Panji Smart City Traffic Problem: राजधानी पणजीवर विकासाच्या नावाखाली दिवसागणिक अनन्वित अत्याचार सुरू आहेत. त्यातून प्रसवणाऱ्या वेदना सहनही होत नाहीत आणि सांगताही येईनात, अशी केविलवाणी अवस्था अनेक घटकांची बनलीय.
दाद मागणार कुणाकडे? आमदार बाबूश मोन्सेरात भाजपचेच घटक असल्याने समस्येवर भाष्य करायचे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेणे, अशी व्यावसायिकांची अनुभवाअंती भावना बनली आहे.
आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास. डांबरीकरणासाठी अटलसेतू बंद असल्याने सोमवारी अभूतपूर्व वाहतूककोंडीने पणजीसह पर्वरी परिसराला अक्षरशः वेठीस धरले. पुढील काही दिवस हीच स्थिती राहण्याची शक्यता अधिक आहे.
एकीकडे अठराविश्वे दारिद्र्याने रंजलेल्या रंकाप्रमाणे अनेक महिन्यांपासून उद्ध्वस्त झालेल्या पणजीची स्थिती राज्यकर्त्यांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवतेय, तर ‘हेही दिवस जातील’, अशा दिलासादायी धारणेतून लोक स्वत:चीच फसवणूक करून घेत आहेत.
धूळ खात मुकाट्याने धंदा करणारे व्यावसायिक, पावलापावलावर खड्ड्यांचा सामना करत उद्विग्न बनलेले स्थानिक, पणजीतील खंदके पाहून खिन्न होणाऱ्या पर्यटकांची सरकारला जराही खंत नाही.
अधिकाऱ्यांच्या बैठकांचा ‘फार्स’ तेवढा अधूनमधून केला जातोय. लोकांना गृहीत धरून त्यांच्यावर स्वार्थप्रेरीत विकास थोपवण्याचा बुरसट उद्योग उबगवाणा आणि तिटकारा आणणारा आहे. दुर्दैवाने त्याचा अंतबिंदू दिसत नाहीये.
मुळात पणजी मास्टरप्लान नसलेले शहर आहे. येथे पोर्तुगीजकालीन रचना आजही तशीच आहे, ती बदलणे सहज, सोपे नाही. पूर्वीच्या तुलनेत वाहनांची वर्दळ प्रचंड वाढलीय. चक्रव्युहाकार रस्त्यांच्या रचनेत एखादा किरकोळ अपघात घडला तरी पूर्ण शहरात चोहोबाजूंनी कोंडी होते.
हे वास्तव लक्षात घेऊनच ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे नियोजन करणे संयुक्तिक ठरले असते. कामे मार्चपूर्वी पूर्णत्वास न आल्यास निधी परत जाईल, याची नोव्हेंबरात जाणीव होताच एकाचवेळी राजधानीत सर्वत्र खोदाई सुरू झाली ती आजतागायत कायम आहे. त्यात जी-20च्या पूर्वबैठकांसाठी पणजीची निवड झाली आणि नवे संकट ओढवले.
बैठकांसाठी मिळणाऱ्या निधीवर डोळा ठेवणाऱ्या प्रशासनाने ‘स्मार्ट सिटी’साठी उकरलेली पणजी पूर्ववत करायची आणि पावसाळ्यापर्यंत बैठका पूर्ण होताच ऑक्टोबरपासून पुन्हा कामे सुरू करण्याचे घाटले आणि निकृष्ट कामांचा कहर माजला. यातील अनागोंदीवर याच स्तंभातून वेळोवेळी बोट ठेवण्यात आलेय.
जी-२०च्या बैठका अन्यत्र हलवता आल्या नसत्या का? कामे उरकण्यासाठी ठेकेदार आता चक्क मांडवीचे खारे पाणी वापरताहेत. पेव्हर्सवर हॉटमिक्स डांबरीकरण होतेय, जे बांधकामांच्या कोणत्याही निकषांत बसत नाही. दर्जानामक संकल्पना खुंटाळीला टांगण्यात आलीय. नव्या बनवलेल्या रस्त्यांत डंपर रूतत आहेत, तरीही सरकारला त्यात वावगे वाटत नाही.
सध्या पणजी-मळा परिसरात डांबरीकरणासाठी एकाचवेळी अनेक अंतर्गत रस्ते पोखरले आहेत, परिणामी भाटले, तांबडीमाती भागात पर्यायी मार्ग म्हणून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत.
बालभवन नजीक पेव्हर्स बसविण्यासाठी एकाचवेळी अनेक ट्रक उभे राहिल्याने सोमवारी पूर्ण सांतिनेज भाग ठप्प झाला. फार्मसी कॉलेज ते हॉटेल विवांता पार करायला 25 मिनिटे लागत होती, इतकी त्याची तीव्रता होती.
पणजीतील एक असा रस्ता नव्हता जेथे वाहनांची रांग नव्हती. विकासकामे करा, पण त्यासाठी नियोजन नको का?
संध्याकाळनंतर दयानंद बांदोडकर मार्ग कॅसिनोकिंग व्यापतात, पर्यटक, त्यांची वाहने या कोलाहलात वाहनचालक दबकत, जीव मुठीत धरून मार्गस्थ होतात. तेथे रात्रीचे काही तास वाहतूक पोलिसांचा फेरा गरजेचा आहे.
मांडवी पुलाखाली वाहनतळ आणि दुसऱ्या टोकाला क्रूझ आहेत. पर्यटकांच्या बसेस वाटेत थांबवून शेकडो पर्यटक रस्ता अडवून पुढे जातात.
वास्तविक पर्यायी मार्गाची व्यवस्था असूनही टाळली जाते. तेथे वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नाही. अग्निशमन दल कार्यालय ते मलनिस्सारण प्रकल्प दरम्यानचा रस्ता वर्षभर बंद आहे.
काकुलो मॉल, नॅशनल थिएटरकडील नेप्चुन हॉटेल अशी अनेक व्यावसायिक आस्थापने आहेत, ज्यांना महिनोनमहिने चाललेल्या खोदकामाचा मोठा फटका बसला आहे.
रस्ते बंद, पर्यटक, गिऱ्हाइके येणार कशी? विधानसभा निवडणुकीत उत्पल पर्रीकरांसोबत राहिलेल्या व्यावसायिकांना धिम्या गतीने चालणाऱ्या कामांचा अधिक त्रास होतोय, हा योगायोग समजावा का?
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी निदान काही उपाय योजण्याची इच्छाशक्ती तरी दाखवा! सम-विषम तारखांमध्ये चारचाकी वाहन प्रवेश सूची; वाहतूक पोलिसांचे काटेकोरपणे नियंत्रण; बंद वा कोंडी झालेल्या रस्त्यांची ‘एफएम’वरून सातत्याने माहिती संप्रेषित करणे;
काही दिवसांसाठी पणजीत चारचाकी टाळणाऱ्यांना मोफत पायलट सेवा पुरवणे असे पर्याय अवलंबण्याच्या दिशेने किमान विचार व्हावा. लोकांचे आणखी किती हाल करणार? सहनशीलतेचा अंत होतोय!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.