स्वातंत्र्य सौदामिनी सुधाताई जोशी

एका संसारी बाईने स्वातंत्र्य लढ्यात उतरून निर्भिडपणे पोर्तुगीजांचा सामना केला हे गोव्यातील अन्य स्त्रियांसाठीही प्रेरणादायी होते आणि अजूनही आहे.
goa
goaDainik Gomatnak

आसावरी कुलकर्णी

गोवा मुक्त होण्यासाठी कितीतरी लोकांनी आपले जीवन समर्पित केले. या लढाईत महिलांचा सहभाग लक्षणीय असा होता. गोव्यात राहाणाऱ्या किंवा बाहेर स्थायिक झालेल्या कितीतरी कुटुंबांनी गोवा मुक्तिसंग्रामात योगदान दिले.

या सर्वांमध्ये एकच ओढ होती गोव्याला मुक्त करणे. आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून या सर्वांनी गोवा मुक्तीसाठी प्रयत्न केले. गोवा भारताचा भाग बनविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.तुम्ही इथून चालते झालात की आपोआप जसा होता तसा गोवा भारताचा अविभाज्य भाग होईल, असे न्यायाधीशांना निक्षून सांगितल्यावर न्यायाधीशांनी माफी मागण्यास सांगितली. त्याला उत्तर म्हणून गोवा ही माझी जन्मभूमी आहे, तिथे येण्यापासून तुम्ही मला अडविणारे कोण? बाकी माझ्या कुटुंबाची काळजी तुम्ही करू नका. हा देशच माझे कुटुंब आहे. मी कुठल्याही प्रकारची माफी मागणार नाही.

वरील प्रसंग होता १९५५ सालच्या गोव्यातल्या कोर्टचा आणि ह्या तेजस्वी महिला म्हणजे सुधाताई जोशी.

सुधाताईचा जन्म १९१८ मध्ये प्रियोळ येथे झाला.

औपचारिक शिक्षण त्यांना मिळाले नाही परंतु त्यांच्या वडिलांनी घरीच लिहायला वाचायला शिकविले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह थोर विदुषी पंडित महादेवशास्त्री जोशी यांच्याशी झाला. आंबेडे येथे दोन सावत्र मुली आणि सासूबाई यांच्याबरोबर त्या राहायच्या. पुढे हे संपूर्ण कुटुंब पुणे येथे स्थायिक झाले.

महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृतिकोषाचे काम सुरू होते. तशातच गोव्याच्या मुक्तीसाठी काहीतरी करावे असे त्यांच्या मनात होते. पीटर अल्वारिस यांच्या सोबत बैठकीत गोव्यात सत्याग्रह करायचा असे ठरले. त्यावेळी सुधाताईंनी महादेवशास्त्रीच्या तब्येतीचे कारण देऊन हा सत्याग्रह मीच करेन असे निक्षून सांगितले.

पं महादेवशास्त्री यांना त्यांचे कौतुक वाटले. त्यांना गोवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले. म्हापसा येथे बैठक घेण्यासाठी त्या पुण्याहून गोव्यात पोर्तुगीजांच्या नाकावर टिच्चून आल्या.

म्हापसा येथील हनुमान मंदिरासमोर जमलेल्या सभेस संबोधित करण्यासाठी उभ्या राहिल्या. समोरून ताणलेल्या बंदुकीची पर्वाही त्यांनी केली नाही. पण शेवटी त्यांना अटक करण्यात आले. कोर्टात त्यांना १२ वर्षांची शिक्षा झाली. तुरुंगात मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीविरुद्ध त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. शेवटी सर्व स्तरावरून दबाव आल्याने त्यांना ४ वर्षांनंतर सोडून देण्यात आले.

एका संसारी बाईने स्वातंत्र्य लढ्यात उतरून निर्भिडपणे पोर्तुगीजांचा सामना केला हे गोव्यातील अन्य स्त्रियांसाठीही प्रेरणादायी होते आणि अजूनही आहे. त्यानंतरचा त्यांचा जीवनप्रवास माझा वानप्रस्थाश्रम या पुस्तकात महादेवशास्त्री जोशी यांनी लिहिला आहे.

प्रसंगी घरोघरी टिकल्या व इतर वस्तू विकून त्यांना उदरनिर्वाह करावा लागला. पण झोटिंग पोर्तुगीजांना सामोरे गेलेल्या सुधाताईना या आयुष्याच्या लढाईचे काहीही वाटले नाही. या स्वातंत्र्य सौदामिनींचे स्मरण कायम गोवेकरांनी ठेवलेच पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com