Gomantak Editorial: शेती जीवन साधनांसाठी का पैशासाठी?

गाव स्वतःसाठी उत्पादन करीत होता तेव्हा गाव समृद्ध, श्रीमंत होता. ग्रामराज्याची एक रचना बनून गेली होती. स्वयंपूर्ण, स्वाधीन. जातिव्यवस्थेने बांधलेले लोकगट ग्रामव्यवस्थेत आपापली ठरलेली भूमिका बजावायचे.
Farming | Agriculture
Farming | AgricultureDainik Gomantak
Published on
Updated on

कमलाकर द. साधले

गाव स्वतःसाठी उत्पादन करीत होता तेव्हा गाव समृद्ध, श्रीमंत होता. ग्रामराज्याची एक रचना बनून गेली होती. स्वयंपूर्ण, स्वाधीन. जातिव्यवस्थेने बांधलेले लोकगट ग्रामव्यवस्थेत आपापली ठरलेली भूमिका बजावायचे. (त्यात उच्चनीचतेच्या आणि राजकीय हितसंबंधांच्या कठोर भिंती उभ्या राहिल्या आणि आणि कठोर बनत गेल्या हा भाग नंतरचा) दैनंदिन जीवनाला लागणारी सर्व सामग्री गावात असली पाहिजे आणि त्यातील जास्तीत जास्त गावात निर्माण झाली पाहिजे.

त्याचबरोबर गावात जे काय निर्माण होणे शक्य आहे त्यानुसार आपल्या गरजा, आपली जीवनशैली घडली पाहिजे, असे धोरण होते. त्यामुळे गावात जे काय आहे वा निर्माण केले जाते त्याचा कल्पकतेने वापर व तोही शाश्‍वत प्रकारे करण्याची तंत्रे व व्यवस्था बनली. फळे, अन्यधान्य, दूध, मुख्य पाळीव प्राणी यांचे मुख्य उत्पादन घेण्याबरोबरच त्याबरोबरच निर्माण होणारे पदार्थ ज्यांना आपण टाकाऊ घटक मानतो त्यांना उपउत्पादने (बायप्रॉडक्ट) मानून त्यांचा कल्पकतेने वापर व्हायचा.

Farming | Agriculture
Colvale Jail: कोलवाळ कारागृह ‘स्वयंपूर्णते’च्या दिशेने

या सर्वांसाठी गेल्या लेखात (कमीतकमी पासून जास्तीत जास्त) चर्चिलेले ‘मॅक्सिमायझेशन’चे तंत्र वापरले जायचे, आपल्या बहुविध गरजा भागविण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची पिके आणि त्यांची बहुविध प्रकारची उपपिके यातून जीवनशैलीमध्ये आपोआप विविधता विकसित व्हायची.

जीवनव्यवस्था बदलली. ग्रामव्यवस्थेनेही वेगळे वळण घेतले. (ते का व कसे घडले याची चर्चा इथे करीत नाही.) पिकवायचे ते विकण्यासाठी हे तत्त्व रूढ झाले. त्या त्या जमिनीत -हवामानात जे जास्त पैसे देईल ते पीक लावायचे. बाकीच्या आपल्या गरजेच्या वस्तू बाजारात मिळतच आहेत, असे धोरण बनले.

हे घडण्यास प्रामुख्याने सरकार व बाजारव्यवस्था कारणीभूत होती. याचे दुहेरी- तिहेरीच नव्हे तर बहुअंगी परिणाम आज दिसत आहेत. १) बहुजातीय पिकांऐवजी एकजातीय पिकांची शेती वाढली. २)जैवविविधता रोडावली ३) जास्त उत्पादनासाठी त्या जमिनीचा सराव नसलेली नवीन प्रकारची बियाणी आली.

४) जुनी वाणे नाहीशी होऊ लागली. भूतलावरून एखादी जीवजात किंवा वनस्पती पूर्णपणे नष्ट झाल्यास कोणतेही तंत्रज्ञान त्यांचे पुनर्निर्माण शकत नाही. भारतीय कृषिपरंपरेने पिढ्यानपिढ्यातून जपलेली विविध जाती-उपजातीने समृद्ध केलेली बीजसंपदा रोडावली. ५) या भूमीला परकी असलेली वाणे तगणासाठी, पीक वाढण्यासाठी रासायनिक खते-कीटकनाशकांचा मारा करावा लागला. त्यांतून अ) भूमी, जलस्रोत प्रदूषित झाले. आ) शेतीचा खर्च वाढला, वाढत राहिला. इ) बियाणी, खते, कीटकनाशके याविषयी परावलंबित्व आले. ६) स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी शेती व उरलेले पीक विकण्यासाठी हे पूर्वीचे तत्त्व बदलले. शेती उत्पादन विक्रीसाठीच असे धोरण बनले. त्यामुळे शेतकर्‍याचे बाजारावरील अवलंबित्व वाढले.

या महिन्यातीलच गोष्ट: महाराष्ट्रात यंदा कांद्याचे पीक वाढले तसा विक्रीदर जोराने आपटला. पन्नास पैसे किलो, एक रुपया किलो इथवर येऊन थडकला. पंजाबात ढब्बू मिरच्या १ रुपया किलोवर आल्या. शेतकरी हवालदिल. शेतीचा वाढलेला खर्च, मिळकतीविषयी वाढलेल्या अपेक्षा, आणि वाट्याला आलेले प्रचंड नैराश्य यातून उद्भवलेले शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र, अशामुळेच चालत आले आहे. तेही महाराष्ट्र व पंजाब या देशांतील सर्वांत प्रगत आधुनिक शेतीतंत्रांच्या बालेकिल्यांत!

या दुर्गतीचा उल्लेख येथे ओघाने आलेला आहे. आपल्याला चर्चा करायची आहे, ग्रामव्यवस्थेने शेती उत्पादने व उपउत्पादने यांचे विविध प्रकार व विविध वापर हे ’मॅक्झिमलिझमचे’ म्हणजे जास्तीत जास्त वापराची तंत्रे कशी सोडून दिली व त्यातून काय अनर्थपरंपरा निर्माण झाली यावर ज्यावेळी केवळ नगदी उत्पन्नावर शेती अवलंबून असते तेव्हा शेतीत निर्माण केलेल्या जैवभारापैकी केवळ १५ टक्के जैवभार विकाऊ असतो ८५ टक्के टाकाऊ ठरतो.

केळ्यांच्या शेतीमध्ये केवळ नीट पिकलेले विकण्यायोग्य केळे हाच विकाऊ (केळ्याची सालसुद्धा शेवटी टाकाऊच असते). बाजारात पैसे मिळतात ते विकाऊ भागासाठी. शेवटच्या किरकोळ विक्रेत्याकडे केळी विकण्यासाठी येतात. ती खरेदी व्यापारी, वाहतूक ते हाताळणी कामगार, गुदाम, तेथून विक्रीच्या गावातील व्यापारी, वाहतूक, तेथील हाताळणी कामगार, व्यवस्थापकीय खर्च, पिकविण्याचे कृत्रिम तंत्र, नासाडीची टक्केवारी, त्याचा खर्च आणि प्रत्येक टप्प्यावरील नफा हे सर्व एकत्र करून किरकोळवाल्याकडे केळी येतात.

तो अशाच प्रकारची मूल्ये जोडून ग्राहकासाठी किंमत ठरवितो. यातून उत्पादकाला जे मोल मिळते त्याच्या काही पटीत ग्राहक पैसे मोजतो. रसायने वापरून पिकविलेल्या प्रदूषित केळ्यासाठी उत्पादकाने निर्माण केलेल्या जैवभारातील केवळ १५ टक्के भागावर ८५ टक्के टाकाऊ कचरा! तांदूळ विकला जातो तेव्हा गवत, कणीसकाड्या, फोलपट व दाण्यावरील करड काढून पॉलिश केलेला दाणा हा १५-२० टक्के भागच विकाऊ बाकीचा टाकाऊ कचरा.

आता आपण उत्पादनातील जैवभाराच्या १०० टक्के वापरास पर्याय तपासू. केळीची पाने भोजनासाठी दक्षिणेकडील राज्यांत अत्यंत पवित्र मानली जातात. केळीच्या झाडावर सुकलेली पाने सकाळी दव पडल्याने मऊ होतात, दांड्यापासून काढताना फाटत नाहीत. माझी आई ती काढून सपाट करून त्याचे द्रोण करून विकायची.

गोव्यात देवाला घालण्याच्या फुलांच्या माळांसाठी सुताचा धागा विटाळलेला मानतात. गावांतील बायका केळीच्या गभ्याचे दोर वाळवून ते फुलांचे गजरे, माळा, हार यासाठी वापरतात. या धाग्यांच्या तंतूपासून वस्त्रही विणता येते. केळफुलाला केळी यायचे थांबले की राहिलेल्या केळफुलातून रोज १० से.मि. लांबीची एक एक पाकळी रोज खाली पडते. त्या सुकलेल्या पाकळ्यांपासून बायकांनी केसांसाठी शांपू बनविला आहे.

केळ्यांच्या घडाला केळी धरणे थांबले की केळफुलाची भाजी हे नेहमी ठरलेले. वादळात केळीचे झाड मोडले आणि केळी पिकण्याइतपत जून झाली नसली तर त्याची दोन- तीन प्रकारची भाजी, निखार्‍यावर सालीसह केळे भाजून भरीत, जून केळ्यांची कापे हे पदार्थ ठरलेले. केळीचा घड काढल्यानंतर खोड, पाने यांचे तुकडे केल्यास हे शंभर टक्के अवशेष गुरे फस्त करतात. २४ तासांत त्याचे शेणखतात व गोमूत्रात रूपांतर. पिकलेल्या केळ्यांच्या साली गुरांना प्रिय.

शिवाय कंपोस्टिंगची प्रक्रिया जलद करणार्‍या, झाडांसाठी संप्रेरके वगैरे, भातशेतीतील तण हे फार पोषक नसले तरी पशुखाद्य म्हणून वापरले जायचे. शिवाय आंबे पिकविण्यासाठी गादी, काचेसारख्या नाजूक वस्तूंसाठी पॅकिंग, भात हे धान्य साठविण्यापूर्वीची व्यवस्था व १५-२० टक्यांच्या व्यापारात शेतकर्‍यांना आत्महत्येच्या निर्णयापर्यंत नेणारी आजची व्यवस्था यांचा कुठे मेळ घालता येईल का, याचा शोध घेणे आवश्यक आहे. त्याची चर्चा पुढील लेखात.

पण आजच्या चर्चेतून एक प्रश्‍न अधोरेखित होत आहे. शेतीचा उद्देश काय असावा? जीवनाच्या गरजांची पूर्तता थेट शेती उत्पादनातून, की उत्पादन विकून मिळणार्‍या पैशांतून? शाश्‍वत काय? वर्षाची गरज अमुक किलो उत्पादन असेल, तर तिच्या पूर्ततेची शक्यता आगाऊ पडताळता येते. पण विकाऊ मालाचे भरघोस पीक आले तरी गरज भागण्याइतपत पैसे मिळतील की नाही याची शाश्‍वती नाही, हे गेल्या महिनाभरातील कांदा व ढब्बू मिरच्यांच्या पिकांवरून दिसते आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com