Cyber Crime : सायबरयुगातील ‘तक्षक’!

पुराणकथांमधले हे रुपक सध्याच्या सायबरयुगातही किती सुसंगत वाटते. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या पूर्णत: कह्यात गेलेले मानवी विश्व इंटरनेटचे मायाजाल आणि समाजमाध्यमांच्या गदारोळात एकमेकांना जितके घट्ट बांधले गेले, तितकेच ते अधिकाधिक असहायदेखील होत गेले.
Cyber Crime
Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Cyber Crime : तक्षकाच्या विषारी चुळांना घाबरुन महालात दडी मारुन बसलेला शापित राजा परिक्षित याला अखेर मृत्यूने गाठलेच. प्रचंड सुरक्षेला न जुमानता तक्षकाने फळातील अळीचे रुप घेऊन त्याच्या महालात प्रवेश केला, आणि त्याला विषारी डंख केलाच, अशी आख्यायिका महाभारतात आढळते. तक्षकाच्या विषारी चुळांनीच कलियुगाची नांदी झाली होती असे म्हणतात.

पुराणकथांमधले हे रुपक सध्याच्या सायबरयुगातही किती सुसंगत वाटते. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या पूर्णत: कह्यात गेलेले मानवी विश्व इंटरनेटचे मायाजाल आणि समाजमाध्यमांच्या गदारोळात एकमेकांना जितके घट्ट बांधले गेले, तितकेच ते अधिकाधिक असहायदेखील होत गेले. गेले काही दिवस लैंगिक छळणूक आणि ब्लॅकमेलिंग, म्हणजेच ‘सेक्सटॉर्शन’च्या बातम्या वारंवार येताना दिसत आहेत. हे प्रकार वाढीस लागलेले पाहून कुठलाही सुजाण नागरिक अस्वस्थ होईल. -ही त्या आधुनिक तक्षकाचीच देणगी! समाजमाध्यमांवर तासंतास घालवणाऱ्या व्यक्तीस हेरुन खोट्या खात्यावरुन मायाजालात ओढायचे आणि त्या व्यक्तीची अवघड अवस्थेतील छायाचित्रे अथवा चित्रफिती मिळवून पैसे उकळण्याचा धंदा सुरु करायचा, याला म्हणायचे सेक्सटॉर्शन.

माध्यमांवरले चांगले चेहरे हुडकून त्याचे विचित्रीकरण किंवा मॉर्फिंग करुनही असले प्रकार केले जातात. सदरील व्यक्ती लज्जाभयास्तव, ब्लॅकमेलिंगला बळी पडते आणि पैसे देऊन मोकळी होते. असल्याच विकृत गुन्हेगारीला पुण्यातील दोन युवक बळी पडल्याचे दिसते. समाजात छीथू होईल, या भीतीने या युवकांनी आपले आयुष्य संपवले. गेल्या आठवड्यात मुंबईतील बांद्रे येथील एका 64 वर्षीय गृहस्थानेही अशाच सेक्सटॉर्शनची तक्रार पोलिसात गुदरली होती. या प्रकारात त्याचे तब्बल 18 लाख रुपये उकळले गेले. ओडिशामध्ये सेक्सटॉर्शनचे प्रचंड मोठे रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी गेल्याच आठवड्यात अटक केली होती. गेल्या वर्षी, 2021 मध्ये पुण्यात लैंगिक ब्लॅकमेलिंगची सुमारे 685 प्रकरणे आली. यंदाचे वर्ष अजून संपलेले नाही, परंतु, हा आकडा आत्ताच 1445 इतका मोठा झाला आहे. याउप्पर बाहेर न फुटलेली प्रकरणे हजारोंच्या संख्येने असतील, हे ओळखायला सरकारी आकडेवारीची गरजच नाही.

मोबाइल फोन, संगणक आणि टीव्हीचा पडदा या उजळलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसल्या आहेत. त्यांना हुकवून जीवनाचा गाडा हांकणे केवळ अशक्य. काही महाभाग तर सोळा-सोळा तास कुठल्या ना कुठल्या उजळ पडद्याकडे बघत असतात. याला ‘स्क्रीन टाइम’ असे गोंडस नावही मिळाले आहे. उरलेला वेळ झोप, भोजन आणि नित्यकर्मांमध्ये जातो. आप्त किंवा मित्रमंडळींशी मनातले बोलायला वेळ कोणाकडे आहे? संभाषण वाढले, पण संवाद खुंटला, अशीच ही परिस्थिती! बाह्यजगाशी जो काही संपर्क उरतो तो त्या उजळ पडद्याच्या माध्यमातून. यातून एकटेपणा, फोमो म्हणजे फीलिंग ऑफ मिसिंग आऊट, उतावळेपणा, नैराश्य वाढीस लागते. कित्येकदा विकृतीही डोके वर काढू लागतात. अशा मानसिकदृष्ट्या विकल झालेल्या व्यक्ती सायबरयुगातील आधुनिक ‘तक्षकां’च्या कपटाला बळी पडतात. दोन-तीन युवक या सापळ्यात अडकून जीव गमावून बसल्यानंतर पोलिस यंत्रणेला खडबडून जाग आली आहे. कुणाचा तरी जीव गेल्याशिवाय आपली व्यवस्था जागीच होत नाही, हे संतापजनक आहेच, परंतु, त्याहीपेक्षा क्लेशदायी भाग म्हणजे असल्या भानगडींमध्ये स्वत:हून मान देण्याची ही आत्मघातकी वृत्ती आपण वेळीच रोखू का शकत नाही, हा आहे. सदोदित मोबाईल किंवा संगणकात तोंड खुपसून बसल्याने आणि काहीही करुन समाज-माध्यमांवरील आपले आभासी अस्तित्त्व टिकवत राहण्याची धडपड करणे, या खटाटोपात खरेखुरे जगणे पार दूर जाते. आप्त दुरावतात, मित्र-मैत्रिणींचे कोंडाळेही रोडावते. मनातले काहीही बेछुटपणे व्यक्त करण्यासाठी पूर्वी कट्टे किंवा अड्डे असत. महाविद्यालयांची कँटीन्स असत. आजही ते आहेत, पण तेथे होणारा स्नेहाचा व्यवहार आताशा दुय्यम ठरु लागला आहे की काय, अशी शंका येते. मित्र-मैत्रिणींचे कोंडाळे एकत्र येऊन शेवटी समाज माध्यमांवरच सामूहिकरित्या तोंड घालून बसलेले दिसतात. हे विदारक चित्र आहे, आणि ते मानसतज्ञांनाही अस्वस्थ करणारे वाटते.

Cyber Crime
Kala Academy Goa : कला अकादमीचे काम अनुभव नसलेल्या कंपनीला दिल्याचा आरोप

तारुण्य देहमनात धडका मारणार, हॉर्मोन्स त्यांची कामे करत राहणार, हे खरेच. परंतु, त्याची परिणती अखेर आयुष्यच संपवण्यात होणार असेल तर त्याला काय अर्थ आहे? लैंगिक ब्लॅकमेलिंगसारखा अनुभव आल्यास गप्प न बसता बेधडकपणे त्यास सामोरे जावे, त्याबद्दलचा कुठलाही गंड अथवा भय न बाळगता त्याला तोंड द्यावे, हाच त्यावरचा उपाय आहे. तो तितकासा सोपा नव्हे, इतकी मानसिक ताकद एकवटणे काहींना एखादवेळी नाही जमत. पण अशावेळी पोलिस यंत्रणा आणि अन्य समुपदेशकांनी पुढे येऊन हा प्रश्न युद्धपातळीवर सोडवला तर त्यातून लौकर सुटका शक्य आहे. शाळकरीवयातच हल्ली हातात मोबाइल फोन येतो. लैंगिक शिक्षणही शाळेत दिले जाते. तथापि, सायबरयुगात या दोन्हींचा मेळ विषारी ठरु शकतो, याचीही जाणीव शाळकरी वयातच करुन द्यायला हवी. अन्यथा, सायबरयुगातील हा आधुनिक तक्षक आपल्या विषारी चुळा टाकतच राहील. पुराणातला तक्षक फळातून आला होता, आधुनिकातला अर्धवट खाल्लेल्या सफरचंदातून यावा, तसा येईल!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com