सोसोगड : गोमंतसह्याद्रीचा मेरूमणी

कर्नाटक राज्यातल्या काळी व्याघ्र राखीव क्षेत्राच्या कक्षेबाहेर जो विरंजोळ गाव वसलेला आहे तेथील गावकरी सोसोगडावरती शेकडो वर्षांपासून ये-जा करत असून त्यांचे सोसोगडाशी धार्मिक आणि सांस्कृतिक अनुबंध जोडलेले आहेत.
सोसोगड : गोमंतसह्याद्रीचा मेरूमणी
Dainik Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र पां. केरकर

गोमंतकाला पृथ्वीच्या निर्मितीनंतर पश्‍चिम घाटाच्या पर्वतरांगांचा जो समृध्द नैसर्गिक वारसा लाभलेला आहे, त्याने मान्सूनच्या पर्जन्यवृष्टीबरोबर भूजलाचे वैभव आणि हिरवाईचे लावण्य प्रदान केलेले आहे. गोवा -कर्नाटक राज्यांच्या जेथे सीमा एकमेकाला भिडतात तेथे वसलेल्या या पर्वताच्या उत्तुंग शिखराचे लोकविलक्षण आकर्षण परिसराला शेकडो वर्षांपासून होते.

भूशास्त्रानुसार एका टोकाला वसलेले हे शिखर आज सोसोगड, सोसोदुर्ग या स्थळनामाने का परिचित आहे, त्याला दारसिंह या नावाने का ओळखले जाते हे प्रश्‍नं आजही अनुत्तरीत राहिलेले आहे. दिल्लीच्या तख्तावरती जेव्हा मोंगलाची सत्ता प्रस्थापित झाली होती तेव्हा सीमेलगतच्या गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या प्रदेशाला जोडणारा महत्त्वाचा दुवा भीमगड जेथे वसलेला आहे.

त्याच रांगेत असलेल्या सोसोगडाला प्राचीन इतिहासात उल्लेखनीय स्थान लाभलेले असावे. मोंगल साम्राज्याचा परगणा म्हणून जेव्हा भीमगडाला प्रशासनाच्या दृष्टीने महत्‍त्व लाभले तेव्हा सोसोगडाच्या परिसरात असलेल्या कृष्णापूर हा आज उपेक्षित, दुर्गम म्हणून ओळखला जाणारा केळघाटातला गाव नावारूपाला आला होता.

कर्नाटकाच्या बेळगाव जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यात येणाऱ्या केळिल या महसुली गावातला आज एक वाडा ठरलेल्या कृष्णापूराच्या इतिहासाबरोबर विशेष उल्लेखनीय ठरलेला सोसोगडही विस्मृतीत गेला असावा.

कर्नाटक राज्यातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या जोयडा आणि बेळगाव जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या आणि उत्तर गोव्यातल्या सत्तरी तालुक्याच्या सीमेवरती वसलेला सोसोगड समुद्रसपाटीपासून १०२६ मीटर उंचीवरती आहे. कर्नाटकातल्या घटप्रभा- मलप्रभेच्या खोऱ्यात वावरणाऱ्या अश्‍मयुगीन आदिमानवाचे समुह हजारो वर्षांपूर्वी जेव्हा कंदमुळे, फळे, फुले, आणि जंगली श्‍वापदांचे भक्षण करत अनवाणी पायांनी भटकंती करत होते, त्यावेळी त्यांनी सोसोगडावरती यशस्वीपणे गिर्यारोहण करून, काही काळ इथे वास्तव्य केले होते, त्याच्या खाणाखुणा विस्तीर्ण पठारावरती उमटल्या होत्या, त्याचे जीर्णावशेष आज पुरातत्वीय संशोधनाभावी विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहे.

अश्‍मयुगानंतर महापाषाण युगातल्या मानवाच्या पाऊलखुणा जांभ्या दगडांनी युक्त पठारावरती उमटल्या होत्या त्याचे अवशेषही इतिहास जमा होत आहे. या डोंगर माथ्यावरती चवदार पाण्याचे स्त्रोत, पौष्टिकतत्वे देणाऱ्या वृक्षवनस्पती अन्नस्रोत ठरल्या होत्या, त्यामुळे तिथल्या नैसर्गिक गुंफात मानवी समुहाने वास्तव्य केले होते.

लोहयुगाशी नाते सांगणारी धवड जमात ही इथे वास्तव्यास असली पाहिजे. आज सोसोगडावरती जे लोहचुंबकाकडे आकर्षित होणारे जे लोहयुक्त छोटे छोटे गोळे आढळत आहेत. त्यांचा लोहयुगांशी काही संबंध आहे का? या दृष्टीने शास्त्रीय संशोधन झाले तर पुरातत्वीय इतिहासाच्या विखुरलेल्या असंख्य दुव्यांचे दर्शन होऊ शकते.

पोर्तुगीज सरकारला गोव्यातल्या खनिज संपत्तीची जाणीव प्रकर्षाने विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात झाली होती. परंतु दुसऱ्या महायुध्दानंतर निर्माण झालेल्या जागतिकमंदीमुळे आपल्या ढेपाळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी त्यांनी खनिज उत्खनन करण्यासाठी जेव्हा पट्टे दिले तेव्हा सोसोगडावरती मॅगनिजाचे उत्खनन करून माल आणण्याचे प्रयत्न झाले होते. इतक्या उंचावरून मॅगनीज खनिजाचे उत्खनन करून माल ट्रकद्वारे खाली आणला होता.

आणि त्यामुळे येथील सदाहरित जंगलाची अपरिमित हानी होऊन, बारामाही प्रवाहित रहाणाऱ्या झऱ्यांचे अस्तित्वही लोप पावले होते. १९९९ साली सत्तरीत म्हादई अभयारण्याच्या आणि कर्नाटकात २०११ च्या भीमगड अभयारण्याच्या अधिसूचनेमुळे इथल्या मॅंगनीज उत्खननाबरोबर वृक्षतोडीवर निर्बंध आल्याकारणाने सोसोगडाच्या एकंदर पर्यावरणीय संवेदनशीलतेचे कायदेशीर संरक्षण आणि संवर्धन झालेले आहे, आदिमानवाच्या समुहाला अश्‍मयुगात वास्तव्य करण्यासाठी जे पोषक वातावरण होते त्यात कालांतराने बरेच परिवर्तन झाल्याकारणाने त्यांनी डोंगर माथ्यावरून पायथ्याकडच्या प्रदेशात स्थलांतर केले त्याचे पुरावे पुरातत्व संशोधकांना आढळलेले होते.

त्यानंतर प्राचीन इतिहासाच्या कालखंडात सोसोगड, भीमगड, साटरेगडावरती लोकसमुह पोहचले असावे, त्याच्या असंख्य खाणाखुणा जंगलवाटांवरती उपेक्षित अवस्‍थेत आजही पहायला मिळतात.

कर्नाटक राज्यातल्या काळी व्याघ्र राखीव क्षेत्राच्या कक्षेबाहेर जो विरंजोळ गाव वसलेला आहे तेथील गावकरी सोसोगडावरती शेकडो वर्षांपासून ये-जा करत असून त्यांचे सोसोगडाशी धार्मिक आणि सांस्कृतिक अनुबंध जोडलेले आहे, त्याचा स्मृतीगंध अनुभवता येतो. सत्तरीतल्या करंजोळ गावातून तुळस कोंड ही पानशिऱ्यांची जागा ओलांडून, पारंपरिक पायवाटा तुडवत आणि घनदाट जंगलातून सुमारे ७-८ तास पदभ्रमण, गिर्यारोहण करत सोसोगडावरती निसर्गप्रेमी पूर्वापार जात असतात.

परंतु कमी वेळात आणि जास्त पायपीट न करता इथे जाण्यासाठी मात्र विरंजोळ गावाचा समर्थ पर्याय उपलब्ध आहे. गोव्यातून पावसाळी मौसमात सोसोगडावरती गिर्यारोहण करणे मुख्य म्हादई, सुका पानशिरा आणि मौसमी ओहळांमुळे बरेच कठीण आहे. आणि त्यामुळे डिसेंबर महिन्यापासून इथे जाण्याचे नियोजन पदभ्रमणार्थी करण्याला प्राधान्य देत असतात.

गोव्यातल्या सह्याद्री पर्वत शृंखलेत तळवाचो सडो, रावण डोंगर, कातळाची माळी अशी जी शिखरे आहेत, त्यात सोसोगडाची उंची आणि डोंगरमाथ्यावरच्या विस्तीर्ण पठाराचा आवाका सर्वाधिक आहे. त्यामुळे तेथे असणाऱ्या महाकाय वृक्षांवरती मौसमानुसार आमरीच्या विविध प्रजातींचे असे दर्शन अनुभवायला मिळते, तसेच तृणपात्यांचे सुरेख लावण्याची प्रचिती येते.

गोव्यात सदाहरित जंगलक्षेत्राचे प्रमाण पूर्वी बरेच होते. परंतु आज अशा हिरवाईची गर्भश्रीमंती अनुभवणाऱ्या जंगलाचे दर्शन घ्यायचे असेलतर त्याला पर्याय हा सोसोगडाचाच आहे. सोसोगडावरती चढण्यास ज्या पायवाटा अस्तित्वात आहेत, त्या परिसरात माडत, किंदळ, नाणो, जामो आदी प्रजातींचे शतकोत्तर इतिहासाचा वारसा मिरवणारे महावृक्ष पहायला मिळतात.

गोव्याच्या बाजूला म्हादई अभयारण्य आणि कर्नाटकात भीमगड अभयारण्य आणि काळी व्याघ्र राखीव क्षेत्राशी सोसोगड संलग्न असल्या कारणाने, इथल्या जंगलात पट्टेरी वाघाचे जसे वास्तव्य असते, त्याचप्रमाणे माळरानावरती गवेरेडे, सांबर, चितळ, अस्वले आदी जंगली श्‍वापदांची वर्दळ पहायला मिळते.

तृणपाती, फुले-फळे देणारी झाडे, आमरी आदींच्या विविध प्रजातींचे वैभव सोसोगडाला पूर्वापार लाभलेले असल्याकारणाने इथे बारामाही नानाविविध पक्ष्यांच्या विलोभनीय किलबिलाटाला अनुभवण्याचे सुख निसर्गप्रेमींना मिळते. त्यामुळेच सोसोगड शिखरे हे गोवा आणि परिसरासाठी जैविक संपदेचा खजिना ठरलेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com