Gomantak Editorial: क्रिकेटचे मोहजाल

आयसीसीच्या स्पर्धांत सातत्याने येणाऱ्या अपयशावर गंभीर विचार व्हायला हवा. या अपयशाची विविध कारणे आहेत. ‘आयपीएल’चे मोहजाल हे त्यापैकी एक महत्त्वाचे कारण.
Australia Cricket Team
Australia Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

लुटुपुटुच्या लढाया जिंकणारा कधीच साम्राज्य निर्माण करत नसतो. त्यासाठी मोठे युद्ध जिंकावे लागते; मग ते रणांगण असो वा खेळाचे मैदान! भारतीय क्रिकेट संघासाठी हे उदाहरण लागू पडते. जागतिक क्रिकेट कसोटीच्या अंतिम सामन्यात सलग दुसऱ्यांदा चाखावी लागलेली पराभवाची चव आपल्याकडील क्रिकेटविश्वाला बरेच काही शिकवून जाणारी आहे. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) सुरू झाल्यानंतर तिजोऱ्या कमी पडू लागतील एवढी खेळाडूंना मिळत असलेली संपत्ती, खेळाडूंकडे पाहाण्याचा बदललेला दृष्टिकोन... असे सगळे चित्र असले तरी या खेळाच्या दृष्टीने त्यातील आभासीपणा, पोकळपणा कधीकधी तीव्रतेने जाणवतो.

आपल्या संघाला बसलेला कसोटीतील दणका हा असा क्षण आहे. याचे कारण जोपर्यंत आयसीसी अजिंक्यपद स्पर्धांत राज्याभिषेक होत नाही, विजेतेपदाचा मुकुट शिरावर येत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही लढाया जिंका, त्या लुटुपुटुच्या ठरतात. २०१३ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवल्यानंतर भारतीय संघ कालपर्यंत ‘आयसीसी’च्या आठ स्पर्धांत एकतर उपांत्य किंवा अंतिम सामन्यांत पराभूत झालाय. त्यामुळे ‘चोकर्स’ हा टॅग पाठीमागे लागला तर आश्चर्य वाटायला नको.

खेळ म्हटला की हार-जीत आलीच; पण येथे पराभवाच्या शिक्क्याशिवाय दुसरे काहीच नाही, हे खटकणारे नाही का? सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अंतिम सामन्यात स्थान मिळवणे हीसुद्धा फार मोठी प्रगती आहेच की, असे यावर समर्थन केले जाऊ शकते; पण सलग दुसऱ्यांदा पराभूत होणे आणि रिकाम्या हाताने परतणे ही नामुष्कीच असते.

Australia Cricket Team
WTC 2023 Final मधील पराभवानंतर आर अश्विनची आली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, 'पराभव निराशाजनक, पण...'

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘महासत्ता’ असे बिरूद मिरवणाऱ्यांसाठी तर ही पुन्हा एकदा फार मोठी निराशाच. बरं ती पण कधी तर ‘आयपीएल’च्या झगमगत्या तंबूत आपण किती श्रेष्ठ आहोत याचे फेटे उडवून १३ दिवस होत नाहीत, तोच सर्व देशासाठी असलेल्या सर्व आशा-अपेक्षांचा असा हिरमोड होणे हे सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना पचनी पडणारे नाही.

शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, सिराज यांचे किती गोडवे गायले होते आपण! पण आभास आणि वास्तव यात फरक असतो. हे २०२१च्या जागतिक कसोटी अंतिम सामन्यातही घडले आणि आताही तेच. जिव्हारी लागणाऱ्या अशा अपयशानंतर कारणमीमांसा करायची, सुतक लागण्यासारखे चेहरे करायचे, यातून बोध घेण्याच्या आणाभाका घ्यायच्या, पण पुन्हा येरे माझ्या मागल्या. तहान-भूक विसरून तुमचा उदो उदो करणाऱ्या आणि क्रिकेटपटूंना देव्हाऱ्यात बसवणाऱ्या या मायबाप प्रेक्षकांना वैफल्य येण्याच्या आत सुधारणा करावी लागणार आहे; पण त्याची सुरुवात कोठून करायची, हाच मोठा प्रश्न आहे.

क्रिकेटचा ओव्हरडोस, ‘आयपीएल’च्या बांधिलकीपुढे अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धांसाठी नसलेले गांभीर्य, असे अनेक प्रश्न आहेत. कोठे तरी बिघाड आहे हे निश्चित. त्यावर उपचार कोणी करायचे? बीसीसीआय आशिया कप वर्ल्डकपचे वेळापत्रक तयार करण्यात गुंतले आहे. संघनिवडीची जबाबदारी ज्यांच्यावर होती ते माजी निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांना स्टिंग ऑपरेशनमुळे राजीनामा द्यावा लागला. सध्या शिवसुंदर दास या फारशा प्रसिद्ध नसलेल्या माजी खेळाडूकडे निवड समितीची सूत्रे आहेत. आता हे दास रोहित, विराट यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना जाब तरी विचारू शकतील? मग बदल करणे तर दूरच राहिले.

आयसीसीच्या स्पर्धांत सातत्याने येणाऱ्या अशा अपयशांची अनेक कारणे पुढे येतील; पण आयपीएलचा मोहजाल कमी होत नाही तोपर्यंत बदल होणे नाही. आयपीएल संपल्यानंतर बरोबर नवव्या दिवशी हा जागतिक कसोटी अंतिम सामना सुरू झाला. हा सामना अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे रोहित, विराटसारख्या खेळाडूंना `आयपीएल#मधून ब्रेक घ्यायला हवा, असे दस्तुरखुद्द रवी शास्त्री सांगत होते; पण ऐकतो कोण? प्रश्न केवळ विश्रांतीचा नव्हता तर टी-२० आणि कसोटी क्रिकेट यातील संयमाचा आणि मानसिकतेचा होता.

नाही तर पाच-पंचवीस चेंडू खेळल्यानंतर विराट कोहली आठव्या यष्टीवरचा चेंडू खेळायला जातो आणि विकेट गमावतो. रोहित शर्मा गरज नसताना स्वीप करतो आणि पायावर धोंडा मारून घेतो. ‘आयपीएल’मध्ये प्रत्येक चेंडूवर बॅट आडवी-तिडवी करून धावा करण्याची वृत्ती कसोटीत चालत नाही. गोलंदाज ‘आयपीएल’मधील चेंडूचा टप्पाच तेथे इंग्लंडमध्ये परिस्थिती वेगळी असतानाही कायम ठेवतात. याचाच अर्थ दोन महिने जे अंगवळणी पडले तेच मुळावर आले, असेच म्हणावे लागेल.

याच वेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू मात्र जाळे विणत होते, त्यात भारतीय खेळाडू अलगद सापडत गेले. आता दोन-चार दिवसांचा दुखवटा मानला जाईल, त्यानंतर वेस्ट इंडीज दौरा. मुळात वेस्ट इंडीजच्या तुलनेने दुर्बल दर्जाच्या संघावर मर्दुमकी गाजवली जाईल. पुन्हा लुटुपुटुच्या लढाया जिंकणे सुरू होईल. आताचा दोन-चार दिवसांचा दुखवटा आणि माजी दिग्गज खेळाडूंनी सुनावलेले खडेबोल हळूहळू विरतील आणि बघता बघता मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेचे गोडवे गायले जातील. खेळाडू गब्बर होत जातील; पण खेळाचे काय?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com