. घरात चुल पेटली नाही तर, त्या त्या घराची अन्नान्नदशा दिसून येते.
माणसाने काळाच्या ओघात आपल्या कल्पनेवर आधारून चुलीचे वेगवेगळे आकार आणि प्रकारही विकसित करून तिला आधुनिक रूप दिले. विस्तव पेटवण्याची जागा मोठी झाली आणि ती भट्टी बनली. कमी कालावधीसाठी मोठी चुल, जास्त कालावधीसाठी छोटी चूल असाच प्रकार आहे.
स्टोव्ह, इलेक्ट्रिक शेगडी, गॅस शेगडी, सिलेंडर गॅस, ओव्हन, मायक्रोवेव्ह असे चुलीचे नवीन अवतार आपल्या कलेतून आणि गरजेतून निर्माण केले. अन्न शिजवण्यासाठी, भाजण्यासाठी लहान-मोठ्या आकाराची भांडी निर्माण केली.
प्रारंभीच्या काळात कुंभाराने आपल्या चाकावर बनवलेल्या मातीच्या मडक्यात त्याने अन्न शिजवलं तर फुटलेल्या मडकीचे ‘खपरैल’ तवा म्हणून अन्न भाजण्यासाठी वापरलं. विकासाच्या प्रक्रियेत तांबे, ॲल्युमिनियम, स्टीलच्या धातूपासून वेगवेगळ्या आकाराची भांडी बनवली. अन्न शिजवण्याची आणि भाजण्याची प्रक्रिया साधी-सोपी आणि आधुनिक करून टाकली. भांड्यात शिजणाऱ्या अन्नात त्यानं शर्करा, लवणादी पदार्थ घालून अन्नाची रुची वाढवली व जिभेचे चोचले छान पुरवले.
हल्ली तर गावांचीही झपाट्याने शहरे होऊ लागली आहेत. घराघरातल्या मातीच्या चुली हळूहळू विझत गेल्या आहेत. कुठेतरी गावगिर्या घरात एखादी चूल नजरेत भरते आणि कधीकाळी तिच्या शेजारी बसलेलो असताना, चुलीवरून नुकतीच उतरवलेली, आईच्या हातून ताटात पडणारी गरम गरम चपातीच आठवते.
नारायण महाले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.