Shigmo Festival Goa : शिगमोत्सवाची पर्यावरणीय गीते; लोकोत्सव-पर्यावरणाची अनोखी सांगड

पर्यावरणाविना मानवी समाजाचे जीवन शून्यवत होते आणि त्यासाठी आपल्या लोकोत्सवाची सांगड त्याने परिसरातल्या निसर्गाशी घातली होती.
Shigmo Festival Goa | Shigmo Folk Music
Shigmo Festival Goa | Shigmo Folk MusicDainik Gomantak

राजेंद्र केरकर

पर्यावरणाविना मानवी समाजाचे जीवन शून्यवत होते आणि त्यासाठी आपल्या लोकोत्सवाची सांगड त्याने परिसरातल्या निसर्गाशी घातली होती. निसर्ग हा त्यांच्यासाठी सतत प्रेरणादायक आणि त्यासाठी आपल्या जगण्याशी निगडित असणाऱ्या वृक्षवेली, फुलेफळे यांचे गुणगान करण्यात त्यांनी धन्यता मानली.

सत्तरीत अश्मयुगीन कालखंडात मानवी वस्ती निर्माण झाली आणि त्यांच्या जगण्याला अर्थ लाभला, याला कारण सत्तरीचा चैतन्यशाली निसर्ग. सह्याद्रीच्या कणखर कातळाने प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत असताना त्यांना अविचल, अढळ राहण्याची शिकवण दिली. वड, आंबा, पिंपळ यासारख्या विशाल, विस्तीर्ण सावली, गारवा देणाऱ्या वृक्षांनी त्यांच्यात सुहृदयता निर्माण केली.

अज्ञात काळापासून दऱ्याखोऱ्यांतून खळाळत जाणाऱ्या म्हादईच्या प्रवाहाने त्यांच्या जगण्यात चैतन्य आणले. ज्या पर्यावरणाने त्यांना लहानाचे मोठे केले त्या निसर्ग, पर्यावरणाशी संबंधित गावांची नावे त्यांनी दिली. जलाशयाशी निगडीत केरी, झऱ्याशी संबंधित झर्मे, वेळुशी संबंधित वेळगे, वेळूस, नानो वृक्षाशी संबंधित नानेली, नानोडा... आदीवरून सत्तरीच्या लोकांचे निसर्ग पर्यावरणाचे प्रेम अभिव्यक्त होते.

Shigmo Festival Goa | Shigmo Folk Music
Goa Shigmotsav: धारबांदोडा तालुक्यात चोरोत्सव उत्साहात साजरा

‘शिगमो’ हा जणू वर्षभर केलेल्या काबाडकष्टाचा शीण घालवण्याचा आणि पावसाळ्यात शेतकामाला जुंपून घेण्यापूर्वी तजेला प्राप्त होण्यासाठी निर्माण केलेला लोकोत्सव. डोंगर दऱ्या त वावरणाऱ्या मर्दाच्या शरीरातल्या विविधांगी लोककला या शिमगोत्सवातील लोकनृत्यांतून उत्कटपणे प्रकट होतात, विविध लोकनृत्यांसाठी शिगम्यात म्हटली जाणारी बहुतांश लोकगीते सत्तरीत आढळणाऱ्या जैविक संपदेच्या समृद्ध घटकांचे वर्णन करतात.

शिगम्याचे आगमन होते ते फाल्गुनात. पानगळतीच्या मौसमानंतर वृक्षवेलींना नवी पालवी फुटते. फुले, फळे यांनी झाडे बहरतात आणि ऋतुराज वसंताची चाहूल देतात. सृष्टीतला हा आनंद प्रकट करण्यासाठी कोकीळ पक्षी सुरेलपणे जणू गाऊ लागतो. वसंत ऋतूच्या आगमनाचा परिणाम पशुपक्ष्यांवर झालेला असताना तो मन, भावना असलेल्या माणसांवर न झाला तर ते नवल मानावे लागेल.

कुसर, करवंद, सावर आदी वृक्ष फुलांनी डवरतात. कुंभा म्हणजेच ‘कुमयो’. पूर्वी दैनंदिन जीवनात कुम्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग केला जायचा. वसंत ऋतूची वर्दी देण्यासाठी जणू कुंभ्यावरती मोहक फुले येतात आणि फुललेला हा कुंभा पाहून करवल्याच्या उत्सवात ‘जती’ गाणारा मोर्लेचा गावकरी गाऊ लागतो;

शिगम्या मयन्या, देवाच्यो करुल्यो

कुमयो पालाल्यो धुरल तापला,

घाम ही फुटला.. हय रामा ॥

ढोल, ‘तासो’ आणि ‘कासाळे’ यांच्या लोकसंगीतावर ही ‘जत’ रंगत जाते. मुख्य गायकाबरोबर त्याचे साथीदारही त्याच्या गाण्यात आपले स्वर मिसळतात. या जतीत मंदिर परिसरात असलेल्या देवचाफ्याचे झाड आणि त्याची फुलेही आपली हमखास उपस्थिती लावतात.

देवळाच्या दारात चाफा ही लाविला

त्याची रे हिरवी पाने आणि पिवळी चाफे

त्यांचा रे गुंतिला हार

आणि कोरूल्या मायेक घातिला हय रामा ॥

गोमंतकाच्या उर्वरित प्रांताप्रमाणे सत्तरीतही सर्वसामान्यांच्या धार्मिक - सांस्कृतिक जीवनात तुळशीलाही महत्त्वाचे स्थान. फुगडी, धालो प्रमाणे शिगम्याच्या लोकगीतांतही तुळशीचा प्रामुख्याने उल्लेख येतो...

दारातले तुळशीहलशी धोलशी

वांगड पुरशी त्या वैकुंठा.....

झर्मेचा चोरोत्सव संपूर्ण गोव्यात विशेष प्रसिद्ध. शिगम्यात ‘फाग’ नावाचा प्रकार ढोल, ताशावर रंगतो. फागाच्या लोकगीतात पंगाऱ्याच्या फुलांचा उल्लेख आढळतो. शिगम्यात पळसाप्रमाणे पंगाराही फुलतो आणि म्हणूनच लोकगायक गातो;

आरे आरे पंगाऱ्या एकाच का रे फुल?

एक गेला आकाशा, एक गेला पाताळा

दोनूय फुला मेळोवया शिगम्यामधी खेळावया.....

Shigmo Festival Goa | Shigmo Folk Music
Goa Shigmotsav : बोर्डेतील घोडेमोडणी जल्लोषात

पिसुर्ले गावाचा चेहरामोहरा खाण व्यवसायाने आज विद्रूप करून टाकलेला आहे. या गावाची शेतीभाती पाहून पिसोदेव आणि पेजाळी देवी या ठिकाणी कायमचे बस्तान मांडतात. परंतु आज इथल्या समृद्ध कृषी परंपरेला खाण उद्योगाने कधीच उद्ध्वस्त करून टाकलेले आहे. शिमग्यात माडांच्या गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूचा ‘झाडो’ होतो. त्यावेळी म्हणतात;

भावना भगत शिवनाथ सात निरंजळामध्ये कोण जल्मला?

ब्रह्मा, विष्णू महेश जन्मला

ब्रह्मया हाती कुदळ, विष्णू हाती पाटली

भरून भरली पृथ्वीची माती

चारी खंड सारखेच केलेते

नारळी पोफळी

अनंतकोटी सृष्टीचा शृंगार केला......

आज पिसुर्ले गावातील माड, पोफळी ही वृक्षसंपदा मृत्यूच्या कुशीत विसावलेली आहे. हवा, पाणी, ध्वनी आदीच्या प्रदूषणामुळे त्यांची स्थिती केविलवाणी झालेली आहे. पणसुली गाव एके काळी फणसांनी समृद्ध होता. अंजुणे धरणाच्या जलाशयाखाली आज हा गाव बुडालेला आहे. पुनर्वसन करण्यात आलेल्या नव्या गावात शिगमोत्सवात ‘चंदनाची जत’ म्हटली जाते. या जतीत चंदन वृक्षाच्या जीवनातील विविध टप्प्याचे वर्णन केले जाते.

एक पाना चंदन दुसऱ्या पाना चंदन

वाढा गेलो सातेरी गे माये

आपल्या परिसरातील वृक्षवेली यांचे गुणगान करत असताना शिगम्याच्या जती फुलांची ही महती सांगण्यास विसरत नाही. अबोली हे शिगम्यातले सर्वाधिक लोकप्रिय फूल. घोडेमोडणी, करवल्यो आदी उत्सवात अबोलीचे गजरे, माळा यांचा वापर हमखास हवाच. त्यामुळे लोकगीतात अबोलीचा उल्लेख आला नाही तरच आश्चर्य समजावे लागेल.

आबोलेचो वळेसर ताळयेर गो

भावोजी बलयता माळयेर गो

अशा विडंबनात्मक गाण्यात अबोलींच्या गजऱ्याचा उल्लेख सुरेखपणे येऊन जातो. ‘चानी’ म्हणजेच लाडकी खारूताई. सरसर झाडावर चढणारी ही छोटी खार रामसेतु उभारण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार सेवाभावी वृत्तीने कार्य करते. त्या रामायणातल्या खारूला शिगम्याच्या गीतातही स्थान आहे.

चान्नी पोरा तीन गो पाट

रावणान सीता हेल्या

दाखय माका वाट

अंत्रुज महालात होळीसाठी पोफळीचा वापर करतात, तर सत्तरीत आंबा, कोकम आदी वृक्षांचा. होळीसाठी कोणत्याही वृक्षाचा वापर केला तरी तिला सजवण्यास मात्र आम्रपल्लवांचा उपयोग केला जातो. शिगम्यात आंब्याशी निगडीत बरीच लोकगीते आहेत. परंतु;

आम्याची आमाडी आमट रे

मासोर्डेकरांचा रोमट रे......

Shigmo Festival Goa | Shigmo Folk Music
Bicholim News: बोर्डे-डिचोलीत ‘होमकुंड’ उत्साहात

हे लोकगीत बऱ्याच गावांत उच्चरवात कानी ऐकू येते. सत्तरीतल्या शिगम्यात रानाफुलांना विशेष स्थान. गावोगावी होणाऱ्या चोरोत्सवात चोरांना सजवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी अशोकाच्या फुलांचा वापर केला जातो. शिगम्याच्या समारोपात ढोल-तासो-कासाळे यांच्या गजरात लोक बेभानपणे नाचतात, गातात. या नाचण्याला ‘फूल खेळवणे’ असे म्हटले जाते. करवल्याच्या गीतात फुलांचा उल्लेख येतो

फुल बाये फुलले रानच्या मळ्याचे

तारू घडयले चंदनाचे.....

धालोत्सवात सत्तरीच्या स्त्रिया धरित्रीची कवने गातात. तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. शिगमोत्सवात मात्र पुरुष आपल्या जीवनदात्या धरित्रीची गाणी म्हणतो आणि गाताना लयबद्धपणे कधी नाचतो तर कधी बेधुंदपणे! परंतु त्याच्या नाचण्यात आणि गाण्यात मात्र स्वर, शब्दांतून एकरूप होताना सत्तरीला निसर्ग आणि पर्यावरण त्यात सामावतो. पर्यावरणाशी रेशमी बंध कायम ठेवून, इथल्या भूमिपुत्रांनी निसर्गाची गीते गायिली. परंतु आज निसर्ग आणि पर्यावरण यांच्यापासून दुरावून माणूस यंत्रवत् जीवन जगत आहे. सत्तरीच्या लोकोत्सवात एकेकाळी अजरामर ठरलेली ही लोकगीते म्हणजे या मातीचा हुंकार आहे!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com