सुर्लातील ‘खळ’ जेवणाची परंपरा

Tradition of 'Kha'l Meal : सुर्ल गावात वायंगणी शेतीतल्या भाताची कापणी झाल्यावर पूर्वातल्या देवराईशी संलग्न जी मोकळी जागा आहे, तेथे वैशाखात खळ जेवणाचा विधी केला जातो.
Tradition of 'Kha'l Meal
Tradition of 'Kha'l MealDainik Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र पां. केरकर

Tradition of 'Kha'l Meal : सुर्ल गावात वायंगणी शेतीतल्या भाताची कापणी झाल्यावर पूर्वातल्या देवराईशी संलग्न जी मोकळी जागा आहे, तेथे वैशाखात खळ जेवणाचा विधी केला जातो.

डिचोली तालुक्यातला सुर्ल हा शेतीप्रधान गाव असून आज येथील शेती आणि बागायतीचे वैभव लोह खनिजाचे उत्खनन आणि वाहतुकीतील अराजकामुळे संकटग्रस्त झालेले आहे. सध्या इथल्या खाण व्यवसायावर निर्बंध आल्याकारणाने सुर्ल गावातल्या कष्टकऱ्यांनी शेती, बागायती व्यवसायांकडे लक्ष द्यायला सुरवात केलेली आहे.

यंदा वायंगणी शेती करून भाताची पैदासी झाल्याने सुर्ल गावातल्या शेतकन्यांनी पूर्वातल्या देवराईच्या शेजारी खळ्यावरच्या पारंपरिक जेवणाचा विधी पार पाडला. सुर्ल हा गोव्यातल्या प्राचीन इतिहास आणि लोकसंस्कृतीशी नाते असणारा गाव.

Tradition of 'Kha'l Meal
Top 5 Goa News | गोंयच्यो 5 मुखेल खबरो (20th May 2022)

शेकडो वर्षांशी संबंधित असणारे सिध्देश्वर हे इथले ग्रामदैवत आहे. एकेकाळी समृद्ध शेती आणि बागायती असल्याकारणाने सुर्लात नाना जाती जमातींचे वास्तव्य आहे. खनिज उत्खनन सुरू होण्यापूर्वी त्या हिरव्यागार डोंगरातून उगम पावणारे ओहोळ, नाले सुर्ल गावाला बारमाही पाणी उपलब्ध करून द्यायचे. या पाण्याचा नियोजनबद्ध वापर करण्यासाठी गावातल्या कष्टकरी समाजाने सामूहिकरित्या बांधाची उभारणी करून, जांभ्या दगडात खोदलेल्या कालवे आणि पाटांतून हे पाणी शेतकऱ्यांनी सिंचनासाठी वापरले होते. अशा बांध, पाट, कालव्यांच्या संरचनेमुळे सुर्लातल्या शेता-भाटात पाणी खेळते रहायचे.

सुर्ल गाव सुजलाम सुफलामतेचे वरदान मिरवत असल्याकारणाने इथे विविध प्रांतांतून आलेल्या विविध जाती जमाती, धर्माच्या लोकांनी वास्तव्य केल्याचे दिसून येते. शेकडो मैलांचा प्रवास करून आलेल्या चित्पावन, कऱ्हाडे ब्राह्मणांनी जशी ही भूमी आपलीशी मानली, त्याचप्रमाणे काणकोण महालातून स्थलांतरित झालेल्या आदिवासी जमातीला तिने संघर्षातून जगण्याचा मंत्र दिला. सिध्देश्वर, नवदुर्गा, नारायण आदी दैवते असणाऱ्या या गावात काणकोणातल्या मालिकार्जुनाची प्रतिष्ठापना जुन्या काळी झालेली आहे.

परंतु या गावात कधीकाळी बेताळाचे प्रस्थ होते. भुताखेतांचा अधिपती असणाऱ्या बेताळाच्या आसुरी शक्ती सिध्देश्वर देवाला भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यात रक्त निर्माण करायच्या. बेताळाला आणि त्याच्या आसुरी शक्तीच्या आतंकातून गावाची मुक्तता करण्याची हमी मल्लिकार्जुन देवाने आणि त्याच्या भाविकांनी आपल्या मस्तकी घेतली. बेताळाला रसबाळ्या केळ्यांची विशेष आवड होती. मल्लिकार्जुनाच्या भाविकांनी पिकवलेल्या केळ्यांचा घड विहिरीत ठेवला आणि बेताळाला तो हात आणि पायांचा स्पर्श न करता खाण्याचे आव्हान दिले.

केळी खाण्यास बेताळ विहिरीत उतरल्यावर विहिरीच्या तोंडावर महाकाय दगड ठेवून त्याला आत बंदिस्त करून ठेवले. वर्षातल्या महत्त्वाच्या सण - उत्सवप्रसंगी स्मरण करून बेताळाला मान सन्मान देण्याची परंपरा सुर्लावासीयांत रूढ झाली. दसरोत्सवावेळी तरंगा मिरवणूक काही क्षणासाठी बेताळाला मान देण्यासाठी पूर्वातल्या देवराईकडे थांबते.

सुर्लातल्या बाराजणांच्या स्थळात असणारी पूर्वातली ही देवराई वृक्षवेली आणि पशुपक्षी यांच्याबरोबर कृमीकीटकांच्या जैविक संपत्तीची श्रीमंती मिरवत असून पूर्वी भर दिवसा वृक्षाच्छादनामुळे इथे असणाऱ्या अंधारात कोणी सहसा पाऊल ठेवण्याचे धाडस करत नसे. सुर्लात कोंतीतल्या आजोबाची राय, नारायण भाटातली राय, मल्लिकार्जुनाची राय, म्हाल दाडेश्वराची राय आणि पूर्वातली राय अशा पाच देवराया आहेत.

Tradition of 'Kha'l Meal
खराब रस्त्यांमागे भ्रष्टाचार हेच कारण : आप

पूर्वातल्या देवराईत बेताळाविषयीचे भय आजही लोकमानसात कायम असल्याने, इथे गेळ, शिवण, गुळवेल, करवंद, जंगली सूरण, भेरली माड, त्रिफळ, काजरो, खष्ट, वावडिंग, कुमयो, अंबाडा, मधुनाशिनी, नागलकुडो, माडत, मोय दूधशिरी, भुई कोहळा, करांदो, पाट फणस, फणस, आंबा, कांगलां, ओटंब, अंजन, हुरो, धामण, करमल, पणशी, वावळो, मिरयो, घोटिंग अशी वनस्पती पाहायला मिळते.

रानहळद, जंगली सुरण, गिलोय दिणो, पिटकोळी, अडुळसा, वाघचपको, उस्कू, गुंजी, केवण अशा औषधी गुणधर्माने युक्त वनौषधीचा खजिना या देवराईची शान आहे. लोह खनिजाच्या उत्खननामुळे सुर्ल गावातल्या देवराया वगळता अन्यत्र असले वनक्षेत्र हा हा म्हणता गायब झालेले आहे. बेताळ आणि त्याच्या आसुरी शक्तीचा प्रकोप होऊ नये म्हणून लोकमानसाने देवराईतल्या जैविक संपदेच्या घटकांचे संरक्षण केले आहे. देवराईत आंबा, फणस, अंबाडा यासारखे फलदार वृक्ष असले तरी त्यांच्या फळांचा आस्वाद घेण्यासाठी भाविकांनी बेताळाची प्रार्थना करून परवानगी घेणे बंधनकारक आहे.

मांडवी नदीच्या उजव्या काठावर वसलेल्या सुर्ल गावाचे देश विदेशातून येणाऱ्या जाणाऱ्या यात्रेकरू, व्यापाऱ्यांशी संबंध जलमागनि जोडलेले होते. प्रवासावेळी वादळवाऱ्यामुळे आपत्ती निर्माण होऊ नये म्हणून बेताळाचे स्मरण केले जायचे. वायंगणी शेतीतल्या भाताची कापणी झाल्यावर पूर्वातल्या देवराईशी संलग्न जी मोकळी जागा आहे, तेथे वैशाखात खळ जेवणाचा विधी केला जातो.

या जागेत असणारा वयोवृद्ध फणस देवचाराशी तर आम्रवृक्ष भूतांशी संबंधित असून वर्षपद्धतीनुसार विष्णू नाटेकर, तुळशीदास घाडी आदी मंडळी वायंगणी शेतीतल्या भाताच्या कणसाची मूठ पारंपरिक दगडावर देवचाराला अर्पण करताना दिवाबत्ती लावतात. फणसाच्या झाडावर केळ्याचा घड आणि पांढऱ्या रंगाचा कपडाकाष्टी लावण्यासाठी देवचाराला अर्पण करतात, तर आम्रवृक्षाला टांगलेल्या पाळण्यात भुताला केस विंचरायला आरसा, कंगवा काजळ, कुंकुम ठेवतात. त्या झाडाशेजारी केळीचा घड आणि रोप बांधले जाते.

भूत आणि देवचाराचे विधी घाडी समाजाचा जल्मी करतो, तर ब्रह्म्याची पूजाअर्चा ब्राह्मणाकरवी होते. वायंगणी शेतजमिनीत अन्नाची जी पैदासी झाली, त्याला पंचमहाभूतांचा वरदहस्त कारणीभूत ठरल्याची भावना इथल्या लोकमानसात रूढ असल्याने त्यांच्यामार्फत शाकाहारी जेवणाचा सामूहिक विधी संपन्न होतो.

खळाळत्या ओहोळाच्या पाण्याचे संगीत आणि पक्ष्यांचा किलबिलाट श्रवण करत डाळ, भात, वडे, मिष्टान्न भाजी अशा शाकाहाराचा आस्वाद देवराईच्या सावलीत घेण्यासाठी भाविक सहभागी होतात. मॉन्सूनचा पाऊस ओसरल्यावर इथला कष्टकरी समाज वायंगणी शेतीची तयारी करायचा आणि सोट्टी भाताची पेरणी करायचा.

भाताच्या लोंब्यानी कणसावर सोनेरी वर्ख दिसू लागल्यावर कष्टकरी सुखावला जायचा. खाण व्यवसायाने इथल्या बारमाही वाहणाऱ्या ओहोळ आणि नाल्यांच्या अस्तित्वावर घाला घातला. शेतात खाणमाती, गाळ साठल्याने जमिनीला अवकळा आली. अटल ग्राम योजनेअंतर्गत सत्तर हजार चौरस मीटरातली शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले आणि त्यामुळे भाताची पैदासी नव्या उर्मीने करण्याची परंपरा सुरू झाली.

शेती, बागायतीतल्या हिरवाईबरोबर इथल्या देवरायांतल्या वृक्षराजीने सुर्ल गाव समृद्ध होता. आपल्या गावाला लाभलेला सुजलाम सुफलामतेचा वारसा टिकवण्यासाठी भूमीपुत्रांची अविरतपणे चालू असलेली धडपड फळाला येऊ लागली आहे. लोहखनिज ही जरी राष्ट्रीय संपत्ती असली तरी तिचे उत्खनन किती प्रमाणात करावे याचे विस्मरण आपल्या सत्ताधीशांना झाल्याने सुर्लसारख्या गावासमोर अस्तित्वाचा प्रश्न प्रकर्षाने आला होता. कुळागरातल्या मौसमानुसार पिकांचा आस्वाद घेत जीवनातला आनंद मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या कष्टकऱ्यांना सिध्देश्वर, मल्लिकार्जुन, बेताळ, नवदुर्गा आदी देवतांनी हिरवाईची स्पंदने वृध्दिंगत करण्याचा आशीर्वाद द्यावा, ही प्रार्थना.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com