असे करायचे पोर्तुगीज गोव्यावर राज्य

गोव्यात (Goa) दहशत माजवण्यासाठी पोर्तुगालकडे कार्यक्षम अशी यंत्रणा होती
 The Portugal ruled over Goa
The Portugal ruled over GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात (Goa) दहशत माजवण्यासाठी पोर्तुगालकडे कार्यक्षम अशी यंत्रणा होती, पीदे (पोलिसिया इंतरनासियोनाल ई दी दिफेसा दो इश्तादो)! या गुप्त पोलिसांच्या यंत्रणेचा प्रचंड दरारा होता. तिला गोव्यात आणण्याचे श्रेय ब्रिगेडियर पावलो बेनार्द गिदेस या गव्हर्नर जनरलकडे जाते. गिदेस याने आपल्यासोबत आपली पत्नी मादाम मारिया जुजे बोर्जीस हिलाही आणले होते. हीचे रंगढंग विख्यात होते. ती जेव्हा गोव्यातील चर्च आणि घराना भेटी द्यायची तेव्हा तिथल्या यजमानाना तो आपला सन्मान वाटत नसे तर काहीशी भीतीच वाटायची. ती अत्यंत सहजपणे तिथल्या पुरातन, कलाकुसरीच्या वस्तू उचलायची आणि युरोपमध्ये नेऊन अविश्वसनीय किमतीत विकायची.

पिदे ही अक्षरशः घटनेतर यंत्रणा होती. तिला स्थापनासमयीच (९ ऑगस्ट १९५४) अतिरिक्त अधिकारी देण्यात आले होते. यासाठी जो कायदा करण्यात आला, त्याच्या निषेधार्थ पोर्तुगालचे कायदामंत्री मान्युएल गोन्साल्वीस काव्हालियेरो दी फरेरा यानी पदाचा राजीनामा दिला होता. पिदेला कोणत्याही अधिकारिणीला ओलांडून जाण्याचे अधिकार मिळाले होते- अगदी गव्हर्नरच्याही! या यंत्रणेकडे पणजीत बसवलेला रेडिओ ट्रान्समीटर होता आणि तिच्यावरून अधिकारी गव्हर्नरला न सांगताच थेट लिस्बनशी संपर्क साधत. पिदेचे एजंट आपली अमर्याद पाशवी शक्ती वापरताना मानवी हक्कांचा भंग तर करायचेच, शिवाय खंडणीही वसूल करायचे. त्यांचे लक्ष्य बऱ्याच वेळी केवळ संशयावरून पकडलेले निरपराध नागरिक आणि राजबंदीच असायचे, गुन्हेगार नव्हे. राजबंद्यांवर अत्याचार करणारा या पिदेचा सर्वांत कुविख्यात छळकर्मी एक मिस्तीस होता. मिस्तीस म्हणजे पोर्तुगीज आणि भारतीय वंशाच्या संकरातून जन्माला आलेले अपत्य. त्याचे नाव 'आजेंत' कासिमिरो एमेरितो रोजा तेलीस जोर्दांव मॉन्तेरो. 'आजेंत' मॉन्तेरो म्हणून त्याला ओळखले जायचे.

 The Portugal ruled over Goa
गोव्यातील १८ हजार हेक्टर जमीन क्षारयुक्त; माती परीक्षण महत्त्वाचे

गोमंतकीय न्यायाधीश- नोटरी, फर्नांडो जॉर्ज कुलासो आपल्या 'डिसेंबर १८-१९, १९६१: बिफोर, ज्युरिंग अँड आफ्टर' ह्या पुस्तकांत लिहितात, 'आपली आई कुडतरी येथील ब्राह्मण परिवारातील असल्याचे कासिमिरो मॉन्तेरो सांगायचा. ( ही मॉन्तेरोची नेहमीप्रमाणेच अस्सल थाप होती, कशी ती पुढे कळेलच.) तो अस्खलित पोर्तुगीज, इंग्रजी आणि कोकणी बोलायचा. तो पूर्वायुष्यांत भाडोत्री सैनिक (मर्सिनरी) म्हणून वावरला आणि स्पेनच्या यादवी युद्धांत तो जनरल फ्रान्को या हुकुमशहाच्या वतीने लढला होता. त्यानंतर त्याने नाझी जर्मनीच्या ब्लू डिव्हजन ह्या विशेष तुकडीतर्फे सोवियेत सैन्याविरुद्धच्या लढाईतही भाग घेतला होता. कालंतराने तो जनरल मॉन्टगोमरी यांच्या दलातला कमांडो झाला आणि जर्मनीविरुद्ध लढला. (नंतर त्याने लंडनमध्ये एका सोनाराचा खून केला होता.) गोव्यात तो सांताक्रुझ- कालापूर येथे राहायचा आणि पोलीस मुख्यालयातून सूत्रे हलवायचा. तो रोज रात्री दहा वाजल्यानंतर खुल्या जीपमधून सोबतीला काही सुरक्षा रक्षक घेऊन फिरायचा. रस्त्यात भेटलेल्या कुणालाही नुसता संशयावरून उचलायचा आणि त्याचा विकृत छळ करायचा. किमान तीन- चार खून त्याच्या नावावर होते आणि तो अटक केलेल्या महिलानाही मारहाण करायचा.'

स्वातंत्र्यसैनिक डॉ. सुरेश काणेकर सांगतात, " मुक्ती चळवळीला आत्यंतिक विरोध कुणी केला असेल तर मिस्तीस कासिमिरो मॉन्तेरोने. संशयितांवर अत्याचार करण्यासाठी त्याने अनेक अमानुष, रानटी क्लृप्त्या शोधल्या होत्या, ज्यांचा वापर करून तो सशस्त्र लढ्याविषयीची माहिती मिळवायचा. अनेकदां निरपराध लोकांवर अत्याचार करून त्याना खोटी साक्ष देण्यास भाग पाडले जायचे. काहीजणांचा अमानुष मारहाणींत मृत्यूही झाला. "अशीच एक हृदयद्रावक घटना म्हापसा येथील श्रीमती दिवकर या महिलेच्या बाबतीत घडली. ती म्हापशाचे सर्जन व स्वातंत्र्यसैनिक डॉ. पुंडलीक गायतोंडे यांच्याकडे परिचारिका म्हणून काम करायची. तिला अटक करून पोलीस कोठडीत टाकल्यानंतर मॉन्तेरोने आपले मायाजाल तिच्यावर पसरवले. मित्रा काकोडकर ( ह्या नंतर आमदार माधव बीर यांच्याशी विवाहबद्ध होऊन मित्रा बीर झाल्या,) यानी एकदां श्रीमती दिवकर हिला मॉन्तेरोच्या पाताळयंत्रीपणाविषयी सावध केले असता त्याने मित्राला अशी काही जोरदार थप्पड मारली की मित्रा काकोडकर बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्या. मला हे खुद्द मित्रानेच सांगितले होते."

१८ सप्टेंबर १९५६ रोजी सकाळी ९च्या सुमारास आझाद गोमंतक दलाच्या बुरखाधारी क्रांतिकारकांनी जेरोनिमो बार्रेटो या पोलिसाची अर्धफोंड- काणकोण येथे हत्या केली. दुसरे दिवशी पोलिसांनी नजीकच असलेल्या पर्तगाळ मठावर छापा टाकला आणि हत्या करणाऱ्याना मदत केल्याच्या वहिमावरून मठातील ३० पुरोहित व विद्यार्थ्याना अटक केली. त्यांची जबानी घेतली आजेंत मॉन्तेरोने. त्या दिवसाची सायंकाळ होईपर्यंत चौकशींत दोन माणसे मेली, मुख्य पुजारी परशुराम आचार्य आणि केशव टेंगसे नामक भटजी. त्यांच्या मृतदेहांवर पोलीस संरक्षणात घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले. परशुरामचे वडील श्रीनिवास आचार्य यांच्यासह पंधरा संशयितांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला. त्यांच्यावर हत्याप्रकरणी सहाय्य केल्याचा नव्हे तर चक्क दहशतवाद पसरवण्यासाठी पोलिसाला ठार मारल्याचा आरोप लावण्यात आला. पणजीत जे सैनिकी न्यायालय- त्रिबुनाल मिलितार- होते, त्यावरल्या पांच न्यायाधीशांपैकी चौघे सेनाधिकारी होते.

मडगावचे अॅड. आंतोनियो ब्रुतो दा कॉश्ता हे शांततावादी आणि तैलबुद्धीचे वकिल होते. १९४८ साली कोलवा येथील समुद्रांत जेव्हा गांधींजींच्या अस्थींचे वीसर्जन करण्यात आले, तेव्हा त्यानी हृदयस्पर्शी भाषण केले होते. पण क्षुब्ध झालो की आपण काय करू शकतो हे त्यानी ३ मे १९५२ रोजी गव्हर्नर कमांडर क्विंतानिव्हा डायस यांच्यावर कठोर मुष्टीप्रहार करून दाखवून दिले होते. आता, १९५६ साली अॅड. ब्रूतो दा कॉश्ता श्रीनिवास आचार्य आणि अन्य ११ जणांतर्फे बचाव पक्षाचे वकील म्हणून युक्तिवादासाठी उभे राहिले होते. राहिलेल्या दोघाजणांचा बचाव अॅड. विनायक सिनाय कैसरे यानी केला.

आपल्या युक्तिवादांत अॅड. ब्रूतो दा कॉश्ता यानी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि '' सच्चा आणि उन्नत अशा न्यायिक यंत्रणेच्या आडून दहशतीने कबुलीजबाब प्रात करण्याच्या, खोटी साक्ष मिळवण्याच्या, अन्याय्य आरोप करण्याच्या'' प्रयत्नांवर कोरडे ओढले. हे कारस्थान ''संघटितरित्या काम करणाऱ्या पण भरकटलेल्या, उतावळ्या आणि हिंस्त्र 'एजंटांचे' असून ते स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या देशांत राहून अविश्वसनीय असा रानटी व अघोरी व्यवहार अत्यंत सहजतेने करतात.'' असे सांगून अस्वस्थ झालेल्या न्यायालयाला उद्देशून अॅड. ब्रुतो दा कॉश्ता म्हणाले, ''जर्मनीतून आणलेल्या कुत्र्यांना माग घेण्यासाठी गुन्हेगाराने हाताळलेल्या वस्तूचा वास द्यावा लागतो, पण पोलिसांचे नाक कुत्र्यांपेक्षाही तीक्ष्ण आहे, पोलिसांना मात्र वाऱ्यावरून आलेला पर्तगाळ मठाचा वास नेमका उमगला!''

सुनावणीदरम्यान अॅड. ब्रुतो दा कॉश्ता यानी मोन्तेरोच्या दराऱ्याच्या चिंधड्या करून टाकल्या. परिणामी लिस्बन येथील सर्वोच्च सैनिकी न्यायालयाने हा खटलाच रद्दबातल केला.आणि नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले. फेरसुनावणीत संशयिताना निर्दोष ठरवण्यात आले.फेलिसियो कार्दोझ यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने १७ मे २००५ रोज सेरावली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना गोव्याचे बहुभाषी कवीश्रेष्ठ मनोहरराय सरदेसाई म्हणाले होते की गोव्यातल्या प्रत्येक राजकारण्याने सर्वप्रथम आग्वादच्या तुरुंगात जावून महिन्याभराचा कारावास भोगायला हवा आणि फेलिसियोनी झेलले तसे आजेंत मॉन्तेरोच्या दंडुक्यांचे प्रहार झेलायला हवेत. मध्यम चणीचे, काहीसे कृश फेलिसियो पेशाने शिक्षक होते. पण निर्भय स्वातंत्र्यसैनिक आणि बेडर, प्रामाणिक पत्रकार असलेला हा माणूस पहाडासारखा होता

आणखीन एक स्वातंत्र्यसैनिक, केळशीचे मारियो रॉड्रिगीस हे भारतीय हवाई दलात बंगळूर येथे कार्यरत होते. त्यांच्यावर मुंबईत १९४६ साली झालेल्या नौदलातील बंडाचा प्रभाव पडला होता. हवाईदलाची चाकरी सोडून ते १९४७ साली आझाद गोमंतक दलात रुजू झाले आणि भूमीगत राहून कारवाया करू लागले. कसेही करून कासिमिरो मॉन्तेरो याला ठार करायचेच, असे मारियो यानी ठरवले होते. सोबत भरलेले हँडगन घेऊनच ते फिरायचे. ते पिस्तुल त्यांच्या खिशात बसत नव्हते म्हणून ते पँटमध्ये कंबरेला खोचायचे आणि वरून शर्ट सोडायचे.

रॉड्रिगीस मडगावचे आपले मित्र नुनो रोझारियो दा सिल्वा यांच्या भेटीसाठी वरचेवर रात्रीच्या वेळी यायचे. नुनोचे वडील रायमुंदो दोमिंगोस दा सिल्वा यांच्या मालकीची दोन दुकाने जुन्या बाजारांत होतीं. एका दुकानात दोमिंगोस शवपेट्या करायचे तर दुसऱ्या दुकानातून रोझारियो बीएसए व झुंडाप या ५० सीसी क्षमतेच्या मोटरसायकली भाड्याने द्यायचे. ही वाहने भाड्याने नेण्यासाठी बरेच पोर्तुगीज सैनिक यायचे. सायंकाळी मौजमजा करण्यासाठी त्याना जवळच असलेल्या चंद्रवाडो येथील आदिवासी वस्तींत जाण्याची हुक्की यायची. हे गुलहौशी सैनिक जेव्हा शेजारीच असलेल्या अंबाजीच्या टेकडीवर आपली विषयवासना भागवायचे तेव्हा रोझारियोचा एक मित्र रस्त्यावर उभ्या केलेल्या मोटरसायकलींच्या चाकांतली हवा काढून टाकायचा. अशा प्रकारे रोझारियोला थोडे अधिक पैसे मिळायचे. (नंतर रोझारियोने आपल्या ह्या मित्राच्या बहिणीशी विवाह केला. तो मित्रही एक उत्कृष्ट मोटरसायकल मॅकानिक म्हणून नावारुपाला आला तर रोझारियो आणि रेमेडियानाचे एकमेव अपत्य- एपिफानियो- या लेखकाचा घनिष्ट मित्र आहे.)

रोझारियोच्या दुकानात येणाऱ्या पोर्तुगीज सैनिकांकडून काही माहिती मिळेल या आशेने स्वा. सै. रॉड्रिगीज तेथे रात्रीच्या वेळी यायचा. रात्रीच्या वेळी लागली तर शवपेटी देता यावी म्हणून रोझारियो दुकानातच झोपायचा. एका रात्री दोघेही दुकानात बसले असता त्याना पिदेच्या 'रोंद' (गस्तीसाठी वापरले जाणारे सशस्त्र सैनिकांचे वाहन) येत असल्याचा आवाज ऐकू आला. तू मला संकटात टाकशील असे म्हणत रोझारियोने रॉड्रिगीजला पटकन एका शवपेटीत लपवले. संकट टळल्यानंतर रॉड्रिगीज बाहेर आला. आजेंत मॉन्तेरोला शवपेटीत ढकलायची त्याची प्रतिज्ञा मात्र कधीच सफल झाली नाही.

कासिमिरा मॉन्तेरोने माया जमवण्याचा बराच प्रयत्न केला. सोन्याच्या तस्करीत तो गुंतला होता. फोंडा येथील एकमेव चित्रपटगृह त्याने उभारले होते. काही श्रीमंत कुटुंबांकडून खंडणी वसूल करण्याचाही यत्न त्याने केला. त्याने केलेल्या मारहाणीत एका आघाडीच्या हार्डवेअर व्यापाऱ्याचा उमदा, गोरा- गोमटा मुलगा मरण पावला. त्या काळात अनेक उद्योजकांच्या घरी बसून असलेल्या बायका आपल्या कुटुंबाला वेगळ्याच प्रकारे पोर्तुगीज अधिकाऱ्यांच्या आगळिकीपासून संरक्षण पुरवायच्या. त्यावेळचे माहितगार सांगतात, उच्चवर्गातील या बायकाना पोर्तुगीज सेनाधिकाऱ्यांच्या गोऱ्या कातडीचे आणि गणवेशाचे आकर्षण वाटायचे. तेव्हाची बरीच संतती युरोपियन्सप्रमाणे 'गोरीपिट्ट' निपजण्यामागे हेच रहस्य आहे. पणजीत त्याकाळी एक चपखल लघुगीत गायले जायचे, त्याचा सारांश असाः

जर प्रत्येक छिनाल बाईच्या नवऱ्याने आपल्या गाडीला बांधला कंदील,

तर, माझे आई! माझे आई! रस्ते लख्ख प्रकाशाने न्हाऊन निघतील!

मूक संमती देणारे नवरे, बदफैली बायका आणि बाहेरख्यालीला सोकावलेले पोर्तुगीज अधिकारी एकीकडे तर दुसरीकडे पिदे आणि आजेंत मॉन्तेरो! गोव्याचा सर्वोच्च अधिकारी असलेल्या गव्हर्नर जनरललाही ते जुमानत नसत. पिदे आणि मॉन्तेरोची वक्रदृष्टी वळली तर कुणाचेच संरक्षण मिळण्याची हमी नसायची. या सरकारी दहशतवाद्याला एका कारवाईदरम्यान जबर दुखापत झाली आणि त्याच्या गोव्यातील कारकीर्दीला उतरती कळा लागली. मॉन्तेरो आणि त्याच्या ४० सशस्त्र सैनिकांनी आझाद गोमंतक दलाचे बापू गवस आणि बाळा देसाई याना हळी- चांदेल येथे घेरले. दोन्ही गोमंतकीयांनी धारातीर्थी पडण्याआधी चिवटपणे प्रतिकार करत पांच सैनिकांना कंठस्नान घातले आणि मॉन्तेरोला जायबंदी करून टाकले. मॉन्तेरोला उपचारार्थ पोर्तुगालला हलवण्यात आले.

ज्यांच्या अंगवस्त्रांच्या कुटुंबाना मॉन्तेरोच्या आगळिकीचा फटका बसला होता अशा सैनिकी अधिकाऱ्यानी तसेच पिदेतल्याच एका माजी सहकाऱ्याने मॉन्तेरोच्या विरोधांत गव्हर्नर जनरलचे कान भरले. गोव्यातच त्याच्या अपराधांची जंत्री पन्नासपेक्षा अधिक होती. चौकशी झाली आणि मॉन्तेरोला मिनिस्ट्री ऑफ ओव्हरसीजकडून बडतर्फ करण्यात आले. पण नंतर लगेच त्याचे पुनर्वसन करण्यात आले आणि तो बराच काळ पोर्तुगालच्या सत्ताधाऱ्यांचा हस्तक म्हणून देशातील तसेच आफ्रिकेतील वसाहतीतल्या राजकीय विरोधकांचा काटा काढण्याचे काम करायचा. २० जून १९६४ रोजी गोव्यात काही ठिकाणी जे बॉम्बस्फोट झाले त्यामागे कासिमिरो मॉन्तेरो आणि पोर्तुगालमध्ये स्थायिक झालेला इस्मायल डायस हा आणखीन एक गोमंतकीय होता, असे सांगण्यात येते. कासिमिरो मॉन्तेरोची वंशावळ शोधण्यासाठी १९व्या शतकात जावे लागेल. रोझो नामक एक फरार पोर्तुगीज ब्राझिलियनने, एक जहाज घेतले आणि त्यात माल भरून तो विक्रीसाठी गोव्याकडे निघाला.

मालाबरोबर त्याने जहाजही विकले आणि तो गोव्यातच फोंडा येथे स्थायिक झाला. त्याला चार मुली झाल्या. प्रस्तुत लेखकाचे कुडतरी येथील ज्येष्ठ मित्र, राफायेल व्हियेगश सांगतात त्याप्रमाणे रोझोची एक मुलगी चांदोर येथील आंताव नामक व्यक्तीशी, दुसरी मुलगी राय येथील मिनेझीस याच्याशी, तिसरी फोंडा येथीलच आमाराल याच्याशी तर सर्वांत छोटी फोंड्यातल्याच मॉन्तेरो नामक व्यक्तीशी विवाहबद्ध झाली. पेशाने पोलीस असलेला हा मॉन्तेरो पणजीत वास्तव्यास असताना त्याना दोन मुले झाली. त्यातला एक कासिमिरो मॉन्तेरो. त्याचा दुसरा भाऊ आनिबाल हादेखील पिदेंत कामाला होता, पण तो भावाप्रमाणे विकृत नव्हता. कासिमिरो मॉन्तेरोचे नामकरण करताना रोझोचे रोझा करण्यात आले.

पिदेवर संशोधनात्मक लेखन केलेल्या दालिया काब्रिता मातियूश आपल्या पुस्तकात लिहितात, कासिमिरो मॉन्तेरोचा जन्म पणजीत २० डिसेंबर १९२० रोजी झाला. तो पोर्तुगीज सैन्यात दाखल झाला आणि थोड्याच अवधीत इटालीत पळूनही गेला. कालंतराने १९५०च्या सुमारास परत पोर्तुगालमध्ये येत त्याने पिदेत प्रवेश मिळवला आणि त्याची रवानगी गोव्यात करण्यात आली. जेव्हा जायबंदी होऊन उपचारार्थ त्याला पोर्तुगालला पाठवण्यात आले तेव्हा त्याच्या पिदेतील एका सहकाऱ्याने इंग्लंडमधील वास्तव्यात कासिमिरोने लंपास केलेला माल पुराव्यादाखल सादर केला. कासिमिरोच्या विरोधांत पाशवी छळ, हत्या, खंडणी वसुली आणि बलात्कार अशा अनेक आरोपांखाली कर्नल मिंगेल मोटा कार्मो यांच्या आयोगाने चौकशी केली आणि मॉन्तेरोला अटक करण्यात आली. त्याला पोर्तुगालच्या कारागृहात पाठवण्यात आले.

दालिया काब्रिता मातियुश सांगतात, थोड्याच अवधीत मॉन्तेरोची मुक्तता करण्यात आली. हर्मीस ऑलिव्हियेरा यानी गोव्यातील पोर्तुगालच्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी तसेच भारतीय गणराज्याच्या विरोधात सशस्त्र लढा देण्यासाठी 'ऑपरेशन नमस्ते' नामक योजना आखली होती. मॉन्तेरो तिच्यात सामील झाला आणि गोव्यात येऊन त्याने अनेक बॉंम्बस्फोट घडवून आणले तसेच भारताशी संधान असलेल्या गोमंतकीयांची हत्या केली. तुला पोर्तुगीज वसाहतींचा गव्हर्नर करतो असे आमिश दाखवत त्याने एका गोमंतकीय स्वातंत्र्यसैनिकाला चर्चेसाठी दमण येथे बोलावून घेतले. त्याला ताब्यांत घेत त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला घोड्याच्या पाठीवर बांधून घालण्यात आले. मात्र त्याला सोडून देण्यात आले.

'ऑपरेशन नमस्ते'च्या संमिश्र यशानंतर १९६४ साली मॉन्तेरो पोर्तुगालमध्ये परतला आणि अर्हता नसतानाही त्याला पिदेत ब्रिगेड प्रमुख म्हणून बढती देण्यात आली. तत्कालिन राजवटीला डोईजड झालेल्यांचा काटा काढण्याचे काम तो करायचा. १९५८ सालच्या निवडणुकीत सालाझारच्या विरोधांत उभे ठाकलेले आणि नंतर १९५९ साली ब्राझीलमध्ये आश्रय घेतलेले पोर्तुगालचे माजी हवाई दल प्रमुख जनरल हुंबर्टो देल्गादो यांचा पाठलाग करत तो पॅरीसमध्ये गेला आणि जन. देल्गादो यांची हत्या करून त्याने त्यांच्या सेक्रेटरीचा गळा आवळला त्याच वर्षी मोझांबिकचे नेते आणि फ्रेलिमो पक्षाचे अध्यक्ष एदुआर्दो मॉन्दलेन यांचा तांझानिया देशात जाऊन मॉन्तेरोने खून केला. सालाझारशाहीविरोधात पोर्तुगालमध्ये क्रांती झाल्यानंतर मॉन्तेरोने दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेशी राजवटीत राजाश्रय घेतला. नंतर त्याला अंधत्व आले आणि अत्यंत हलाखीच्या अवस्थेत असताना नाताल येथे २५ जाने. १९९३ रोजी त्याला मृत्यूने गाठले.

- वाल्मिकी फालेरो

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com