रद्दीला देण्यासाठी काढलेली वह्या, पुस्तके आज चाळत बसले होते. अगदी पाचवीत असतानाची वही सापडली आणि त्या वहीत मीच लिहिलेला ‘रम्य ते बालपण’ निबंध वाचायला मिळाला. वाचता वाचता, वर्गात सरांनी त्या निबंधाचे केलेले कौतुक आठवले.
मला त्यासाठी बक्षीसही मिळाले होते; तेव्हा त्या निबंधाच्या पानाला घेऊन मी सगळ्यांना दाखवत सुटले होते. काय आनंद झाला होता मला! आज तेच पान मला रद्दीत सापडले होते. तेव्हा त्या कागदावर लिहिलेले शब्द, त्यांचे झालेले कौतुक, त्यातून मिळालेली ऊर्जा व त्यातून झालेला आनंद खरा होता की, आज फिकट पडलेल्या, जराजीर्ण, निस्तेज झालेल्या त्याच पानाचे रद्दीत जाणे खरे?
कागदाचे पान, त्यावर लिहिलेली अक्षरे आपल्याला त्या क्षणी फार महत्त्वाची असतात. ते पान हे आपल्यासाठी फक्त कागद नसतेच मुळी. हे पान पत्र रूपाने आपल्यासमोर येते नातेवाइकांची खुशाली देऊन जाते. कधी ते पान वर्तमानपत्राच्या रूपाने येते आणि जगातली खूप सारी माहिती मिळवून देते.
आपण झटून अभ्यास करतो त्या पुस्तकांची पानेही आपल्याला खूप काही देऊन जातात. आपण गृहपाठ लिहिलेल्या वह्यांची पानेही आपण घेतलेले कष्ट सांगत असतात. परीक्षेच्या वेळी परीक्षा हॉलमध्ये जाताना चार चार वेळा खातरजमा केलेले ते हॉल तिकीट हेही एक महत्त्वाचे पान.
कागदाचे पान प्रश्नपत्रिका बनून आपल्यासमोर येते आणि आपणही तितक्याच मेहनतीने उत्तरे लिहून उत्तर पत्रिकेच्या रूपात ते पान परीक्षकांना सुपूर्द करतो. काही दिवसांनी रिझल्ट येतो त्यावेळी ते निकालाचे पान असते. निकालपत्र त्याचबरोबर प्रमाणपत्रही. हे प्रमाणपत्र रूपी पान माझ्यासाठी किती महत्त्वाचे होते हे ज्यावेळी मी नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेले तेव्हा मला कळले.
बालपणी रिझल्ट लागल्यावर तो कागद केव्हा एकदा घरी नेऊन सर्वांना दाखवते असे मला होई. निरतिशय आनंद मिळवून देणारे ते कौतुकाचे पान मला खूपच आवडे. ताई आजारी असताना, ताईबरोबर दवाखान्यात जाण्याचा प्रसंग कधी कधी येत असे. ब्लड रिपोर्ट, इतर अनेक रिपोर्ट असलेला तो कागद पाहून काही कळत नसे. डॉक्टरांनी निदान सांगेपर्यंत तो कागद फार त्रास देत असे. ताई बरी झाल्यावर दवाखान्यातून मिळालेले डिस्चार्ज पत्र घेताना होणारा आनंद चेहर्यावरून त्या कागदावर ओसंडत असे.
कधी निमंत्रण पत्रिकेच्या थाटात हे कागदाचे पान आपल्यासमोर येते, तर कधी अभिनंदन पत्र बनून येते; कधी कधी मृत्युपत्र म्हणूनसुद्धा आपल्याला ते स्वीकारावे लागते. अज्ञात मजकूर असलेल्या त्या कागदासाठी सेकंद सेकंद पाहावी लागणारी वाट, हुरहुर, वेदना, काळजी, आनंद, दु:ख सगळ्या भावभावनांचा कल्लोळ त्या एवढ्याशा कागदाशी निगडीत असतो.
मला वाचनाची खूप आवड. निबंध, लेख, कथा, कविता, कादंबरी अशा विविध रूपात या कागदाच्या पानांनी अनंत हस्ते खूप काही दिले आहे. कधी इतिहास, तर कधी भूगोल. कधी प्रवासवर्णन, तर कधी आत्मचरित्र. कधी सुंदर कवितासंग्रह, तर कधी लघुकथा, कथा. छोट्यांसाठी गोष्टी, चित्रकथा अशा अनेक रूपात हे कागदाचे पान आपले वाचन व आयुष्य समृद्ध करत जाते.
कुठल्याही पुस्तकाचे पान वाचण्याची सुरुवातच पानाच्या नवेपणाचा, कोरेपणाचा सुगंध घेऊन होते. हेच पान त्याच्या उत्तरायणात त्यात बांधलेला फुलांचा, गजऱ्याचा सुगंध घेऊन येते. यात बांधलेले फूल देवाच्या चरणी वाहिले जाते, तर कधी सुंदरीच्या अंबाड्यातील गजरा बनते. ईश्वरचरणी वाहिलेल्या फुलाचे निर्माल्य होते, प्रसाद म्हणून आपण त्याचा आदराने स्वीकार करतो; ज्यात बांधून ते आले होते त्या कागदाचे काय होते?
दुष्यंत राजाने शकुंतलेला कमलपत्रावर प्रेमाचा संदेश लिहून पाठवला. हे कमलपत्र म्हणजेच आद्य पान. नंतर नंतर भूर्जपत्रावर लेखन करीत किंवा लाकडाच्या विशिष्ट आकाराच्या फळ्या करून त्यावर कोरीत. बहुतांश ग्रंथपठण होत असे आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे अशी त्याची मौखिक वाटचाल कागदाचा जन्म होईपर्यंत झाली. कागदाचा जन्म झाल्यावर मात्र ते ग्रंथ, गाथा लिखित स्वरूपात आपल्यासमोर आल्या.
सुरुवातीला हाताने लेखन केले जाई, नंतर टंकलेखन सुरू झाले आणि आता तर संगणक युगात केवळ उच्चाराने शब्द टाईप केले जातात. भ्रमणध्वनीवर विशिष्ट ॲप ओपन करून बोलायला सुरुवात केली की आपोआप टाईप होते. ज्याला पाठवायचे त्याला फॉरवर्ड केले एका सेकंदात जगभरात कुठेही पोहोचते. कागदाच्या पानाची ही प्रगती पाहून मन अचंबित होते हे सगळे असले तरी लिखित स्वरूपातील कागदाच्या पानाचे महत्त्व कोठेही कमी झालेले नाही. जेव्हा ते वापरून त्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊन रद्दीत टाकले जाते तेव्हा मनाला कुठेतरी खूप दुखते.
शाळेत असताना ‘फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त’ लिहिलेले आठवते. कागदाच्या पानात आणि माणसाच्या जीवनात खूपच साम्य दिसून येते. कागदाचे पान जसे माणसाचे आयुष्य घडवते तसेच ते उद्ध्वस्तही करू शकते भल्याभल्यांची भंबेरीही उडवू शकते तर कधी फाटक्या माणसालाही यशाच्या अत्युच्च शिखरावरती नेऊन बसवते.
त्याची महती काय वर्णावी? माणसाचेही कागदाच्या पानासारखेच असते. तो जोपर्यंत कमवतो तोपर्यंत कर्तृत्ववान ठरतो. त्याचे हातपाय चालतात, स्वतःची आणि इतरांची ही कामे तो करतो तोपर्यंत तो सर्वांचा लाडका, सर्वांना हवाहवासा वाटतो. त्याच्या शब्दाला धारही असते. मानाने त्याचा शब्द झेललाही जातो. कालांतराने हात पाय काम करेनासे होतात. शरीरासोबत मनही थकते. उतार वय झाल्याने आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्याही तो दुर्बल बनतो, हतबल होतो.
त्याला कोणी जुमानत नाही. आपसूकच त्याच्या शब्दाची धार बोथट होत जाते. शब्दाचा मानही कुणाला राखावासा वाटत नाही. एखाद्या रद्दी पेपरासारखी त्याची अवस्था होते. फक्त कचराकुंडीत टाकायचे बाकी असते इतकेच! काहींना तर वृद्धाश्रम नावाचा कोपराही बहाल करतात. त्याच्या आठवणीही पुसून टाकल्या जातात.
कागदाला निदान रद्दीचा भाव तरी मिळतो, माणसाला तोही मिळत नाही. रद्दी पेपरचे निदान रिसायकलिंग करून पुन्हा नव्याने पेपर तरी बनवला जातो, पण माणसाच्या नशिबात तेही भाग्य नसते. तो एकदा कामातून गेला की संपलाच. शेवटी कागदाचे पान असो किंवा माणूस, मजकूर लिहिणारा निराळाच असतो!
कागद विटतो, पान फाटते; पण म्हणून त्यावर लिहिलेले बिनमहत्त्वाचे असत नाही. कालौघात ते अप्रस्तुत ठरते. प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट कालमर्यादा ठरलेली असते; मग ते कागदाचे पान असो वा माणूस. त्यानंतर क्षमतेचा, योग्यतेचा, कार्यकर्तृत्वाचा कित्ता गिरवणे चुकीचे असते. ज्या क्षणी आपण ते जगत असतो ते क्षणच खरे असतात.
सूर्योदयही खरा असतो आणि सूर्यास्तही. कार्य, कर्तृत्वही खरे असते आणि त्यातून निवृत्त होणेही खरेच असते. कागदाच्या पानाचे नवेकोरे असणेही खरे आणि रद्दीत जाणेही खरे. संपते ती उपयुक्तता, महत्त्व नव्हे. त्या क्षणी असलेले महत्त्व महत्त्वाचे व क्षण संपताच त्यातून बिनमहत्त्वाचे होणेही तितकेच महत्त्वाचे असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.