मधू गावकर
डॉक्टर दत्ताराम देसाई यांच्या समाजसेवा – कार्याची पावती देण्यासाठी सावईवेरे पंचक्रोशीजनांनी त्यांचा सत्कार उद्या म्हणजे ७ जानेवारी रोजी करण्याचे योजिलेले आहे. त्यानिमित्त हा लेख
डॉक्टर दत्ताराम देसाईचा जन्म सत्तरी तालुक्यातील पैकुऴ या दुर्गम गावात झाला. त्या पैकुऴ गावातून रगाडा नदी वहात गुळेली गावात म्हादई नदीस मिळते. बालपणी डॉक्टर देसाईनी झुळझुळ वाहणाऱ्या रगाडा नदीच्या पाण्याची चव चाखली, पाण्यात डुबकी मारुन खेळले, त्या रगाडा नदीने दत्तारामाना त्रैलोक्यनाथ मानून आपला आशीर्वाद दिला असावा, असे मला त्यांच्या पाण्यावरील प्रेमातून वाटते.
डॉक्टरांचा जन्म जरी पैकुळ गावात झाला असला तरी त्याला पाटी पुस्तकाचे धडे गिरवण्यास सावईवेरेच्या खेडे भागातील दत्तमहाराजानी आपल्या सान्निध्यात त्याच्या मामाच्या घरी आणले असावे.
दत्त दिगंबर म्हणजे ब्रह्मा, विष्णू, आणि महेश. राम म्हणजे सावईवेरेचा अनंत, मांडवीच्या त़टावर ध्यानस्थ बसून सर्वांचे क्रियाक्रम पहाणारा विष्णू म्हणजे रामावतार, सावईवेरे गाव दत्ताराम देसाईंच्या आईचे माहेरघर. तिथे चौथीपर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण करून, मांडवी नदीच्या पाण्याची चव चाखून ते डिचोली तालुक्यातील हरवळे गावात, शेजो नदीच्या काठावरील रूद्रेश्वराच्या चरणी दाखल झाले.
हरवळेचा परिसर कुळागराने बहरलेला आहे. पैकुळ गावाची रगाडा तांबडी सुर्लच्या महादेवाला चरणस्पर्श करते, सावईवेरेची मांडवी श्रीदत्त आणि अनंताला अभिषेक घालते आणि कुडणेची शेजो नदी रूद्रेश्वराला हरवळे गावात वज्राचे स्नान घालते.
या तिनही नद्यांच्या त्रिवेणी संगमात म्हणजे पवित्र मांडवीच्या पाण्यात डॉक्टरानी जवळून पाहिल्याने, जीवन देणारी म्हादई मांडवी माता त्याला प्रसन्न झाली असावी, कारण डॉक्टर समाजसेवेची वेगवेगळी कामे जरी करीत असले, तरी त्यानी पाण्याला अतिमहत्त्व देऊन, पर्यावरणाच्या विषयांवर जास्त भर दिलेला आहे.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण आहे, त्या प्रमाणे दत्तरामाचे काम हरवळे गावात सुरू झाले. पाचवी ते मेट्रिकपर्यंतचे शिक्षण साखळी शहरातील हायस्कूलात झाले. साखळी ते हरवळे दोन अडीच कि. मी. चे अंतर चालत ते ये-जा करायचे, शिवाय फावल्या वेळेत मामाला घरकामात मदत करायचे, कुळागरात शिपणावळ,
खणणे, झाडावरील फळे काढणे, बाजारहाट करणे, ही कामे त्याने शिक्षणासारखी मानून घरची मंडळी, सगेसोयरे, बालमित्र, शिक्षक यांच्याकडून प्रेम, ममता, आपुलकी निर्माण केली.
ते इंटर होण्यासाठी उच्च माध्यमिक विद्यालयात दाखल झाले. पुढे ज्ञान बुध्दीच्या जोरावर त्यांचा कल समाजसेवेकडे झुकू लागला, या काळात त्यांनी कला, शिबिरे, प्रश्नमंजुषा काम, श्रमदान आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.
अभ्यासात हुशारी होतीच पण त्याहीपेक्षा नम्रतेने वागणे, मान ठेवणे असे सद्गुण त्यांच्यात होते. इंटर परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होऊन त्यानी बांबोळीच्या पठारावरील मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळविला.
गरिबीवर मात करीत सुखदु:खाचे गाठोडे पाठीवर घेऊन डॉक्टरी पदवी घेऊन, परत आपल्या मामाच्या इच्छेखातर सावईवेरे गावातील गरीबांच्या सेवेसाठी ते रुजू झाले.
त्यांना एखादी मोठ्या हुद्याची सरकारी नोकरी मिळाली असती अगर मोठ्या शहरात पैसा कमावण्याचा मार्ग सापडला असता पण त्यानी आपल्या जडणघडणीच्या मातीला जोडलेली नाळ तोडली नाही.
डॉक्टर होऊन आलेले दत्ताराम आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि नम्रतेच्या वागणुकीने सावईवेरे पंचक्रोशीत जनतेच्या गळ्यातील ताईत झाले. येणाऱ्या गरीब रुग्णांची सेवा करण्यास रमून गेले. इतक्यात केरीच्या भूतखांब पठारावर नायलॉन ६,६ विषारी प्रदूषणकारी प्रकल्पाचे भूत पठाराच्या वर्तुळावर अनेक गावांवर सरकारने उभे केले.
पठारालगत वाघुर्मे, सावईवेरे, वळवई, बेतकी, खांडोळा, वरगाव, तिवरे, अडकोण, भोम, कुंकळ्ये, प्रियोळ, केरी, कुर्टी, खांडेपार, ही गावे मोठ्या संकटात सापडली. गरीब शेतकरी, बागायतदार, पंचायती, जनता यांना कारखान्याची माहिती न देता जनसुनावणी न घेता सरकारने कारखान्याचे काम करण्यास थापर ड्युपाँट कंपनीला परवाना देऊन रान मोकळे करून दिले.
त्यावेळी डॉक्टर दत्ताराम देसाईंसारख्या अनेक विचारवंतांच्या लक्षात हा आपालिपाचा खेळ असल्याचे कळले. जर कारखाना उभा राहिला तर पठारावरून वहाणारे प्रत्येक गावातील पाण्याने भरलेले ओहोळ, खळ्या, तलाव, झरी, विहिरी सुकतील, लोकांना पाण्याविना हाल सोसावे लागतील.
प्रकल्पामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा सारासार विचार करून डॉक्टर देसाई आणि बाकी तज्ज्ञ विचारवंतांनी गंभीर चर्चा करून, नायलॉन ६, ६ आंदोलन उभारण्यासाठी परिसरातील जनतेला व प्रदूषित कारखान्याची सारी माहिती गावागावात लोकांच्या भेटी घेऊन, विषय पटवून दिली आणि कारखान्याविरोधात मोठा लढा उभारला. सरकार आणि थापर ड्युपाँट कंपनीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.
पण डॉक्टर आणि परिसरातील जनता कारखान्याच्या विरोधात ठाम उभी राहिली. स्वतंत्र गोव्यात प्रथमच मोठे आंदोलन झाले. जनतेचा प्रखर विरोध पाहून पुढच्या भविष्यासाठी सरकारने माघार घेऊन कंपनीला तिथून आपला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले.
नायलॉन ६, ६ आंदोलनानंतर उडालेला धुराळा जमिनीवर बसून डॉक्टर परत रुग्णाच्या सेवेत रमले मात्र संपूर्ण गोव्यात डॉक्टरांचे खऱ्या पर्यावरणप्रेमींच्या रांगेत नोंद झाली आणि समाजसेवक म्हणून ओळखू लागले. आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, रक्तदान, तलाव, ओहोळ स्वच्छता काम, पाणी साठवणूक, नेत्रतपासणी शिबिर, वाचन संस्कृती, सहकार इत्यादी कामात हिरीरीने भाग घेऊ लागले, समाज सेवा आणि रुग्ण तपासणी म्हणजे त्यांना तराजूचे काम करावे लागले.
गोवा आणि कर्नाटक राज्यांचा म्हादईच्या पाण्यासाठी लढा सुरू झाला. यातही डॉक्टरांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांनी जलयात्रा सुरु करण्यापूर्वी सावई गावच्या अति उंचावरील बोणये वाड्यावरील तलाव दैनिक गोमन्तक परिवार आणि पत्रकार यांच्या सहकार्याने श्रमदानाने तलावातील चिखल उपसा करून तिथल्या लोकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
जलयात्रा अभियाना द्वारे सावईचा कुळण तलाव उपसा केला. वाघुर्मेची झर साफसफाई, वरगावची धुमकान झर सफाई, मंगेशी तलाव सफाई, बोरीचा शिरशिरे धबधबा सफाई, फोंड्याची हनुमान तळी हे कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाने राबवले, पाणलोट संघाद्वारे जांबुळच्या ओहळास पाणी अडविण्यास बंधारा घातला. जरी डॉक्टरानी विविध विषयात भाग घेतला तरी सर्वात महत्वाचा विषय पाणी हे त्याना महत्व पटलेले त्यांच्या कामातून दिसून येते.
जलयात्रा अभियानात डॉक्टर, इंजिनीयर, प्रोफेसर, शिक्षक, सरकारी सेवक, वास्तुरचनाकार, बागायतदार, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, पत्रकार मंडळी होती.दर रविवारच्या प्रवासात झरी, तलाव, ओहळ, नद्या, धरणे, दलदल, अशा पाणथळाला भेटी दिल्या, त्यातून प्रत्येकाला जैवविविधतेची माहिती मिळाली,
करमळी, आजोशी, साकवाळ पठार कुठ्ठाळी, वेर्णा, कासावली, इत्यादी गावातील पाणथळांना भेटी देऊन जागृतीचे काम केले. या जलयात्रेत प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून या अभियानाला यशस्वी केले. तरी श्रेय डॉ. देसाईंनाच जाते.
जल म्हणजे पाणी आणि यात्रा म्हणजे प्रवास. पाणी हे घनद्रव्य आहे, तहान लागल्यावर पाणी जीवन देते, देवपूजेला पाणी वापरतो, देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीपत्राने पाणी शिंपडतो, तीर्थ म्हणून आचमन करतो, डोळ्याना पाणी लावून सुखावतो, जगात सर्वसमवेशक पाणी आहे, जीवना बरोबर धावत राहणारे पाणी,
ओलावा, वात्सल्य, दिलासा, तृप्ती हे शब्द पाणी, हे जगण्याचे सुंदर आश्वासन होय, अशा पाण्याविषयी विचार करता, या विषयाने पछाडलेले जलमानव डॉक्टर देसाई यांच्या बरोबर नायलॉन सहा सहा विरोधी आंदोलन आणि जलयात्रा अभियान या दोन विषयांत काम करण्याची संधी मिळाली. दत्ताराम यातला राम म्हणजे अनंत विष्णूला देव मानतात.
डॉक्टराना समाज सेवेसाठी अनेक संस्थानी पुरस्कार देऊन गौरविले आहे, यंदाचा गोवा सरकारचा दक्षिण गोवा जैव – विविधता राज्य पुरस्कार देऊन त्याना सन्मानित केले आहे.
उद्या त्याच्या समाजसेवा कार्याची सावईवेरे पंचक्रोशी जनता दखल घेऊन, जाहीर सत्कार करून सन्मानित करीत आहे. ते समाजसेवक आहेच तसेच सर्वांचे प्रिय मित्र आहे, डाॅक्टरांची समाजसेवा ही पुढील भविष्यात गिझाच्या पिरॅमिडाप्रमाणे तेजोमय होवो आणि त्याना दीर्घायुष्य लाभो. अशी देवाकडे वंदनीय प्रार्थना.
डॉक्टर होऊन आलेले दत्ताराम आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि नम्रतेच्या वागणुकीने सावईवेरे पंचक्रोशीत जनतेच्या गळ्यातील ताईत झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.