Maximization: कमीत कमीपासून जास्तीत जास्त

आपल्या अन्नसंस्कृतीत, विशेषतः स्वयं उत्पादित पदार्थांच्या बाबतीतही ‘मॅक्झिमलायझेशन‘ हेच तंत्र चालत आलेले आहे
Jackfruit
JackfruitDainik Gomantak
Published on
Updated on

कमलाकर द. साधले

Maximization लांबचे पाहुणे 4 मुलांसह गोव्यात आलेले असतात. त्यांचा रात्री दहा वाजता मला फोन येतो, ‘पणजीला हॉटेल बुक केले होते. पूर्वीच्या गिऱ्हाईकाने खोली रात्री 9 वाजता खाली करणे अपेक्षित होते. पण 11 वाजताची त्यांची फ्लाईट 8 तासांनी पुढे ढकलली.

खोली सकाळी 5 वाजता मिळेल. पणजी व आसपासची सर्व हॉटेले फुल आहेत.’ मी म्हणालो, ‘मग तुम्ही सरळ फोंड्याला या. यावेळी पणजीत तुम्हांला नीट शाकाहारी जेवण मिळणे कठीण’. आढेवेढे घेत त्यांनी कबूल केले.

रोज सकाळी फार्मवरून आमची ताजी भाजी येते. म्हणून घरात भाजी नव्हती. मुले शिकायला बाहेर होती. घरात आम्ही दोघेच. उषा(पत्नी)ने विचारले, ‘काय करायचे?’ मी म्हणालो, ‘वरणभातासाठी आधी कुकर लाव, बाकीचे बघू’.

मग ठरले की स्थानिक पदार्थांतूनच त्यांचा पाहुणचार करायचा. आमसोलाची कढी केली, 5-6 माणसांची झोपण्याची व्यवस्था करेपर्यंत अर्ध्या तासात मंडळी हजर. मी विचारले, ‘सुरणाची भाजी चालते का?’ ते ‘चालते’ म्हणाले, पण चेहऱ्यावर नाराजी दिसत होती.

मी टॉर्च व कुदळ घेऊन बागेत गेलो. पाठोपाठ तेही आले. यापुढे सुरण काढून चिरून भाजी म्हणून चेहऱ्यावरील नाराजी वाढली. सुरण कापल्यावर, ‘असा असतो का जमिनीत?’ भाजी चटकन मऊशार शिजली. ते म्हणाले, ‘सुरणाची भाजी छान लागली.

आमच्याकडे सुरणाच्या फोडी चिवट राहतात’. उषाला सांगितले ‘न्याहारीला कढीचे पोहे कर’.कढीचे पोहे हा काय प्रकार असतो, हे त्यांना माहीत नव्हते. तो प्रकार त्यांना बेमालूम आवडला. अजून ते त्या जेवणाची व विशेषत: न्याहारीची आठवण काढतात.

असाच प्रसंग माझ्या एका मित्रावर आला. त्याच्या आईने रात्रीचा शिल्लक राहिलेला भात, आमटी, भाजी यात पीठ कांदा वगैरे मिसळून थालीपीठ लावले. तो पदार्थ लाजवाब ठरला. पाहुण्याच्या बायकोने पाकक्रिया विचारली, आई अडचणीत सापडलेली पाहून मित्राने, ‘ही पाकक्रियेची किमया नाही, आईच्या हाताची आहे’, असे म्हणून वेळ मारून नेली!

पाकक्रियेची पुस्तके, त्यात सांगितलेले तयार मसाले, पनीर, लोणी यांसारखे ठरलेले घटक असल्याशिवाय उत्कृष्ट पदार्थ बनू शकत नाहीत, हा समज खोटा ठरविणारे अनेक अनुभव आहेत.

अडचण आहे ती लोकांच्या चाकोरीबद्ध मनोवृत्तीची. कोणत्याही क्षेत्रांतील कुशल सृजनकारी साधकाला या मर्यादा अडवू शकत नाहीत. 4 एप्रिलच्या ’सृष्टीचे मिनिमलिझम’ या माझ्या लेखात संसाधनांचा कमीत कमी वापर हा मंत्र सांगितला होता. तो मंत्र अर्धा होता उरलेल्या अर्ध्याची आज चर्चा करुया.

हा अर्धा मंत्र आहे वापरात आणलेल्या संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे. इथे ‘मॅक्सिमलायझेशन‘ आले. या उलट आज, जास्तीत जास्त वस्तू व प्रत्येकीचा कमीतकमी वापर हे आजचे ’यूज ॲण्ड थ्रो’ संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण, बाजारव्यवस्थेने पुरस्कृत केलेले.

जेवढे तुम्ही फेकून द्याल तेवढे त्यांचे गिऱ्हाइक वाढेल. वापरता येण्यासारखेसुद्धा तुम्ही कसे फेकून द्याल याची व्यवस्था केलेली असते. आमची इस्त्री वीसेक वर्षे चालली. त्याची दुरुस्ती, खराब भाग नवीन घालणे हे क्वचित चालायचे.

पुढेही चालली असती. पण, कंपनीने नवीन मॉडेल बाजारात आणलेले आहे. जुन्याचे पार्ट मिळत नाहीत. वीस रुपयांच्या भागासाठी अख्खी इस्त्री भंगारात!

फॅशन हे दुसरे बाजारी खूळ. जास्त करून कपड्यांचे. चार वर्ष न फाटता, न विटता वापरता येणारे कपडे, फॅशन बदलली म्हणून वापरणाऱ्यांनी फेकून द्यावेत, असा ट्रँड बाजारव्यवस्था प्रसारित करते. त्यांच्या नवीन मालाला गिऱ्हाईक तयार करण्यासाठी! माझ्या मेहुण्याचे लग्न माझ्यानंतर दोन वर्षांनी झाले.

मुले झाली. त्याच्या बायकोने माझ्या बायकोकडून म्हणजे आपल्या नणंदेकडून आपल्या मुलांसाठी आतेभावंडाचे जुने कपडे आवर्जून मागून घेतले. येथे कंजूषपणा नव्हता ती आपल्या जतन संस्कृतीची एक सन्मान्य रीत होती.

माझ्या सुनेला मूल झाले, तेव्हा तिने माहेरून डोलणारा रंगीत लाकडी घोडा आणला. तो तिने व तिच्या बहिणीने भरपूर वापरला होता. तिच्या आईने तो आपल्या माहेरून आणला होता.

तिच्या सर्व भावांच्या मुलांनी वापरला होता. (अजून तो पुढच्या पिढीने वापरण्या इतपत मजबूत आहे) हे आपल्या संस्कृतीतील जास्तीत जास्त वापराचे ‘मॅक्झिमलायझेशन‘ तंत्र.

आपल्या अन्नसंस्कृतीतही, विशेषतः स्वयं उत्पादित पदार्थांच्या बाबतीतही हेच तंत्र चालत आलेले आहे. जे आपल्या जागेत किंवा गावात पिकते त्याचा जास्ती जास्त प्रकारे वापर कसा करायचा आणि त्या मर्यादित प्रकारच्या उत्पादनातून आपल्या गरजा भागवीत असताना, स्वयंपूर्णता साधत असतात, नावीन्य व विविधता कशी खुलवायची, याचे विज्ञान जपले होते.

उषा मुंबईला जन्मलेली, कोल्हापूर शहरामध्ये वाढलेली. सून रश्मी ही पुण्याची. ही संस्कृती त्या दोघींनी जपली. किंबहुना सून नवीन पिढीतील मोठ्या शहरातून आलेली असली तरी. उलट तिने यात जास्त नावीन्य आणले आहे.

फणस हा गोवेकरांच्या बागेतील एक महत्त्वाचे झाड. डिसेंबर ते मे-जूनपर्यंत त्याचा मोसम. त्याच्या प्रत्येक अवस्थेत वेगळा उपयोग अगदी कोवळा असताना बाहेरची हिरवी साल काढून सुशेल, नंतर स्पष्ट, आत कोवळे गरे, आटका झालेले असतात त्यावेळी सोल व माव काढून, जून झाल्यावर केवळ गरे व आठळांची कडक साल काढून केलेली भाजी.

जून आठळांचा आमटीला जाडसरपणा व चव आणण्यासाठी वापर, जून गरे शिजवून वाटून त्याचे पापड, तळलेल्या जून गऱ्यांचा चिवडा, जून गऱ्यांचे थालीपीठ, जून आठळ्या मिठाच्या पाण्यात उकळून खोबरे-लाल मिर्चीच्या चटणीबरोबरच एक चटकदार पदार्थ, जून सुकविलेल्या आठळ्या भाजायच्या आणि हळदीच्या पानांबरोबर कांडून तिखटमीठ, खोबरे घालून पावसाळ्यांतील खाद्यपदार्थ बनविला जायचा.

पावसाळ्यात आठळ्या टिकविण्यासाठी ओल्या लालमातीबरोबर भिंतीवर चिकटविल्या जायच्या. मातीबरोबर सोल निघायचे, आतील आठळ्या स्वयंपाकात वापरल्या जायच्या. जून गरे टिकण्यासाठी मिठाबरोबर बरणीत चेपविले जायचे.

पावसाळ्यात धुऊन भाजी केली जायची. कापे गरे सुकल्यावर नुसतेच खाण्यात मजा असते. पिकलेल्या रसाळ फणसाचा रस काढून खीर, सांदणे यांत वापरायचे. ते वाटून केलेल्या त्याच्या फणसपोळ्या हा एक टिकावू पदार्थ.

Jackfruit
Illegal Sand Mining in Goa: बेकायदा रेती उत्खनन प्रकरणी गोवा पोलीस अलर्ट मोडवर, 'एवढ्या' जणांवर गुन्हे दाखल

याशिवाय पिकलेल्या फणसाचा (रसाळ) फणसुपऱ्या, जेली-जाम-सरबत, फणस-नारळ वड्या, आठळांच्या पावडरपासून बिर्याणी, रस्सा, खीर, भजी, वडे, कटलेट असे खमंग पदार्थ. सागवानानंतर फर्निचरसाठी फणसाचे लाकूड उत्तम.

जुने वठलेले फणसाचे झाड आतून पोकळ झालेले असायचे. त्याला लाकडी तळ ठोकून त्यात मिठासारखे पदार्थ ठेवण्यासाठी बॅरल म्हणून वापरायचे. बांदिवड्याला फणसाची खूप झाडे असलेल्या भागांतील काही लोकांचे फणसाच्या सुक्या पानांच्या पत्रावळी हे उपजीविकेचे साधन होते.

फणसाची बाहेरची साल (चार) हे एक पशुखाद्य. ओली सुकवून वापरता येणारे. ही संस्कृती लोप पावल्यामुळे आज फणस हे गोव्यातील सर्वांत जास्त फुकट जाणारे फळ उरले आहे.

नारळ, आंबा, फणस, केळ यांच्या फळांचेच नव्हे, प्रत्येक भागाचे विविध उपयोग आहेत. रश्मी ही आर्किटेक्ट, पण झाडा वनस्पतीत, सेंद्रीय शेतीत आस्था आहे. ती कुजलेली केळी, केळ्याच्या साली, कांद्याची बाहेरची साले, तांदूळ धुतलेले पाणी यापासून सेंद्रिय खत बनविते.

Jackfruit
Forest Fire in Goa: गोव्याचे जलच्रक बिघडणार? जंगलांना लागलेल्या आगीमुळे 'हे' दुष्परिणाम होण्याची भीती...

नारळाचा काथ्या कुजवून झाडांसाठी कोकोपीट तसेच करवंट्यांपासून कांडिकोळसा हा प्रयोग केला आहे. भाजीच्या बागेत कोवळी गवार खुडण्यास चार दिवस गेले तर ती जून होते. भाजीला वापरता येत नाही. गवारीच्या जून शेंगा कडकडीत उन्हात वाळवून तळल्यास वेफर्ससारखा पदार्थ बनतो.

आंबट ताक, शिळी आमटी, कढी, कुजलेली केळी व साली यांचा वापर केल्यास कचऱ्याचे खतात रूपांतर करणाऱ्या जिवाणूंची वाढ लवकर होते. सेंद्रिय खत लवकर बनते. लाल मिरचीची तिखट पूड चाळल्यावर जो चाळ राहतो त्याचेही खमंग पदार्थ बनतात.

पोळ्या लाटताना राहिलेले सुके पीठ उद्या पुनः वापरायचे नसल्यास त्यात तिखट मीठ, ओवापूड, हिंग घालून धिरडी करता येतात. दोडक्याची भाजी करताना शिरा काढल्या जातात, तसेच भोपळा दुधीभोपळा यांच्याही त्यांपासून उत्तम चटणी बनते.

कलिंगडाच्या पांढऱ्या गरापासून परोठे, धपाटे, मुटके, डोसे, थालीपीठ असे अनेक पदार्थ बनतात. शेंगदाणा भाजल्यावर साल न काढता तसाच वापरणे, भोपळा, बटाटा यांचा सालीसकट वापर त्या सर्वांतून अन्नपदार्थाची नासाडी टळते, एवढाच फायदा नसून त्यांतील पोषक तत्त्वे टाकून दिली जात नाहीत ही मोठी उपलब्धी आहे.

Jackfruit
Gomantak Editorial: जातगणनेचे आयुध

सकाळच्या न्याहारीला भाज्या पोळीपेक्षा कालच्या पोळीपासून खमंग लाडू अथवा फोडणीची पोळी हे जास्त भावणारे पदार्थ. पालकाच्या जून देठापासून सूप केल्यास त्याला जास्त दाटपणा येतो. गाजर, मुळा, बिटरूट, नवलकोन यांच्या फुकट जाणाऱ्या पानांपासून परोठे करता येतात.

लाल माठाचे खोड, आळूचे जून देठ यांची वरची साल काढून गरापासून देठी, भरीत करता येते. तसेच शेवग्याची फुले, कोवळी पाने, केळफूल हे सहसा न वापरले जाणारे उत्पादन त्यापासून अनेक पदार्थ बनतात.

फक्त अन्नपदार्थांच्या बहुविधकरणाचा साठा उत्तरांची कहाणी पाचाउत्तरी संपवित आहे. इतर अनेक वस्तू, प्रक्रिया यांची लंबी यादी आहे. तैत्तरीय उपनिषदांचा आदेशआहे,

अन्नं न निंद्यात्। तद्व्रतम्। अन्नं बहु कुर्वीत। तद्व्रतम्।

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com