स्टॅला: प्रवाही शैलीचा अविष्कार

विभा लाड यांनी देखील दक्षिण गोव्यात (South Goa) घडलेल्या एका घटनेचा संदर्भ घेऊन ‘स्टॅला’ ही कादंबरीका लिहिली आहे.
स्टॅला लघु कादंबरी
स्टॅला लघु कादंबरीDainik Gomantak
Published on
Updated on

2000 नंतर गोमंतकीय साहित्य हे विविध अंगांनी समृद्ध होताना दिसत आहे. वेगवेगळ्या समाज स्तरावरील गोमंतकीय लेखक-लेखिका आपल्या भोवतीच्या समाजमनाचा आणि वास्तवाचा वेध घेताना आणि आशय, अविष्कार आणि रचनाकौशल्य याकडे लक्ष देताना दिसत आहेत. प्रा. विभा लाड यांच्या 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘स्टॅला’ या लघु कादंबरीकेचा (Novel) विचार याच पार्श्वभूमीवर करणे योग्य ठरेल. ‘ती रात्र संपली’ (कथासंग्रह) आणि ‘जे सुचले ते’ (ललित लेखन) ही त्यांचीआतापर्यंतची प्रकाशित पुस्तके.

गोमंतकीय साहित्य क्षेत्रात गोव्यातील (Goa) ख्रिश्चन समाजजीवनाची फारशी दखल घेतल्याचे दिसत नाही. ज्ञानपीठकार दामोदर मावजो यांनी ‘कार्मेलिन’ या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीतून पहिल्यांदा ख्रिश्चन समाजजीवनाची दखल घेतली. मराठी साहित्य क्षेत्राने या समाजाची फारशी दखल घेतली नसल्याची खंत ज्येष्ठ समीक्षक रवींद्र घवी यांनी एके ठिकाणी व्यक्त केल्याचे मला आठवते.

सुजाता सिंगबाळ आणि विभा लाड यांनी मराठी साहित्यक्षेत्रातल्या अलक्षित ख्रिश्चन समाजजीवनाचा आपापल्या कादंबरीतून वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. सुजाता सिंगबाळ यांनी 2002 मध्ये प्रकाशित केलेल्या ‘ही वाट चालताना’ या कादंबरीतून (Novel) ख्रिश्चन कुटुंबातील संघर्ष, ताणतणाव आणि ड्रग्ससारख्या व्यसनाने पोखरलेल्या तरुण (Youngster) पिढीचे चित्रण केले आहे. तर विभा लाड यांनी देखील दक्षिण गोव्यात (South Goa) घडलेल्या एका घटनेचा संदर्भ घेऊन ‘स्टॅला’ ही कादंबरीका लिहिली आहे. स्टॅलाची व्यथा आणि कथा मांडण्यासाठी लेखिकेने फ्लॅशबॅक आणि पत्रशैलीचा उपयोग कुशलतेने केला आहे. 17 वर्षीय स्टॅला, तिची आई मारिया, वडील मोजेस यांच्याभोवती कथानक गुंफले आहे.

स्टॅला लघु कादंबरी
Goa Tourist Places: दिवाळीच्या सुट्टीमध्ये 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

स्टॅला तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना क्षणिक मोहापायी रोझारियो नावाच्या तरुणाच्या आहारी जाते. रोझारियो तिच्याकडून आपल्या वासना तृप्त करून घेतो. तिला पेयातून कोकेन पाजून, ती नशेत असताना तिला आपल्या मित्रांचाही हवाली करतो. आपण जगायला लायक राहिलो नाही, आपल्या पाय आणि मायच्या विश्वासाला पात्र राहिलो नाही याची जाणीव होताच ती गळफास लावून आत्महत्या करते. पण आत्महत्या करण्यापूर्वी ती आपल्या मायला पत्र लिहिते त्या पत्रावर लेखिकेने या कादंबरीच्या कथानकाचा डोलारा उभा केला आहे.

स्टॅलाच्या माय-पायच्या कथा-व्यथा आणि मानसिकता लेखिकेने नेमकेपणाने मांडली आहे. जहाजावर शेफची नोकरी करणाऱ्या मोझेसला त्वचारोग (कोड) झाल्याचे कळताच त्याला जहाजावरील नोकरीतून मुक्त करण्यात येते. न्यूनगंडाने आणि निराशेने पछाडल्यामुळे तो कुटुंबातून, समाजापासून पूर्ण अलिप्त होतो. त्याने कमावून आणलेला ‘बाहेरचा’ पैसा संपतो. घरातील आर्थिक विवंचना तसेच स्टॅलाला डॉक्टर (Doctor) बनवण्याच्या हव्यासापायी मारिया दुबईला जाते. पाय घरात असून नसल्यासारखा, मारियाही दूरदेशी, परिणामी पौगंडावस्थेतील स्टॅला भावनिकदृष्ट्या विव्हल आणि एकाकी होते. त्यातच तिला आलेल्या पहिल्या मासिकपाळीमुळे ती भांबावून जाते. अशा भावनिक अवस्थेत असताना आत्याची मुलगी अंजेलाच्या सहवासात तिला गोव्यातील (Goa) ‘बीच’ (Beach) संस्कृतीचा परिचय होतो. विवाहित अंजेलाचे स्वैराचारी जीवनही जवळून बघत असताना तिला स्त्रीत्वाची जाणीव होऊ लागते आणि आपल्यालाही एका वेगळ्या भुकेची आणि अनुभूतीची गरज आहे अशी जाणीव तिला होते. रोझारियोच्या रूपावर आणि त्याच्या बडेजावावर भाळून देहाचे सर्वस्व ती त्याच्या हवाली करते.

जीवनाच्या शेवटच्या क्षणी, स्टॅला, धाकटी बहीण स्टेफीविषयी वाटणारी आपली आत्मीयता पत्रातून व्यक्त करते. “माय आता जरी मी तुमच्यासोबत नसले तरी स्टेफी तुमच्या सोबत असणार आहे. खऱ्या अर्थाने तिला तुमची (माय-पायची) गरज आहे. तेव्हा तू परत दुबईला जाऊ नकोस. तिला सांभाळ तिची ‘स्टॅला’ होऊ देऊ नकोस.”मायेची माय होण्यात खूपच कमी पडले याची जाणीव होताच मारिया स्टेफीमध्ये स्टॅलाला पाहते व परत दुबईला जात नाही. स्वतःचा व्यवसाय उभारते.

लेखिकेने या कादंबरीच्या (Novel) कथानकामध्ये लिहिण्याच्या ओघात बऱ्याच ठिकाणी सांधेजोड केल्याचे जाणवते. तरीपण भोवतालचे वास्तव आणि भावपूर्ण आशयाच्या भक्कम पायावर ही कादंबरीका उभी झाली आहे. गतिमान, संज्ञाप्रवाही निवेदनशैलीमुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे. लेखिकेच्या ठायी असलेला निर्मितीचा झराही ‘अंतरीचा’ आहे.हा झरा भविष्यामध्ये अधिकच वेगाने आणि शुद्धतेने निरंतर खळखळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो.प्रा. विभा लाड यांनी मराठी कादंबरीमध्ये पत्रशैली आणि संज्ञाप्रवाही शैलीचा वापर करून स्वतःचा वेगळेपणाही सिद्ध केला आहे. त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com