समाजमनात मुद्दाम पेरले जाणार विचार

दोन्ही चांगल्या गोष्टी आवश्यक आहेत, दोन्ही करा असे सांगणे फार कठीण आहे का? मग तसे का सांगितले जात नाही? दोन्हीपैकी कुठलीही स्वीकारत दुसरीचा द्वेष का पेरला जातो? कारण एकच - देश, देशभक्त व संस्कृती याबद्दल घृणा निर्माण करणे.
goa
goaDainik Gomantak

प्रसन्न बर्वे

समाजमाध्यम हे विचार पेरण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. समाजमनावर याचा खोल परिणाम नकळत होत जातो. विचारांचा हाच परिणाम पुढच्या पिढीत झिरपतो. यात काहीतरी चुकत आहे, हे जाणवू नये इतपत स्थिरावतो.

त्यानंतरच्या पिढीत तो प्रत्यक्ष कृतीत येतो. नको असलेले डोके तलवारीने लगेच छाटण्यापासून ते नको असलेल्या डोक्यात त्याला स्वत:लाच हळूहळू बदल घडवून ते डोके आपल्यासाठी हवा तो बदल करवून घेण्यापर्यंत प्रगती झाली आहे. जे काम तलवारीने होत असे, तेच काम आता व्हॉट्सॲप व ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवरून केले जात आहे.

समाजमाध्यमांवर आलेले काहीही जरासे आपल्या विचारांशी मिळतेजुळते असले की, आपण लगेच ते लाइक किंवा फॉरवर्ड करून टाकतो. तो विचार योग्य आहे की नाही, त्याचा परिणाम काय होतो याचा विचारही करत नाही.

हा विचार चुकीचा असतो का? तर प्रत्येकवेळी चुकीचाच असतो, असे म्हणता येत नाही. प्रत्येक विचार सुटा सुटा तपासावा लागतो. त्यावर स्वत: विचार करावा लागतो. पण, एवढा वेळ कुणाकडेही नसतो. पुन्हा त्यात, ‘मी आधी फॉरवर्ड केला’, ‘मला इतके लाइक्स मिळाले’, अशी विचारसरणीही असते.

त्यात बरोबर काय आहे, चूक काय आहे हा प्रश्‍न विचारातच घेतला जात नाही. काही अंशी घेतला तरी त्याप्रमाणे प्रतिक्रिया दिली जात नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजकीय झुंडशाही. ‘गेली सत्तर वर्षे’ विरुद्ध ‘२०१४पासून..’, अशी झुंडशाहीतील तुंबळ युद्धे समाजमाध्यमांवर लढवली जातात.

एकमेकांच्या यथेच्छ उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात. काँग्रेसशी संबंधित काहीही असले तरी तेच कसे बरोबर आहे, हे काँग्रेस-समर्थक मांडतात व भाजपचेच कसे बरोबर आहे, हे भाजप-समर्थक मांडतात. पण, ‘मांडणे’ यापेक्षाही त्यात ’भांडणे’ हाच प्रकार जास्त असतो. तसे पाहू जाता, बाजू घेणे यात अयोग्य किंवा चुकीचे काही नाही. पण, बाजू घेताना किंवा आपले मत मांडताना प्रामाणिक असणे फार महत्त्वाचे आहे.

समर्थकांच्या सामाजिक, राजकीय झुंडी जेव्हा समाजमाध्यमांवर अत्यंत हिणकस पातळीवर जाऊन गांधी व सावरकरांवर टीका करतात, तेव्हा अत्यंत यातना होतात.

goa
Goa Accident Death: थिवी येथे ट्रकच्या धडकेत युवती ठार तर पणजीत कारचा अपघात

हे दोघेही आपल्याच देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले देशभक्त आहेत, याचे साधे भानही या दोन्ही झुंडीतल्या लोकांना उरत नाही. ‘कुणी कुणाची किती उतरवली’ याची मोजमापे दोन नागड्यांनी काढावी, इतके हे हास्यास्पद असते. आपण आपल्याच देशाची, देशभक्तांची नाचक्की करतोय, याचे भान, याची लाज वाटेनाशी झाली आहे.

जे देशाबद्दल, तेच संस्कृतीबाबतही घडत आहे. कळत-नकळत विचारांची मांडणी अशी केली जाते की, आपण विकृतीलाच संस्कृती समजू लागलो आहोत. अनेक विचार आकर्षक पद्धतीने पेरले जातात. समान लाभ मिळवून देणाऱ्या किंवा महत्त्व असलेल्या दोन पूरक गोष्टी व विचार एकमेकांच्या विरुद्ध मांडल्या जातात.

त्यातला कुठला तरी एक विचार किंवा दोन्ही विचार सुटे सुटे घेतल्यास आपल्या भावनेला हात घालणारे असतात. पण, त्यांची मांडणी एकत्र केली जाते. उदाहरणार्थ: ‘एका विशिष्ट ठिकाणी जाऊन, धक्काबुक्की खाऊन देवदर्शन घेतले तरच देव प्रसन्न होतो किंवा देव पावतो, असे नाही. तर घरातल्या आईवडिलांनाच देव म्हणून आदर सन्मान दिला तर देव त्यालाही पावतो!’

‘मेल्यानंतर तोंडात पाणी घालणे, बारावा-तेरावा करणे, श्राद्ध करणे यापेक्षाही जिवंतपणी आईवडिलांची सेवा करणे, त्यांना सन्मान देणे केव्हाही चांगले!’.

आईवडिलांचा आदर करणे आणि देवदर्शन घेणे या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आईवडिलांच्या सेवेचे महत्त्व पटवण्यासाठी देवदर्शनाला नावे ठेवण्याची अजिबात गरज नसते. देवदर्शनाला नावे ठेवण्यासाठी तर आईवडिलांची सेवा करण्याला महत्त्व दिले जात नाही ना? कारण, आपली संस्कृती दोनही गोष्टी तितक्याच श्रद्धेने करा असे सांगते. श्राद्ध करावे की करू नये, हा वेगळा विषय आहे.

त्याला नावे ठेवण्यासाठी जिवंत असताना आईवडिलाची सेवा करण्याला चांगले म्हणण्याची आवश्यकता नाही. जिवंतपणी आईवडिलांची सेवा आणि मृत्यूपश्‍चात त्यांचे क्रियाकर्म, श्राद्ध करणे या दोनही आपल्या जबाबदाऱ्याच आहेत. ही किंवा ती, असा पर्याय आपल्या संस्कृतीत नाही. दोन पूरक, चांगल्या गोष्टींना, जबाबदाऱ्यांना एकमेकांविरुद्ध ठेवत त्यातून चांगले वाईट करणे, हा विचार हळूहळू अनेक माध्यमांतून पेरला जात आहे.

वास्तविक दोन्ही चांगल्या गोष्टी आवश्यक आहेत, दोन्ही करा असे सांगणे फार कठीण आहे का? मग तसे का सांगितले जात नाही? दोन्हीपैकी कुठलीही एक स्वीकारत दुसरीचा द्वेष का पेरला जातो? कारण एकच, देश, देशभक्त व संस्कृती याबद्दल घृणा निर्माण करणे. आपल्या देशाबद्दल, संस्कृतीबद्दल आपल्या विचारांत असलेली नकारात्मक भावना, या मुद्दाम पेरलेल्या विचारांचे फळ आहे.

आपल्या देशात पूर्वीपासून चांगले घडले आहे, आजही घडत आहे आणि भविष्यातही घडेल, असा सकारात्मक विचार आपल्या मनात सहजपणे येत नाही. ‘इथे काहीच चांगले नाही’, हाच विचार पट्कन डोक्यात येतो व पटतो.

तसे जगभरात कुठल्याच देशात सर्वच्या सर्व चांगले नसते. तसेच आपल्या देशातही नाही. जे चांगले आहे, त्याला चांगले म्हणून समोर आणणे का होत नाही? ते काँग्रेसने केले की भाजपने केले, अशी राजकीय वर्गवारी का करत बसतो आपण? राजकीय, सामाजिक, ज्ञातीय निष्ठा-द्वेष बाळगत आपण देशाविषयी नकारात्मक पोसला आहे.

संस्कृतीतल्या दोन चांगल्या, अनिवार्य गोष्टींची तुलना करून एका गोष्टीला वाईट ठरवल्याने संस्कृतीविषयी नकारात्मक भाव निर्माण होतो. विकृतीच नाही, अशी कुठलीच संस्कृती नसते. विकृतीला संस्कृतीसोबत मांडल्याने संस्कृतीविषयी नकारात्मक भाव निर्माण होतो.

झुंडशाहीला पोषक आहेत म्हणून देश आणि संस्कृती याविषयी नकारात्मक भावना वाढीस लागेल, अशा गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. कळत-नकळत अशा गोष्टी केल्याने आपण आपल्याच देशाला व संस्कृतीला हीन लेखत आहोत, याचे भान ठेवावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com