Vat Purnima 2024: गोव्यातील वटवृक्ष! ज्याच्या सावलीत वसलेत मुस्लिमांचे दर्गे आणि कॅथलिकांचे पवित्र क्रॉस

Vat Purnima 2024: वृक्ष हे सचेतन असून त्यात देवता किंवा विविध प्रकारच्या शुभ-अशुभकारक शक्ती असतात, अशी लोकधारणा भारतात प्रचलित आहे.
goa
goaDainik Gomantak
Published on
Updated on

Vat Purnima 2024

मान्सूनच्या पावसाळ्यातली आज ज्येष्ठ पौर्णिमा असून ती वटपौर्णिमा म्हणून गोवा-महाराष्ट्रातल्या सुवासिनी स्त्रिया, आपल्या पतीला वटवृक्षासारखे अक्षय, निरोगी आयुष्य आरोग्य लाभावे या हेतूने साजरी करतात.

वटवृक्षाचे असाधारण महत्त्व आपल्या परिसरात असल्याकारणाने, भारतीय लोकमानसाने त्याला पवित्र वृक्षाचे स्थान दिले आहे. भारतभरात जेथे शतकोत्तर इतिहासाची परंपरा लाभलेले विस्तीर्ण महाकाय वटवृक्ष आहेत, त्यांना देवतास्वरूप मानलेले आहे आणि त्यांच्या सभोवतालच्या परिसरालाही तीर्थक्षेत्रांचे स्थान लाभलेले आहे.

भारतातल्या समस्त धर्मांनी, संप्रदायांनी वटवृक्ष न तोडता, त्याचे संरक्षण आणि संवर्धन केलेले आहे. गयेतला अक्षयवट, प्रयागनगरीतील जुना श्‍यामवट, हे वटवृक्ष भारतीय धर्म- संस्कृतीत वंदनीय ठरलेले आणि त्यांच्याशी देशभरातल्या भाविकांची श्रध्दा पूर्वापार गुंतलेली आहे. भारतीय परंपरेत प्राचीन इतिहासात वटवृक्षाचे संदर्भ आढळतात. वेदात वटवृक्षाला न्यग्रोध म्हटलेले आहे. रामायण, महाभारत, चरकसंहितेत वडाचे उल्लेख आढळतात.

मोरेसी कुलातील वटवृक्षाचे वनस्पतीशास्त्रात ‘फायकस बेंगालेन्सीस’ असे नाव असून, पश्‍चिम बंगालातील कोलकाता येथील डॉ. जगदीशचंद्रबोस वनस्‍पती उद्यानात असलेल्या वटवृक्षाचे ब्रिटिश वनस्पतीशास्त्रांना विशेष आकर्षण होते. येथील ४.६ एकरावर जमिनीत पसरलेला हा वृक्ष अडीचशे वर्षांपेक्षा जुना आहे. आंध्रप्रदेशातल्या अनंतपूर येथील थिम्माम्मा मरीमन वटवृक्ष ४.७ एकरावर जमिनीत पसरलेला असून तो पाचशे वर्षांपेक्षा जुना आहे. महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमने जवळच्या पेमगिरीतला पवित्रवृक्ष, त्याच्या विस्तीर्ण स्वरूपामुळे नैसर्गिक सौंदर्याचे संचित ठरलेला आहे.

महाराष्ट्र राज्यातला सगळ्यात मोठा असलेला हा वटवृक्ष जवळपास तीन एकरात पसरलेला आहे. वटवृक्षाच्या मुख्य खोडाचा घेर ६० फूट असून, त्याला ९० पेक्षा जास्त पारंब्या असून, त्यांच्या एकंदर होणाऱ्या विस्तारामुळे त्याची अभिवृध्दी भाविकांना अचंबित करते. या वटवृक्षाच्या खाली रामोशी समाजाची लोकदैवते जाखमतबाबा व जाखाई यांच्या मूर्ती असल्याने, केवळ रामोशीसाठीच नव्हे तर पेमगिरी परिसरातल्या समस्त लोकमानसासाठी श्रध्दा आणि भक्तीचे प्रतिक ठरलेले आहे आणि हा वटवृक्ष पाहण्यासाठी केवळ भाविकच नव्हे तर देशविदेशातील पर्यटक पेमगिरीला भेट देतात.

गोवा राज्यात वटवृक्ष श्रध्दा आणि भक्तीचे प्रतिक म्हणून शेकडो वर्षांपासून मानलेले असून, त्याला पवित्र वृक्षाचे स्थान इथल्या हिंदूबरोबर ख्रिस्ती, मुस्लिम धर्मियांनी दिलेले आहे. काणकोण तालुक्यातल्या जुन्या मडगाव-कारवार महामार्गावरच्या पैंगिणी गावातल्या पर्तगाळ येथील जीवोत्तम मठाच्या परिसरात जो वटवृक्ष वसलेला आहे, तो केवळ मध्वाचारी संप्रदायातल्या गोकर्ण जीवोत्तम मठाशी निगडित भाविकांसाठीच नव्हे तर संपूर्ण गोमंतकीयासाठी श्रध्दास्थान ठरलेला आहे. कर्नाटक राज्यातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून उगम पावणारी तळपण नदी या वटवृक्षाच्या परिसरातून वाहते. कधीकाळी या वटवृक्षाचा विस्तार बराच मोठा झाला होता.

परंतु आज त्याच्या विस्ताराला ज्या नाना क्लृप्त्या लढवल्या जातात, त्यामुळे त्याची वाढ रोखली जात आहे. उडपी येथील मध्वाचार्यांनी तेराव्या शतकाला गोकर्ण मठाच्या परंपरेतून श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाची स्थापना करण्याची प्रेरणा दिली. तळपण नदीकिनारी हा मठ स्थापन होण्यापूर्वी इथे वटवृक्षाचा विस्तार झाल्याचे संदर्भ आढळतात.

पर्तगाळ येथील वटवृक्षाचे हे संकुल काणकोणातल्या समस्त जातीजमातींसाठी श्रध्दास्थान ठरलेले असून, पूर्वापार या वटवृक्षाच्या थंडगार सावलीत वावरणाऱ्या साधक, भाविकांना सद्‍ विचारांची सतत प्रेरणा दिलेली आहे. पेडणेत पार्से गावातल्या श्री भगवती देवस्थानच्या समोरून जाणाऱ्या रस्त्य्याच्या पल्याड जो पवित्र वटवृक्ष आहे त्याची उंची आणि आवाका फार मोठा असून, त्यामुळे त्याला नैसर्गिक वारसा स्थळाचा सन्मान लाभणे गरजेचे आहे.

मांद्रे गावात सागरी पर्यटनाचा विस्तार होण्यापूर्वी तेथील प्रत्येक वाड्यावाड्यावरती महाकाय वटवृक्षांना लोकदैवताचे स्‍थान लाभले होते. मांद्रेतल्या मराठवाड्यावरती गंगाळदेवाचा पूर्वापार अधिवास ठरलेला शतकोत्तर इतिहासाचा वारसा लाभलेला वटवृक्ष असून दरवर्षी पौष महिन्यातल्या चांदण्या रात्री इथल्या स्थानिक महिला गंगाळदेवाप्रित्यर्थ धालोत्‍सव साजरा करतात. पूर्वी वायंगणी शेतीच्या कामात गुंतलेल्या कष्टकरी स्त्रियांचे हात रात्री तेथील गंगाळदेवाच्या वटवृक्षाखाली असलेल्या पवित्र मांडावरती धालोत्सवाच्या नृत्य-गायनात समरस व्हायचे. शेतजमिनीच्या परिसरात असलेला गंगाळदेव वटवृक्षावरती वास्तव करत असल्याची लोकश्रध्दा रूढ असल्याने, या पवित्र वृक्षाला आदराचे स्थान लाभलेले आहे.

वृक्ष हे सचेतन असून त्यात देवता किंवा विविध प्रकारच्या शुभ-अशुभकारक शक्ती असतात, अशी लोकधारणा भारतात प्रचलित आहे. त्यामुळे चांगल्या हेतुसाठी किंवा अशुभ निवारणासाठी वटवृक्ष पूजनाची परंपरा देशभरात रुढ आहे. वटवृक्षाला संसारवृक्षाचे संचित मानतात. कधीकाळी जीवचैतन्याचा साक्षात्कार आदिमानवाला वटवृक्षासारख्या झाडात झाला आणि त्यामुळे पूजन परंपरेत त्याला स्थान लाभलेले आहे.

गोव्यातल्या पेडणे, डिचोली आणि बार्देश तालुक्यात राष्ट्रोळी या देवताचे प्रस्थ असून, आज राष्ट्रोळीच्या नावाने ठिकठिकाणी मंदिरे उभी झालेली असली तरी बऱ्याच ठिकाणी जे महाकाय वटवृक्ष विराजमान आहेत त्यांना राष्ट्रोळी, दाड, आजोबा आदी अदृश्‍य रूपात वावरणाऱ्या शक्तीचा अधिवास मानलेले आहे.

पोर्तुगीज राजवटीत गोव्यात धार्मिक छळवादाने विलक्षण परिसीमा गाठली होती. आणि त्यात हिंदू मंदिराचे समूळ उच्चाटन करण्यात आले. परंतु वड, पिंपळासारखी राष्ट्रोळी, दाड, आजोबा आदी लोकदैवतांची स्थळं मात्र अबाधित राहिली ती केवळ सावली देणाऱ्या महाकाय वृक्षांमुळेच!

बार्देश तालुक्यातल्या शिवोलीजवळचे ओशेल हे पूर्वाश्रमीचे वडशैल असले पाहिजे. तिथली टेकडी वडांनी समृध्द असल्याकारणाने वडशैल म्हणून नावारूपास आली असावी. गोवाभर असलेली वडामळ, वडनगर, वडाकडे, वडावल ही स्थळनावे तेथे कधीकाळी असलेल्या वटवृक्षांची स्मृती जागृत करत असतात. वटवृक्षाचे संवर्धन आणि संरक्षण कधीकाळी लोकमानसाने थंडगार सावली देणारा महावृक्ष म्हणून करण्याबरोबर त्याच्यातल्या औषधी गुणधर्माबरोबर दैनंदिन जीवनात त्याची पाने उपयुक्त असल्याकारणाने केले होते. गोव्यात हिंदूबरोबर ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मीयांनी वटवृक्षाला संरक्षण दिलेले आहे.

फोंडा येथील साफाशहापुरी मस्जिदीच्या परिसरात जे दर्गे आहेत ते पूर्वापार वटवृक्षाच्या सावलीत वसलेले आहे. मंडुर येथे पवित्र क्रॉस ज्या वटवृक्षाच्या सावलीत तेथील ख्रिस्ती समाजाने उभारलेला आहे, त्यावटवृक्षाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लाभलेले आहे. महाकाय, विस्तीर्ण वटवृक्ष हे गोमंतकाच्या इतिहास संस्कृतीची संचिते आहेत.

बार्देश तालुक्यातल्या शिवोलीजवळचे ओशेल हे पूर्वाश्रमीचे वडशैल असले पाहिजे.

- राजेंद्र केरकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com