सरकारला राज्यात पुन्हा ‘तियात्र’ पुन्हा व्यवस्थितपणे सुरू झालेलेच नको आहे काय?’ हा प्रश्न होता, गोव्याचे प्रसिद्ध तियात्र कलाकार (Artist) आणि तियात्र निर्माते प्रिन्स जेकब यांचा. सारा गोवा हळूहळू पूर्ववत होत चालला आहे. अन्य व्यवसायही सामान्यपणे सुरू झाले आहेत मात्र ‘तियात्र’ गेली दोन वर्षे भोगत असलेल्या आपल्या अडचणीतून अजून बाहेर आलेले नाही. ‘राज्यात उपलब्ध असलेल्या नाट्यगृहांपैकी पणजीची कला अकादमी नूतनीकरणासाठी बंद आहे’. ती आणखीन किती वर्षांनी पुन्हा सुरू होईल हे सांगता येत नाही.
वास्कोचे ‘रवींद्र भवन’- त्यात असलेल्या वातानुकूलित यंत्रणेच्या नादुरुस्तीमुळे बंद आहे. मडगावच्या ‘रवींद्र भवन’मध्ये सतत सरकारी कार्यक्रमांची वर्दळ असते त्यामुळे ‘तियात्रा’ला तिथे नाट्यगृह मिळणे दुरापास्त झाले आहे. ‘गोमंत विद्या निकेतन’ची आसन संख्या कमी आहे आणि या थिएटरला पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे तिथं येणे लोक पसंत करत नाहीत. राहिली दोन नाट्यगृहे- फोंड्याचे ‘राजीव कला मंदिर’ आणि साखळीचे ‘रवींद्र भवन’. पण या दोन्ही नाट्यगृहात ‘तियात्रा’चा प्रेक्षकवर्ग फार विरळ असतो. दुष्काळात तेरावा महिना असावा तसं पुन्हा नाट्यगृहात 50% प्रेक्षकांनाच अनुमती आहे. त्यामुळे एका प्रयोगाचा किमान सुमारे 50 हजार रुपये खर्च असलेले ‘तियात्र’, या अटीमुळे कसा तग धरणार?’
‘तियात्र’ हा खास गोव्याचा एक नाट्य सादरीकरण फॉर्म. ख्रिश्चन (christian) समाजाचा ‘तियात्रा’ला भक्कम आधार. सबंध आशियात आज केवळ महाराष्ट्रातले ‘मराठी नाटक’ आणि गोव्यातले ‘तियात्र’ हेच पूर्णतः व्यवसायिकरित्या सादर होणारे, नाट्य सादरीकरणाचे अस्तित्वात असलेले कलाप्रकार आहेत. मराठी नाटकांप्रमाणेच ‘तियात्रा’चे ही एका मोसमात शंभर-शंभर प्रयोग सहज सादर होतात. कुठलाही सरकारी आधार नसताना, केवळ प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर ‘तियात्रा’ने आपले अस्तित्व समर्थपणे राखून आहे.
गोव्यात (goa) किमान वीस तरी ‘तियात्र’ निर्माते आहेत जे सातत्याने, दरवर्षी नव्या ‘तियात्रां’ची निर्मिती करतात. त्यापैकी किमान आठ निर्माते तर ‘तियात्र’ या व्यवसायावरच पूर्णपणे अवलंबून आहेत. गोव्यातले साधारण 600 कलाकार या व्यवसायाशी जोडलेले आहेत. या सहाशे कलाकारांपैकी किमान दोनशे कलाकारांची गुजराण केवळ ‘तियात्र’वरच होते. आज कोरानतून उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आणि त्यानंतर सरकारकडे ‘तियात्र’ संबंधी योग्य धोरणाचा अभाव असल्यामुळे त्यांची फरफट होत चालली आहे.
प्रिन्स जेकब म्हणतात, सरकारने सर्वात प्रथम नाट्यगृहाच्या भाड्यात 50 टक्के सवलत जरी दिली असती तरी त्याचा खूप आधार ‘तियात्र’ निर्मात्यांना झाला असता. (मडगावच्या (Margao) रवींद्र भवनच्या नाट्यगृहाचे ‘तियात्र’साठी असलेले भाडे सुमारे साडेसोळा हजार रुपये आहे. 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश या धोरणामुळे 50 टक्के प्रेक्षक गमवावा लागणाऱ्या या काळात ही भाड्यामध्ये मिळणारी 50 टक्के सवलत देखील दिलाशाची ठरू शकली असती) प्रिन्स जेकब हे नाट्यग्रह बुक करायला जेव्हा स्वतः मडगावच्या रवींद्र भवनमध्ये गेले तेव्हा त्यांना ‘तियात्रा’साठी नाट्यगृह उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्याचे कारण विचारता उत्तर मिळाले,- ‘तशी ऑर्डर वरून आहे.’
ही ‘वरून आलेली ऑर्डर’ आज ‘तियात्रां’च्या मुळावर आली आहे. खास गोव्याचा असणारा हा ‘तियात्र फॉर्म’ कोरोनाकाळापूर्वी पूर्णपणे भरात होता. परंतु अवघ्या दोन वर्षातच त्याचे रुप-रंग पार बदलून गेले आहे. वर्तमान काळात जरी व्यावसायिक ‘तियात्रां’चे सादरीकरण होत असलेले दिसत असले तरी अनेक अडथळे समोर आहेत. अनेक तियात्र कलाकार नैराश्यात आहेत. काय आहे त्यांचे म्हणणे हे उद्याच्या अंकात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.